अश्विन म्हणजे...हिंदू पंचांगाप्रमाणे आपले मराठी महिने चंद्राच पृथ्वी भोवती होत असलेल भ्रमण लक्षात घेऊन त्याप्रमाणे ठरविले जातात.अशा चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा अश्विनी हे नक्षत्र चंद्राच्या सान्निध्यात येते तेव्हा जो मराठी महिना सुरू होतो त्याला अश्विन महिना असे म्हणतात.

दरवर्षी सर्वपित्री अमावस्या झाली की लगेच दुसऱ्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदा येते आणि या तिथीला शारदीय नवरात्र उत्सवाचा प्रारंभ होतो. शारदीय नवरात्र म्हणजे शरद ऋतूमध्ये आदिशक्ती दुर्गामातेचा उत्सव केला जातो म्हणून त्यास शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. हा शारदीय नवरात्र उत्सव साधारणपणे नऊ दिवसांचा असतो.पहिल्या दिवशी एक अतिशय समाधान देणारा श्राद्धाचा विधी केला जातो,त्यास मातामह श्राद्ध असे म्हणतात. या दिवशी नातवाने अतिशय आदरपूर्वक आपल्या आईच्या वडिलांचे म्हणजेच आपल्या आजोबांचे स्मरण करून एखाद्या सत्पात्र व्यक्तीचा योग्य तो सन्मान करून दान करायचे असते. मातामह श्राद्ध हे जरी श्राद्ध असले तरी पितृ पंधरवड्यात मात्र ते केले जात नाही. या वर्षीचा नवरात्र उत्सव १७ ऑक्टोबरला सुरू होऊन २५ ऑक्टोबरला विजया दशमीच्या दिवशी संपन्न होत आहे.पौराणिक कथेप्रमाणे महिषासुराबरोबर आदिमायेचे नऊ दिवस घनघोर युद्ध सुरू होते आणि दहाव्या दिवशी महिषासुराचा  दुर्गामातेने वध केला म्हणून तिला महिषासुरमर्दिनी असे म्हणतात आणि त्या दिवसाला विजया दशमी असे म्हणतात.आणखी एक कथा अशी सांगितली जाते की रावणाशी लढण्यासाठी आणि विजय मिळविण्यासाठी भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या श्रीरामांनी  सुद्धा शक्तीची उपासना केली होती. आदीमायेकडून मिळालेल्या अशिर्वादाच्या बळावर श्रीरामांनी रावणाचा वध केला आणि विजय मिळविला म्हणून  या दिवसाला विजया दशमी असे म्हणतात. कौरवांविरुद्धच्या युद्धामध्ये पांडवांना विजय मिळविण्यासाठी उपयोग व्हावा म्हणून भगवान श्रीकृष्णांनी पण अर्जुनाला शक्तिमातेची उपासना करायला सांगितले होते. वाईट गोष्टींवर चांगल्या गोष्टींचा विजय अशा प्रकारे जगात कायमच होत असतो.


अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून अगदी विजया दशमीपर्यंत येणाऱ्या शारदीय नवरात्र आणि विजया दशमी या दहा दिवसांमध्ये "या देवी सर्व भुतेशू शक्तीरूपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमोनम:"  अशी शक्तिमातेची सप्तशतीच्या पाचव्या पाठात सांगितलेली उपासना केली जाते.शक्तिमातेची आराधना करून तिचे आशीर्वाद मिळविले जातात. नवरात्रात नऊ दिवस देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते.


