पावसाच्या सरी आटवत घटस्थापना येते..
आणि ऍसिड टाकणाऱ्या हातातून, तुझी प्रतिष्ठापना होते..
मग उत्साहात सुरू होतो, तुझ्या आगमनाचा सोहळा..
मुलीला चिल्लर जाणणारे, वाहतात सोनेरी मोहरा..
जन्म देतेस तू.. पण आता स्वतःसाठीच व्याली हो..
भ्रूणातील तव हत्यारांसी, शारदेतली काली हो..
अग तुला बैसण्या मांडव झाला, आता तिला उन्मुक्त रान दे..
दे माते मज दान दे, तव वात्सल्याचे दान दे..
द्वितीया तत्सम नवरात्रिंना,रोज अनोखा दांडिया होतो..
पण,दहाव्या सूर्याला दांडियातलाच हात,विषारी कालिया होतो..
'ती' चं शिक्षण बंद करून त्यांनी तुज अखंड दिवा लावला..
आणि लग्नाच्या आमिषाने, तिच्या बटांतून काटेरी गुलाब रोवला..
समाजापुढे भक्त म्हणुनी, त्यांनी तुझ्या मूर्तीचे रक्षण केले..
पण, पुरुषी अभिनिवेशातून बलात्काराने तिचेचं भक्षण केले..
अग नैवेद्याचे ग्रहण ही झाले..आता तरी तिला मान दे..
दे माते मज दान दे.. तव वात्सल्याचे दान दे..
' चूल आणि मूल ' सोडून तिला मोकळे अंगण कर..
हाच आजचा दसरा समजून, एकदा सिमोलंघन कर..
एक आणखी माझिया साठी,तिज सौभाग्याचे वान दे..
दे माते मज दान दे.. तव वात्सल्याचे दान दे..
कवी: सुयश देशपांडे (कारंजा लाड)
मो: 7391835135
कविता आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.
Comentarios