top of page

चॅट जीपीटी नावाचे अत्याधुनिक गारूड



डिजिटल तंत्रज्ञानात होणाऱ्या प्रगतीमुळे आपल्या जीवनशैलीत आणि व्यवसायात आमूलाग्र सकारात्मक बदल होत आहेत. यासाठी मोबाईल तंत्रज्ञान आणि प्रगत इंटरनेट तंत्रज्ञानाच्या प्रसाराचे आभार मानायला हवेत. आजघडीला डिजिटल तंत्रज्ञानाचा स्पर्श झाला नाही असं कोणतंही उद्योगक्षेत्र नाही. या सर्व तंत्रज्ञानांमध्ये प्रचंड वेगाने विकसित होणारे आणि आमूलाग्र बदल घडवणारे जर कोणते तंत्रज्ञान असेल तर ते म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटलिजन्स (Artificial Intelligence-AI). एखाद्या डिजिटल कंप्युटरची क्षमता किंवा बौद्धिक क्षमता असलेल्या म्हणजेच माणसाशी संबंधित कामे करण्याची संगणक नियंत्रित रोबोची क्षमता म्हणजेच आर्टिफिशयल इंटलिजन्स. यामध्ये आकलनशक्ती, भाषा ओळखणे, निर्णय क्षमता आणि विविध भाषांमधील भाषांतरे आदींचा समावेश होतो.


मानवी संभाषणाचे अनुकरण करणारा चॅटबॉट हा संगणकांमधील कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधीचा प्रोग्राम आहे. याद्वारे व्हॉईस कमांड म्हणजेच आवाजावरून किंवा लिहून (टेक्स्ट) किंवा दोन्ही मार्गांनी दिलेल्यासूचनांमधून मानवी संभाषणाचे अनुकरण केले जाते. बारा महिने, चोवीस तास ग्राहकसेवेच्या आजच्या जमान्याततातडीने आणि हवी तेव्हा, आवश्यक ती माहिती न मिळाल्यास अनेकदा व्यवसायात निराशा पदरी येते. या निराशाजनक अनुभवाचे सकारात्मक अनुभवात रूपांतर करण्यासाठी चॅटबॉटअत्यंत प्रभावी अस्त्र ठरत आहे. त्यासाठी अनेक व्यवसायांचाचॅटबॉट हाअविभाज्य घटक बनला आहे. डिजिटल तंत्रज्ञानामध्येक्रांतीघडवण्याची क्षमता असणारा नवीनतम प्रयोग म्हणजे सॅन फ्रान्सिस्कोमधील ओपन एआय या कंपनीने नोव्हेंबर २०२२मध्ये जारी केलेला चॅट जीपीटी (जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर) हा आहे. यामुळे सायबर विश्वात अक्षरश: खळबळ उडाली. अगदी नुकत्याच पार पडलेल्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेतदेखील हा विषय कायम चर्चेत राहिला.त्यावर एक नजर टाकूया.


चॅट जीपीटीची सुरुवात

यापूर्वी २०१६मध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीने ते नावाचे आणि ऑगस्ट २०२२मध्ये मेटा कंपनीने ब्लेंडबॉट नावाचे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅटबॉट बाजारात आणले होते. मात्र ग्राहकांना ते उद्धट आणि वंशवादी किनार असणारे व चुकीची माहिती देणारे वाटले. त्यामुळे त्यांचा टिकाव लागला नाही. ओपन एआय या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातील संशोधनकार्य करणाऱ्या प्रयोगशाळेची स्थापना सॅम आल्टमॅन, एलन मस्क आणि अन्य काही जणांनी २०१५च्या अखेरीस केली. खुले स्रोत आणि विनानफा संस्था हे त्याचे वैशिष्ट्य ठेवले. मानवतेला उपयोगी पडेल अशा मैत्रीपूर्ण पद्धतीने एआयचा प्रचार आणि विकास करण्याच्या दृष्टीने या क्षेत्रात संशोधन करणे हे त्याचे उद्दिष्ट निश्चित केले. प्रसृत केल्यानंतर फक्त पाच दिवसांतच त्याचे दहा लाखांपेक्षाही जास्त वापरकर्ते झाले आणि ही संख्याही दिवसागणिक वाढतच आहे.


