top of page

स्पर्धा परीक्षा : मनाची तयारी, अपयशाचा मुकाबला, यशप्राप्ती आणि करियरमाझं शिक्षण इंजिनिअरींगमध्ये आणि करियर झालं नागरीसेवेत. माझं करियर नियोजनबध्द रितीनं घडलेलं नाही. इंजिनिअर, विक्रीकर अधिकारी वर्ग- १, महाराष्ट्र पोलीस सेवा असा प्रवास होत मी आय.पी.एस.च्या किनाऱ्याला लागलो. त्यामुळं मी स्वत:ला इतरांचा रोलमॉडेल वगैरे समजत नाही.

स्पर्धा परीक्षा हा रोजगाराच्या हायवेवरचा टोलनाका आहे. अभ्यास करुन कुवतसिध्दीची पावती फाडल्याशिवाय रोजगाराचं फाटक उघडलं जात नाही. खाजगी, निमसरकारी, सरकारी किंवा सहकार या सर्व क्षेत्रांसाठी हे लागू असल्याने सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणं क्रमप्राप्त आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी ढोबळ मानानं दहा बाबी लक्षात ठेवाव्यात असं मला वाटतं.

स्वत:शी प्रामाणिकपणं संवाद साधता येणं, ही पहिली महत्वाची गोष्ट आहे. करिअर घडवण्यासाठी आखलेल्या कल्पनांना योग्य ते प्रारुप दिलं तर ते वास्तवात उतरवण्यासाठीचा आराखडा तयार होतो. यासाठी स्पर्धकाकडं ॲपटिट्यूडपेक्षा प्रामाणिक प्रयत्न आणि चिकाटी असायला पाहिजे. “तुला हे जमणार नाही, तुझा काय अभ्यास आहे, आरशात चेहरा पाहिलास का?” अशा मूल्यमापनांकडं दुर्लक्ष करावं.


तुम्ही हुशार असाल तर तुमच्यापुढं पर्याय उपलब्ध असतात. परंतु सर्वसामान्य बुद्धीमत्ता असेल (जी माझी होती असं मी मानतो) तर सर्वतोपरी प्रयत्न करुन कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात यश पदरात पाडून घेऊन स्थिरस्थावर होणं महत्वाचं ठरतं. आपल्या बुद्धीला अथक परिश्रमांची जोड देण्याची तयारी ठेवली तर आहे ती नोकरी टिकवून दुसरी आपल्या मनाजोगी नोकरी मिळवता येऊ शकते.

दुसरं, लक्षात घ्या की, ज्या गोतावळ्यात आपण वाढतो त्याला सोडून जायला आपलं मन सहजासहजी तयार होत नाही. वास्तविक पाहता आपली प्रगती कित्येकदा जवळच्यांपेक्षा बाहेरच्या लोकांच्या सहकार्याने लवकर होते. आपले आई-वडिल हेच आपले मुख्य हितचिंतक मानावेत. बाकीच्यांकडून मिळणारं प्रोत्साहन मनापासून असेल याबद्दल किंचितसं साशंक राहाणं नेहमी चांगलं. आपल्या अवतीभवती असणारी मित्रमंडळी महत्वाकांक्षी असतीलच असं नाही. करियरसाठी बहुदा स्थलांतर करणं आवश्यक ठरतं. अज्ञाताची भीती मनातून काढून टाकली तर यशाची द्वारं आपल्यासाठी खुली होतात. मनाचा हिय्या करून आपला गोतावळा एकदा सोडला तर बाहेर प्रचंड महत्वाकांक्षा असणारी मंडळी भेटते.


महत्वाकांक्षा हा गुण आपल्यात उपजत असेलच असं नाही. बऱ्याच वेळा इतरांचे प्रयत्न यश बघून आपल्याला स्फूर्ती मिळते. नेहमी कर्तृत्वाला महत्व देण्याची सवय लावून घेणं बरं. स्थलांतर केलेल्या शहरांमध्ये आपल्या कर्तृत्वाला बऱ्यापैकी वाव मिळतो आणि आयुष्यभराचे मित्रही मिळतात. कॉलेजचं शिक्षण पूर्ण होताहोताच स्पर्धा परीक्षांच्या तयारीला सुरुवात केली पाहिजे. जगदीश खेबूडकरांच्या भाषेत सांगायचं तर “आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा”.