१.प्रतिपदा : शैलपुत्री देवी मातेची पूजा आणि आराधना.या यदिवशी देवी मातेला राखाडी रंगाची साडी नेसविली जाते.शैलपुत्री म्हणजे हिमालयाची कन्या.तिला दक्ष राजाची कन्या सतीचेच रूप आहे असे मानले जाते.हा नवरात्राचा पाहिला दिवस असल्यामुळे या दिवशी देवीची घटस्थापना केली जाते. घटस्थापना म्हणजे पितळ्याचे,तांब्याचे किंवा चांदीचे घटासारखे किंवा कळशीसारखे गोलाकार भांडे घेऊन त्यामध्ये पाणी भरून त्यात पैसा सुपारी ठेऊन त्याला हळद कुंकू वाहून त्याच्यावर एक झाकण ठेऊन त्या झाकणात रेशमी वस्त्र घालून महालक्ष्मीची प्रतिमा किंवा  टाक ठेऊन त्या देवी रूपाची पूजा केली जाते. किंवा त्या महालक्ष्मीच्या प्रतिमेला किंवा टाकाला चांदीच्या ताम्हनात रेशमी वस्त्रात ठेऊन तिची पूजा केली जाते, आणि त्या घटावर नारळ ठेऊन त्याची पूजा करून त्या नारळापर्यंत येईल अशी झेंडूची किंवा तिळाच्या पिवळ्या फुलांची माळ  सोडली जाते .अशी रोज एक माळ वाढवून नऊ दिवसांपर्यंत नऊ माळा अर्पण केल्या जातात.काही ठिकाणी कडक पुऱ्या करून त्याची पण माळ सोडली जाते त्यांना कडकण्या असे म्हणतात.पूर्ण नवरात्रात देवीजवळ अखंड नंदादीप लावला जातो.

 नवरात्राच्या या पहिल्या दिवशी देविमातेला घटी स्थापित करून तिच्यापुढे एक छोटस काळ्या मातीच शेत  तयार करून त्या शेतात धने ,गहू ,मेथ्या या प्रकारची धान्ये पेरून त्या मातीवर रोज थोडं थोडं पाणी शिंपडून नऊ दिवसांनी पेरलेल धान्य उगवण्याचा निसर्गातल्या पुनर्निर्मितीचा आनंद घेतला जातो.काही घरांमध्ये मातीच्या नऊ सुगडांमध्ये नऊ प्रकारची धान्ये ठेऊन घरातली सुबत्ता देविमातेला अर्पण केली जाते.आणि नंतर त्या धान्याचे दान केले जाते.


२.द्वितीया :  ब्रह्मचारिणी देवी मातेची पूजा आणि आराधना.या दिवशी देवी मातेला केशरी रंगाची साडी नेसविली जाते.ब्रह्मचारिणी रुपामधील पार्वती देवीने कठोर तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्राप्त करून घेतले होते.


३.तृतीया :  चंद्रघंटा देवी मतेची पूजा आणि आराधना.या दिवशी देवी मातेला पांढऱ्या रंगाची साडी नेसविली जाते. चंद्रघंटा देवीच्या कपाळावर चंद्राच्या आकाराच कुंकू रेखलेलं असत म्हणून तिला माता चंद्रघंटा असे म्हणतात.


४ चतुर्थी : कुष्मांडा देवी मातेची पूजा आणि आराधना. या दिवशी देविमातेला लाल रंगाची साडी नेसविली जाते. सगळ्या ब्रह्मांडाला आपल्या उदरात सामावून घेण्याची ताकद असलेल्या देवीच्या रुपाला माता कुष्मांडा असे म्हणतात.


५. पंचमी : स्कंदमाता देवी मातेची पूजा आणि आराधना. या दिवशी देविमातेला निळ्या रंगाची साडी नेसविली जाते.नवरात्राच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमीचे व्रत केले जाते. या व्रतामध्ये ललिता पंचमीचा " ओम लं ललिता देव्ये नमः " असा ललिता देवीचा जप केला जातो. कुंकवाच्या करंड्याचे झाकण म्हणजे ललिता देवी असे म्हणतात. त्या रुपातल्या ललिता देवीची विधिवत पूजा करून,कहाणी वाचून तिला ४८ दुर्वांची एक जुडी अशा ४८ दुर्वांच्या जुड्या वाहिल्या जातात. ललिता पंचमीच्या दिवशी २ ते ९ वर्षांपर्यंतच्या ९ कुमारिकांना जेवावयास बोलाविले जाते.त्यांची पूजा केली जाते आणि भेटवस्तू दिल्या जातात. ललिता देवीची तीन रुपे वर्णिलेली आहेत.८ वर्षाच्या रुपातल्या ललिता देवीला त्रिपुरसुंदरी असे म्हटले जाते . १६ वर्षांच्या रुपातल्या ललिता देवीला षोडशी असे म्हटले जाते.यौवनात पदार्पण केलेल्या रुपातल्या ललिता देवीला ललिता त्रिपुरसुंदरी असे म्हटले जाते. या पुजेमध्ये नैवेद्याला केलेले लाडू ,  पेढे,  वडे या वस्तू ४८ या संख्येमध्ये घेऊन सुवासिनीला वाण म्हणून दिले जाते.ललिता पंचमीचे व्रत हे एक काम्य व्रत आहे. हे व्रत केल्याने तुमच्या साऱ्या मनोकामना पूर्ण होतात.