यापूर्वीच्या अनुभवांतून धडा घेऊन ओपन एआयने चॅट जीपीटीमध्ये एक विशेष तंत्रज्ञान (अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेस - एपीआय) विकसित केले आहे. यामुळे काही आक्षेपार्ह मजकूर निर्माण होण्यास प्रतिबंध होतो. एखाद्या प्रश्नातील मानवी हेतू लक्षात घेऊन त्यादृष्टीने मदत होईल, सत्याधारित आणि विनाजोखीम उत्तरे देण्यासाठी चॅट जीपीटीला विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. नेमकी हीच गोष्ट चॅट जीपीटीला अन्य चॅटबॉटपासून वेगळी ठरवते. ग्राहकांच्या शंका आणि अनेक ज्ञानशाखांमधील कुठल्याही प्रश्नांना सविस्तर उत्तरे देण्यासाठी, चॅट जीपीटीमध्ये तत्परतेने लक्ष केंद्रित केले जाते. द न्यूयॉर्क टाईम्स या जगविख्यात दैनिकानं त्याचं वर्णन “सर्वसामान्य जनतेसाठी तयार करण्यात आलेला, सरस कृत्रिम बुद्धिमत्ता असलेला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट चॅटबॉट,” असं केलं आहे.


चॅट जीपीटीचं प्रशिक्षण

जीपीटी ३.५ ला प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने संवाद आणि मानवी शैली शिकण्यासाठी मदत करण्याच्या उद्देशाने इंटरनेटवरील रेडिट समुदायातील चर्चांसह कोड आणि माहिती यांच्यासारख्या असंख्य स्रोतांसह मोठ्या प्रमाणावर डेटाचे प्रशिक्षण देण्यात आले. पुस्तके, विकीपीडियावरील लेख, कंम्प्युटर प्रोग्राम्स आणि चॅट लॉगसह लिखित मजकुराचे मोठ्या प्रमाणावर विश्लेषण करून हे कौशल्य विकसित केले गेले आहे.


रीएन्फोर्समेंट लर्निंग विथ ह्यूमन फीडबॅक (आरएलएचएफ) म्हणजेच मानवी प्रतिसादासह वाचन अधिक चांगले करणे हा या प्रशिक्षणाचा आणखी एक टप्पा होता. आरएलएचएफ मानवी अभिप्रायाचा वापर करून चॅट जीपीटीला दिशानिर्देशांचे पालन करण्यासाठी आणि माणसांसाठी समाधानकारक प्रतिसाद निर्माण करण्यासाठीच्या क्षमतेमध्ये निष्णात बनवले आहे. अशा प्रकारे संभाषणात्मक संवाद साधण्याची आणि अगदी मानवासारखेच वाटतील असे आश्चर्यकारक प्रतिसाद देण्याची विशेष क्षमता यामध्ये आहे.


चॅट जीपीटीमध्ये मशिन प्रशिक्षण आणिभाषासंगती प्रारूप (लार्ज लँग्वेज मॉडेल - एलएलएम) या तंत्रज्ञानांचा सुयोग्य वापर करण्यात आला आहे. त्यामुळे एका वाक्यामध्ये, तसेच पुढच्या वाक्यांमध्ये कोणता शब्द पुढे येऊ शकतो, याचा अचूक अंदाज लावण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डेटासह प्रशिक्षण दिले गेले आहे. याचाच अर्थ हे स्वयंपूर्ण आणि विश्वासार्ह, पण गुंतागुंतीचेही आहे. याच क्षमतेमुळे परिच्छेद आणि अगदी संपूर्ण पानभरूनही मजकूर लिहिले जातात. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार, जीपीटी ३ला १७५अब्ज निष्कर्ष लावण्यात आले आहेत आणि ५७० गिगाबाइटमजकुराचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. डेटाचे प्रमाण जितके जास्त तसे भाषा प्रतिरूप म्हणजे भाषा मॉडेलची कार्ये पूर्ण करण्याची क्षमताही वाढते. चॅट जीपीटीला ज्ञानाचे विस्तृत प्रशिक्षण देऊन ते विविध क्षेत्रांमध्ये लागू केले जाऊ शकते.



चॅट जीपीटी : व्यवसाय प्रस्ताव

चॅट जीपीटीबद्दल संशोधन करून त्यावरचा प्रतिसाद देण्याच्या वेळेसाठी (रीसर्च प्रीव्ह्यू टाइम) सध्या वापरकर्त्यांना चॅट जीपीटीचा वापर विनामूल्य आहे. चॅट जीपीटीमध्ये अधिक सुधारणा करण्यासाठी ओपन एआय वापरकर्त्यांकडून प्रतिसाद गोळा करत आहे. प्रत्यक्ष जगातील, विरोधी नसलेल्या परिस्थितीत अनुभव येऊ शकणाऱ्या हानिकारक संबंधित प्रतिसादावर आधारित नवीन धोके कमी करण्याचा त्यांचा हेतू आहे. चुकांमधून धडा घेऊन प्रश्नांना अधिक चांगल्या पद्धतीने उत्तरे देता यावीत, हा यामागचा हेतू आहे.