तिसरं म्हणजे आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असलो तरी अभ्यासाच्याबाबतीत आपल्या सर्कलमधल्या मुलांशी स्पर्धा करण्याची आवश्यकता नाही. टीममध्ये खेळत असल्यासारखं राहाणं चांगलं. काही लोकांच्या कोत्या मनोवृत्तीमुळं स्टडीसर्कलचं वातावरण उगीचच दूषित होतं. अभ्यास करताना आपल्या नोट्स इतरांना दाखवणं, लपूनछपून अभ्यास तर करणं पण, आपण काहीच अभ्यास केला नाही असा इतरांचा समज करून देण्याचा प्रयत्न करणं, आपल्याला जे माहिती आहे ते इतरांशी शेअर करणं इत्यादी प्रकार चालतात. ही कुणाची वृत्ती असेल तर त्याच्या यशाच्या वाटचालीतला तो मोठा अडथळा ठरतो. अशी व्यक्ती एकटी पडते आणि तयारीच्या दृष्टीनं ग्रुपमध्ये होणाऱ्या चर्चा, सुसंवाद एकंदर विश्लेषणापासून वंचित राहते. सर्वांना पुरून उरेल इतकं या विश्वात सर्व काही आहे. वाटल्यानं ज्ञान वाढतं, हेच खरं आहे. दिलखुलासपणं अभ्यास केला तर अभ्यासाची नशा चढते. ज्ञानप्राप्तीची गोडी लागली तर त्यामुळं कोणती परीक्षा पास होऊ, किती पगाराची नोकरी मिळवू, यश मिळेल किंवा नाही इत्यादी गोष्टी गौण वाटायला लागतात आणि केवळ ज्ञानरंजन हीच मुख्य गोष्ट होऊन बसते. असं वाटायला लागतं किंवा या अवस्थेला आपण पोहोचतो, त्यावेळी आपण आपल्या उद्दिष्टाच्या अगदी जवळ आलो आहोत, असं समजायला हरकत नाही.

चौथी गोष्ट, स्वत:ला योग्य प्रकारे ऑर्गनाइज करणं. यामध्ये प्रामुख्यानं वेळेचं व्यवस्थापन हा अतिशय महत्वाचा विषय येतो. कुणी कितीही चांगलं कोचिंग दिलं तरी स्पर्धा परीक्षेतलं यश हे स्वत: केलेल्या अभ्यासावरच अवलंबून असतं. प्राथमिकता कशाला द्यायची हे ठरवून हाती असलेल्या वेळेत अभ्यासाचे सगळे टॉपिक कव्हर केल्यास ऐन परीक्षेच्या वेळी उजळणीसाठी वेळ शिल्लक राहतो.


मी बऱ्यापैकी पाठांतर करायचो. काही अतितल्लख मुलांच्या बुध्दीशी बरोबरी करण्यासाठी कधीकधी पाठांतर उपयोगी पडायचं. विशेषत: वेगवेगळ्या व्याख्या, सनावळी, फॉर्म्युले, घटनाक्रम, व्यक्तींची ठिकाणांची नावं, महत्वाच्या तारखा इत्यादी. पाठांतराकडं आजकाल जरा दुर्लक्ष होतं आहे, असं मला वाटतं. एखादं महत्वाचं पाठ्यपुस्तक असेल तर कधीकधी मी त्याची अनुक्रमणिकाच पाठ करून टाकायचो. मनात अनुक्रमणिका घोळवत गेलं की टॉपिक नजरेसमोर राहायचे आणि उजळणी होत जायची. महत्वाचं म्हणजे एखाद्या टॉपिकचा अभ्यास राहिला असेल तर लगेच लक्षात यायचं. इतिहासात वेगवेगळी साम्राज्यं, त्यांचे कालखंड, राजे घटनाक्रम पाठ असेल तर फार फायदा होतो. पाठांतराचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे बुध्दी तल्लख राहते आणि ग्रुपमध्ये होणाऱ्या चर्चांमध्ये हिरिरीनं भाग घेता आल्यानं आपला आत्मविश्वास वाढतो.

पाचवा मुद्दा, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड हा विषय काहींच्या अभ्यासातला मोठा अडथळा ठरतो. हा भावनिक आणि वैयक्तिक प्रश्न असला तरी मला याबाबत सर्वसाधारण स्पष्टीकरण करावं असं वाटतं.