६. षष्ठी : कात्यायनी देवी मातेची पूजा आणि आराधना. या दिवशी देविमातेला पिवळ्या रंगाची साडी नेसविली जाते. कात्यायन ऋषींच्या विनंतीवरून त्यांच्या पोटी जन्म घेतलेल्या पार्वती मातेला माता कात्यायनी असे म्हणतात.


७.सप्तमी : काळरात्री देवी मातेची पूजा आणि आराधना. या दिवशी देविमातेला हिरव्या रंगाची साडी नेसविली जाते.बऱ्याच संकटांना तोंड देऊन त्याचे निवारण करणाऱ्या पार्वती मातेला माता कालरात्री असे म्हणतात.


८. अष्टमी : महालक्ष्मी /महागौरी देवीमातेची पूजा आणि आराधना. या दिवशी देविमातेला मोरपंखी रंगाची साडी नेसविली जाते. या दिवशी पार्वती मातेच्या महालक्ष्मी या रूपाची पूजा केली जाते.सोळा धागे घेऊन त्यांना सोळा गाठी मारून तयार केलेला तातू देवी मातेला अर्पण केला जातो. पूरणावरणाचा स्वयंपाक करून त्याचा महानैवेद्य महालक्ष्मी मातेला दाखविला जातो. त्या दिवशी सायंकाळी तांदुळाच्या उकडीचा महालक्ष्मीचा सुबक मुखवटा तयार करून उभ्या रूपातली देवी उभी केली जाते आणि तिची पूजा, आरती करून नैवेद्य दाखविल्यावर,कहाणी वाचून झाल्यावर उत्तर पूजा करून व्रताचे उद्यापन केले जाते..या दिवशी संध्याकाळी घागरीमध्ये धूप घालून घागरी फुंकण्याचा कार्यक्रम करून त्या निमित्ताने देवीपुढे जागरण केले जाते. याच दिवशी सरस्वती देवीची पूजा करण्याचा पण प्रघात आहे. त्या निमित्ताने घरातील आपल्याला गुरूस्थानी असलेले निरनिराळे ग्रंथ किंवा पोथ्या यांची पूजा केली जाते.


९. नवमी : सिद्धिदात्री देवीमतेची पूजा आणि आराधना. या दिवशी देविमातेला जांभळ्या रंगाची साडी नेसविली जाते. सर्व सिध्दी किंवा संकल्प पुरे करून त्यांची पूर्तता करून देण्याच सामर्थ्य ज्या देवीच्या रुपात आहे त्या पार्वतीमातेच्या रुपाला सिद्धिदात्री माता असे म्हणतात .या दिवसाला खंडेनवमी असे पण म्हणतात.या दिवशी शस्त्र पूजन केले जाते. आपण करीत असलेल्या कामाच्या स्वरूपाप्रमाणे आपण वापरीत असलेल्या यंत्रांची पण पूजा केली जाते. पूर्वीच्या काळी राजेरजवाडे लोक आपापली शस्त्रे, अस्त्रे यांची स्वछता करून त्यांची पूजा करून पुढील लढाईसाठी तयार करून ठेवीत असत.