चॅट जीपीटी हे त्याच्या वैविध्य आणि सुधारणा कौशल्यांमध्ये अत्यंत अनोखे आहे. यामध्ये संगणक प्रणाली लिहिण्याची आणि त्यातील दोष काढून टाकण्याच्या क्षमतेचा समावेश आहे. म्हणजे संगीत तयार करणे, टेले प्ले, परीकथा आणि विद्यार्थ्यांचे निबंध लिहिण्यासारख्या गोष्टी यामध्ये येतात. इतकेच नव्हे, तर परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे देणे आणि कविता, गीतांचे शब्दही लिहू शकते. एकाच संवादातील आधी सांगितलेल्या शब्दांची सुधारणा किंवा शब्द सुचवणे हेही चॅट जीपीटी लक्षात ठेवते. हे कौशल्य अन्य चॅटबॉटमध्ये नाही.


चॅट जीपीटी क्षमतांचा वापर करून लेख, ब्लॉग पोस्ट आणि अगदी संपूर्ण पुस्तकांचा मजकूर यासारखे साहित्य लिहिले जाऊ शकते. ग्राहक सेवेला चालना देण्यासाठी प्रश्नांना जलद आणि अचूक प्रतिसाद देणे हाही एक महत्त्वाचा घटक आहे. उत्पादने आणि / किंवा सेवा व्यूहरचनेमध्ये सुधारणा करण्यासाठी ग्राहक वर्तन आणि प्राधान्य याबद्दल दूरदृष्टी देऊन संशोधन सोपे करण्यासाठी चॅट जीपीटीची मदत होऊ शकते.


ग्राहक सेवा हे आणखी एक महत्त्वाचे क्षेत्र आहे ज्यामध्ये चॅट जीपीटी योगदान देऊ शकते. ग्राहकांची २४ तास अशी सेवेची मागणी पाहता, अनेक कंपन्या ही गरज पूर्ण करण्यासाठी कमी स्रोतांमध्ये आणि किफायतशीर असलेल्या चॅटबॉटचा वापर करत आहेत. चॅट जीपीटी हे सर्वव्यापी आहे. म्हणजेच ते वेबसाईटबरोबरच त्यांचे अ‍ॅप आणि त्यांच्या सोशल मीडिया मंचांवरही उपलब्ध आहे. ग्राहकांच्या आवडी पूर्ण करण्यासाठी ते अनेक बदल करून ग्राहक रणनीतीमध्ये त्याचे एकत्रीकरण करते. ग्राहकांना उत्पादने सुचवून आणि त्यांना ग्राहक खरेदी प्रक्रियेतही मदत करून चॅट जीपीटी विक्री वाढीलाही चालना देते. त्यामुळे उत्पन्नात वाढ होऊन त्याचबरोबर ग्राहकही समाधानी होतात.


तुमच्या ब्रँडमध्ये ज्यांना स्वारस्य आहे अशा लोकांकडून महत्त्वाची माहिती गोळा करून चॅट जीपीटी तुमच्या मार्केटिंगमध्येही सुधारणा करते. त्याशिवाय ते मार्केटिंगचे नेमके लक्ष्य ठरवून नियोजन, माहितीचा साठा करू शकते आणि ग्राहकांचे वर्गीकरणही करू शकते. एआय चॅटबॉटशी झालेल्या संवादातून मिळालेल्या माहितीच्या आधारे, व्यावसायिक त्यांचे ब्रँड साहित्य वैयक्तिकृत करू शकतात. आभासी सहायकांमध्येही (व्हर्च्युअल असिस्टन्स) चॅट जीपीटी क्रांती घडवत आहे. अॅपलचे सिरी किंवा अॅमेझॉनचे अलेक्सा ही आभासी सहाय्यकाची उत्तम उदाहरणे आहेत. पण संवादाचे संदर्भ समजून घेण्यात आणि त्याच्याशी संबंधित प्रतिसाद देण्यात मात्र त्यांच्या क्षमतेवर मर्यादा आहेत. शक्तिशाली एआय चॅट जीपीटीमुळे अधिक चांगला, नैसर्गिक आणि उपयुक्त प्रतिसाद मिळू शकतो. चॅट जीपीटीमुळे विविध भाषा बोलणाऱ्या लोकांमधील प्रत्यक्ष संभाषण समजून घेऊन लगेचच भाषांतर केले जाऊ शकते.


अशाप्रकारे वंशवादी किंवा लिंगभेदी असल्याचे आरोप फेटाळले जातात.