खलील जिब्रान नावाचे तत्वज्ज्ञ प्रेमाबद्दल सांगताना म्हणतात की “जे मनात असतं पण बोललं जात नाही आणि जे बोललं जातं पण तसं मनात नसतं. यामध्ये प्रेम बऱ्यापैकी हरवून जातं.” प्रेमात असाल तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्या मित्र किंवा मैत्रिणीशी सविस्तर चर्चा करावी. एकमेकांकडं आयुष्याचे जोडीदार म्हणून पाहात असाल तर उज्वल भविष्याच्या दृष्टीनं वर्ष-दोन वर्ष सततचा संपर्क सहवास होल्डवर ठेवणं आवश्यक ठरतं. एकदम कट करायची गरज नाही परंतु ठिबक सिंचनासारख्या सतत येणाऱ्या फोनवरच्या मेसेजचा रतीब बंद करणं बरं. अभ्यासादरम्यान मित्र मैत्रिणीशी संवादाचं प्रमुख माध्यम सोशल मीडियावरचे मेसेज हे ठेवलं तर आपलं कामंच झालं म्हणून समजा.


मित्र-मैत्रिण यांच्या समस्या या विवाहित दांपत्यासारख्या स्वत:च तयार केलेल्या असतात. या सततच्या सोशल मिडिया वरील मेसेजेसमुळं प्रेम वाढत नाही, परंतु नात्यातली गुंतागुंत हमखास वाढते आणि मग दिवसेंदिवस ती सोडवत बसायला लागतं. होणारे व्हर्च्युअल संवाद हे संवाद राहात नाहीत. बऱ्याच वेळा हे सोशल मिडीया प्लॅटफॉर्म रणांगणं बनून जातात. “ऑनलाईन तर आहे पण मग उत्तर का देत नाही?” हा त्रिकालाबाधित सुटलेला प्रश्न आहे. घाईघाईनं उत्तर दिल्यास किंवा योग्य प्रोटोकॉल पाळता एखादा वाकडा शब्द गेला की खलील जिब्रानचं भाकीत खरं झालंच. यावर उपाय म्हणजे सोशल मीडिया वर्ज्य. प्रेमाची नशा असेल तर अभ्यासाची नशा येणार नाही. नुसतं फ्लर्टिंग असेल तर त्या नात्याला पूर्णविराम देणं योग्य.

सहा, आपल्याला यश हे आपल्या प्रयत्नांच्या तुलनेत मिळतं. बहुतेकांना टप्याटप्यानं यश मिळत जातं. पहिल्याच प्रयत्नात आय.ए.एस. होऊन महाराष्ट्र कॅडर मिळविणारे विरळाच असतात. मिळेल ते कमीपणा मानता कृतज्ञतापूर्वक स्वीकारावं आणि पुढची पायरी गाठण्यासाठी प्रयत्न करावेत.


तुम्हाला पहिल्या प्रयत्नातच एखादी शासकीय नोकरी मिळाली तर आणखी लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट म्हणजे तुमचं लग्न लावून देण्यासाठी तुम्हाला घेरणारे वरिष्ठ अधिकारी. या मंडळीना तुमच्या करियरवृध्दीची फिकीर नसते. मदत करतो (म्हणजे हुंडा देतो) आयुष्यभर महत्त्वाची पोस्टिंग्ज करून देतो लग्न करा अशा अमिषांना अजिबात बळी पडू नये. आपला स्वाभिमान व करियरवृध्दी नेहमी लक्षात ठेवावी. आपल्या मित्र-मैत्रिणीला दिलेल्या आश्वासनाचा कधीही विसर पडता कामा नये. तुम्ही कुणी नसताना तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला तुमच्या यशामुळं आनंद होतोच परंतु दुर्देवानं अपयश आलं तर तीच व्यक्ती रडायला खांदाही पुढं करते. नोकरीच्या माध्यमातून आपण प्रामाणिकपणं सेवा देणं अपेक्षित आहे, क्रांती घडवून आणणं नाही. स्वाभिमानानं जगताना दिलेल्या कमिटमेंट्स् पाळणं महत्त्वाचं असतं. नाही तर आयुष्यभर अपराधीपणाची भावना टोचत राहिल.

सात, स्पर्धा परीक्षा ही शर्यत आहे. त्या शर्यतीवर आयुष्य पणाला लावण्याची आवश्यकता नाही. यशापेक्षा अपयश हाच स्पर्धा परीक्षांचा नॉर्म आहे. मी अपयशी झालो त्या त्या वेळी मरीन ड्राईव्हच्या कठड्यांवर बसून समुद्राच्या लाटांकडं तासभर पहात राहायचो. त्यानंतर कुर्ल्याला घरी जाऊन एकांतात रडायचो. अश्रूंना वाट करून दिल्यानंतर मनात उमटणाऱ्या भावना डायरीत लिहायचो. ही अपयशाशी सामना करायची माझी स्ट्रॅटेजी होती. त्यानंतर आठ-दहा दिवस परिंच्याला जाऊन जायचो. अपयशाच्या दुखवट्याचा तेरावा ओढ्याकाठी घालून परत मुंबईला येऊन अभ्यासाला सुरुवात करायचो. अपयश माणसाला जमिनीवर आणतं. यश मिळण्यापूर्वीची अपयश ही महत्त्वाची पायरी आहे.