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आदिमातेच्या नऊ रुपांची मनापासून पूजा अर्चना आराधना करताना आदिमातेच्या निरनिराळ्या मूर्तींना कधी सोन्या चांदीच्या दागिन्यांनी किंवा मोत्याच्या अलंकारांनी सजविले जाते.त्यांना कधी वाघावर,सिंहावर,हत्तीवरच्या अंबारिमध्ये,कमळामध्ये मोरावर,हंसावर बसविले जाते.तुळजापूरच्या भवानि मातेच्या पुढे भवानी मातेने शिवाजी महाराजांना दिलेल्या भवानी तलवारीचा देखावा पण उभा केला जातो. कोल्हापूरची अंबाबाई आणि तुळजाभवानी या दोन्ही ठिकाणी महिषासुर मर्दिनीचा पण देखावा उभा केला जातो.आदिमायेची पार्वती,उमा,गौरी ही जशी शांत रूपे आहेत तशीच तिची अंबा, चंडी, भवानी,काली महिषासुर मर्दिनी अशी उग्र रूपे पण आहेत.नवरात्री उत्सव म्हणजे आदिमायेच्या रूपाने केलेला स्त्रीशक्तीचा जागरच असतो.स्त्री सुद्धा वेळ पडली तर आलेल्या संकटाला महिषासुर मर्दिनी बनून तोंड देऊ शकते हे यातून सुचविले जाते असे मला वाटते.


१०. दशमी : खंडेनवमीला तयार केलेली शस्त्रे,अस्त्रे घेऊन पूर्वीचे राजे,अगदी आपले पेशवे सरकार सुद्धा नव्या लढाईसाठी बाहेर पडत असत त्याला सीमोल्लंघन असे म्हटले जाई. त्या लढाया जिंकून येताना जी लूट मिळत असे त्याला शिलंगणाचे सोने असे म्हटले जाई. सर्व वाईट गोष्टींवर विजय मिळवून सर्व देविमातांची मनापासून पूजा करून आनंदाने भरलेल्या मनाने विजयोत्सव साजरा करण्याचा,एकमेकांना आपट्याच्या पानाच्या रुपातले सोने लुटून शुभेच्छा देण्याचा आणि गुढ्या पताका उभारून आनंद साजरा करण्याचा हा विजयादशमीचा दिवस.या दिवशी उत्तर भारतामध्ये लंकेचा राजा रावण याच्या प्रतिमेचे दहन करून विजयोत्सव साजरा केला जातो.या दिवशी आपल्या घरातल्या लहान मुलांच्या पाटीवर सरस्वती देवीची रांगोळी काढून त्यांच्या हस्ते तिची पूजा करून त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा पण केला जात असे त्याला पाटीपूजन असे म्हणत असत.


भारतासारख्या खंडप्राय आणि बहुभाषिक देशामध्ये नवरात्री उत्सव बहुतेक सर्व राज्यांमध्ये साजरा केला जातो. काश्मीर मधल्या वैषणवी देवीपासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेल्या आपल्या भारत देशात ज्या ज्या ठिकाणी सतीमातेची शक्तिपीठे आहेत त्या त्या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा केला जातो. त्यातील साडेतीन शक्तिपिठे तर एकट्या महाराष्ट्रातच आहेत. माहूरची रेणुका माता,तुळजापुरची तुळजाभवानी माता, कोल्हापूरची अंबाबाई माता ही तीन पूर्ण पीठे आणि सप्तशृंगी  गडावरील  सप्तशृंगी माता हे अर्धे पीठ मानले जाते. ही साडेतीन शक्तिपिठे जागृत देवस्थाने मानली जातात .वैष्णवी देवीपासून कन्याकुमारी पर्यंत असलेल्या देवीमातेच्या सर्व मंदिरात हा उत्सव आपल्या आपल्या पद्धतीने साजरा केला जातो ,पश्चिम बंगाल, आसाम , मध्यप्रदेश,त्रिपुरा आणि उत्तर प्रदेश या प्रांतात अश्विन शुद्ध पंचमीपासून अश्विन शुद्ध नवमी पर्यंत दुर्गा पूजा किंवा कालिमातेचा महोत्सव साजरा केला जातो. दुर्गामातेच्या उंच प्रतिकृती तयार करून त्यांची रथातून मिरवणूक काढून दसऱ्याच्या दिवशी व