चॅट जीपीटीच्या मर्यादा

चॅट जीपीटी जरी अगदी आश्चर्यकारक गोष्ट करू शकत असले तरीही ती कामे करण्यासाठी आणि त्याद्वारे तयार केलेल्या गोष्टी वापरण्यासाठी मानवी हस्तक्षेपाची गरज असते. त्यामुळे चॅट जीपीटी हा माणसाला पर्याय आहे का, हा प्रश्नच उद्भवत नाही. चॅट जीपीटी अजूनही विकासाच्या अंतिम टप्प्यात आहे आणि त्यातील त्रुटी दूर करण्याचे कामही अजून सुरू आहे. चॅट जीपीटीची असमान तथ्यात्मक अचूकता ही एक महत्त्वाची त्रुटी आहे. कारण काहीवेळेस त्याच्याकडून योग्य भासणारी पण प्रत्यक्षात तशी नसणारी चुकीची आणि निरर्थक उत्तरेही लिहिली जातात. त्यामुळे आऊटपुट म्हणजे उत्पादनाची गुणवत्ता ही इनपुटच्या अर्थात आतमध्ये कोणती माहिती भरली जात आहे, त्यावर अवलंबून असते. चॅट जीपीटी इंटरनेटशी जोडण्यात आलेले नाही आणि त्यामुळे त्याच्या प्रशिक्षणादरम्यान जे काही शिकले आहेत, त्यावरच आधारित ते प्रतिसाद देऊ शकते.


समाजावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या हिंसेला प्रवृत्त करणारा कोणत्याही माध्यमामधील (टीव्ही, फिल्म किंवा व्हिडिओ गेम्स) मजकूर किंवा लिंगभेद दर्शविणारा किंवा समाजासाठी घातक असणारा कोणताही मजकूर तयार न करण्यासाठी चॅट जीपीटीला प्रोगाम करण्यात आले आहे. स्फोटक उपकरणं कशी तयार करावीत अशासारखे मजकूर तयार केले जाऊ नयेत किंवा प्रसारित करू नयेत यासाठी प्रोग्राम केले गेले आहे. चॅट जीपीटी किचकट प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही; काहीवेळेस ग्राहकांच्या विनंतीचा ते चुकीचा अर्थ काढू शकते किंवा चुकीची आज्ञा देऊ शकते. २०२१नंतरच्या घटनांबद्दल चॅट जीपीटीला माहिती नाही. त्यामुळे ती त्याची सध्याची आणखी एक कमरता आहे. त्यामुळे तुम्हाला अधिक अद्ययावत आणि ताजी माहिती आवश्यक असल्यास सध्याच्या रूपातील चॅट जीपीटी तुमच्यासाठी फारसे उपयुक्त नाही.


आणखी एक महत्त्वाची मर्यादा म्हणजे चॅट जीपीटीमधून नकारात्मकता काढण्यासाठी त्याला अधिक सहाय्यभूत, सत्य आणि निरुपद्रवी होण्याचे प्रशिक्षण दिले गेले आहे.मशिनमध्ये टाकण्यात आलेले हे हेतूपुरस्सर पूर्वग्रह असतात आणि त्याचा उत्पादनावर म्हणजेच आऊटपुटवर कसा प्रभाव पडतो याबद्दल जागरुकता असणे गरजेचे आहे.



रोजगारावर परिणाम

चॅट जीपीटीमुळे ज्ञानाधिष्ठित कामगारांच्या मागणीवर परिणाम होईल, असे मत २०२२च्या डिसेंबरमध्ये लिहिलेल्या एका लेखात अर्थशास्त्रज्ञ पॉल क्रुगमन यांनी मांडले होते. भविष्यातील सर्च इंजिन म्हणून चॅट जीपीटीमध्ये क्षमता आहे. त्यामुळे सर्च इंजन ऑप्टिमायझेशन (एसइओ) तज्ञांसारख्या डिजिटल मार्केटिंग व्यावसायिकांवर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.


सायबर सुरक्षेवर परिणाम

चॅट जीपीटी फिशिंग मेल्स आणि मालवेअर लिहिण्यासही सक्षम आहे आणि त्यामुळे सायबर सुरक्षेचा मोठा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे कमी कौशल्य असलेल्या लोकांना प्रणाली लिहिणे आणि सायबर हल्ले सहज करण्यास मदत होऊ शकेल, अशी भीती व्यक्त करण्यात येते.