आठ, मुलाखतीसाठी मी कधी जास्त तयारी केली नाही आणि कधी सोंगही आणलं नाही. तुम्हाला राजपत्रित अधिकारी का व्हायचंय, या प्रश्नाला कोणतीही शासकीय नोकरी पाहिजे असं उत्तर ठणकावून सांगायच्या तयारीनं गेलो होतो. मुलाखत बोर्डाच्या तेंव्हाच्या चेअरपर्सन श्रीमती सुमती पाटील यांनी तो प्रश्न काही विचारला नाही. आपण आहोत ते थोडं पॉलिश करुन सादर केलं की, काम होऊ शकतं असं मला वाटतं. मुलाखतीच्या वेळी आपल्याकडं कुणी आपण आधीपासूनच प्रशिक्षित असल्यासारखं पाहाणं अपेक्षित नाही. निवड झाल्यावर ते ते खातं प्रशिक्षण देतंच आणि खरं प्रशिक्षण तर काम सुरू केल्यावरच होतं.

नऊ, पैसे कधीच पुरत नाहीत. माझ्या नशिबानं माझ्या मित्रांमुळं माझ्या अडचणींचं निवारण झालं. मरिन लाईन्सच्या अमेरिकन काऊन्सिल लायब्ररीत बेंजामिन फ्रॅंकलीनचं आत्मवृत्त मी वाचलं होतं. पैसे आणि इतर लहानसहान गोष्टींबद्दल तसंच व्यक्तिमत्व विकासाबद्दलचे त्यांचे विचार मला अनुकरणीय वाटले होते. कधीकधी उसनवारीला पर्याय राहात नाही. मात्र कुणाकडून मदत घ्यायची, हे काळजीपूर्वक ठरवावं. उसने पैसे घेतले तर आपले पैसे हातात येतील तशी उसनवारी भागवून टाकावी. हजार रूपये उसने घेतले होते, परंतु द्यायला फक्त दोनशेच आहेत तर कसे द्यावेत, असा संकोच करू नये. रक्कम कितीही कमी असली तरी उधार देणारा आपण आग्रह धरल्यास ती स्वीकारतो. थोडे थोडे करून पैसे परत केल्यामुळं आपली पत राहते आणि मैत्रीसुध्दा टिकते. माझ्या उमेदवारीच्या काळात मला ज्यांनी मदत केली, त्यांच्याप्रती मी सदैव कृतज्ञ राहिलो. कर्मधर्मसंयोगानं पुढं त्यांच्यापैकी काहीजणांना माझ्याकडून थोडीफार मदत होऊन त्यांचं ऋण फेडण्याची संधीही मला मिळाली. दहा, शिक्षणाच्या आणि स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाच्या काळात खाण्यापिण्यावर काटेकोरपणं लक्ष देऊन रोग्याची काळजी घेतली पाहिजे. मित्रांच्या मैफिली, लग्नसमारंभ, वाढदिवसाच्या पार्टीज, दूरचे प्रवास यांना या काळात फार महत्व देऊ नये.


पैशांची कडकी असताना आपण कसे राहतो यावर पुढे गरजा मर्यादित ठेऊन स्वाभिमान जपण्याची सवय लागते. कर्जमुक्त आयुष्य जगण्याची सवय आपल्याला पुढे समाजामध्ये फोफावलेल्या चंगळवादाशी सामना करायला उपयोगी पडते.


(आनंदयात्री पोलीस अधिकाऱ्याची डायरी: जयंत नाईकनवरे/ ग्रंथाली प्रकाशन)

ईमेल: jaynaiknavare@hotmail.com


 

विश्व मराठी परिषदेचे टेलीग्राम चॅनेल सबस्क्राईब करा.

1,206 views1 comment

1 Comment


Aditya Dighe
Aditya Dighe
Dec 22, 2020

खूप सुंदर लेख. नक्कीच प्रेरणा मिळाली वाचून. मी देखील संगणक अभियंता असून भारतीय लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी होणाऱ्या एस.एस.बी मुलाखतीसाठी नोकरी करता करता पुन्हा एकदा प्रेरणा मिळाली. आपण मार्गदर्शन करत असाल तर कृपया मला प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती.

Like
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page