माझ्या मार्गदर्शक, गुरूंना गुरुपौर्णिमेनिमित्त नमस्कार!!!
वृत्त : आनंदकंद
संस्कार ज्ञान दृष्टी आधार गुरुकृपेने...!
येतो घड्यास सुंदर आकार गुरुकृपेने..!
सारा प्रवास होतो आतून हा निरंतर...
देतो दिशा विचारी...उद्धार गुरुकृपेने...!
काढून दोष सारे जपतात सद्गुणांना...
स्वप्नातली सुखेही साकार गुरुकृपेने...!
घेण्यास ती परीक्षा करती कठोर वाणी
शब्दास ये झळाळी अन धार गुरुकृपेने..!
देतो न राखता तो..झिजतो तुझ्याचसाठी
शिष्यास नाव मिळते... सत्कार गुरुकृपेने!
राहो कृपा सदाची लागो न गर्ववारा...
पेलून घे यशाचा हा भार गुरुकृपेने..!
जाणून पायरीला होवो विकास आता..
फिटु दे मनातला या अंधार गुरुकृपेने...!
स्वाती यादव, पुणे
१३-०७-२०२२.
मो: 9673998600
गुरुपौर्णिमा । गुरूवंदना
Comments