शैक्षणिक परिणाम

विद्यार्थी चॅट जीपीटी वापरून लेखन चोरी करू शकतात, हा मोठा धोका आहे. चार परिच्छेदांचा निंबध लिहिणे किंवा अवघड गणिती प्रश्न सोडवणे अशी कामे चॅट जीपीटी अगदी सहजपणे ताबडतोब करू शकतो. त्यामुळे गृहपाठ करण्यासाठी काही तास अभ्यास करणे ही गोष्ट कदाचित इतिहासजमा होईल, अशीही भीती आहे.


पत्रकारिता आणि माध्यमांवरील परिणाम

माणूस ज्याप्रकारे लिहू शकतो तसा मजकूर सुचवणे यामुळे पत्रकारांची जागा तंत्रज्ञान घेऊ शकते, हे स्पष्ट दिसते. मात्र त्याच्या सध्याच्या टप्प्यावर त्यामध्ये गांभीर्याने, सूक्ष्मतेने विचार करण्याची क्षमता किंवा नैतिकदृष्ट्या निर्णय घेण्याची क्षमता यांचा अभाव आहे.


गुगलने याआधीच लँग्वेज मॉडेल फॉर डायलॉग अ‍ॅप्लिकेशन्स (एलए एमडीए) हा एआय चॅटबॉट तयार केला आहे. एलए एमडीएचे कार्य माणसाच्या संभाषणाच्या इतके जवळ होते, की त्यामुळेच ते संवेदनशील असल्याचा दावा गुगलच्या एका अभियंत्याने केला होता.

चॅट जीपीटीचे भविष्य

प्रश्नोत्तरांच्या स्वरुपातील चॅट जीपीटी कदाचित एक दिवस गुगलची जागा घेणार असल्याचेही बोलले जात आहे. चॅट जीपीटी एखाद्या सर्च इंजिनची जागा घेईल, असे आतापर्यंत मिळालेल्या प्रतिसाद आणि प्रगतीच्या आधारे तरी म्हणता येत नाही. अर्थात तंत्रज्ञानाची अजून बरीच प्रगती होणे बाकी आहे. त्यामुळे भविष्यात एखाद्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी हायब्रीड सर्च आणि चॅटबॉटची कल्पना करणेही अशक्य नाही.


चॅट जीपीटी हे मायक्रोसॉफ्टच्या अझूर क्लाऊडमध्ये होस्ट केलेले आहे. शोधाचे परिणाम आणि युजर्सचा अनुभव हे दोन्ही सुधारण्यासाठी चॅट जीपीटीचे चॅटबॉट एकत्रित करून त्याचे बिंग सर्च इंजिन अद्ययावत करण्याची मायक्रोसॉफ्टची योजना आहे. यामुळे विचारलेल्या प्रश्नांची फक्त लिंक्सची सूची देण्याऐवजी संपूर्ण वाक्यांसह उत्तरे देण्यास मदत होईल. चॅट जीपीटी ४.० हे मार्च महिन्याच्या अखेरीस प्रसृत केले जाण्याची अपेक्षा आहे. मायक्रोसॉफ्टला गुगलपेक्षा जोरदार टक्कर देण्याचा त्यांचा हेतू आहे. त्यांनी २०१९मध्ये ओपन एआयमध्ये जवळपास एक अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. ओपन एआयमध्ये २९ अब्ज डॉलरचे मूल्य असलेले ४९% शेअर निव्वळ करण्यासाठी ओपन एआयमध्ये १० अब्ज डॉलर गुंतवणुकीसाठी मायक्रोसॉफ्टने चर्चा केली आहे, असे वृत्त बातम्यांमध्येही देण्यात आले होते.


मायक्रोसॉफ्ट आणि ओपन एआयने चॅट जीपीटीची क्षमता वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात डेटा प्रशिक्षण देण्यासाठी एक नवीन प्रकारचा सुपर कंम्प्युटर तयार केला आहे. मायक्रोसॉफ्ट आता त्याच्या वर्ड, पॉवर पॉइंट आणि आउटलुक यांसारख्या उत्पादनांमध्येही ओपन एआय तंत्रज्ञान समाविष्ट करण्याचा विचार करत आहे.

चॅट जीपीटी हे त्यांच्याकडे वैयक्तिक ग्राहक अनुभव क्षमता असल्यामुळे व्यवसाय संवादाची पद्धतीत बदल घडवत आहे आणि त्यांच्या ग्राहकांना समजून घेत आहे. चॅट जीपीटी हे ग्राहक सेवा, एकात्मिक प्रक्रिया आणि मार्केटिंगच्या प्रयत्नांद्वारे कंपन्यांचे पैसे वाचवत असल्यामुळे चॅट जीपीटीचे भविष्य आशादायी आहे.


चॅट जीपीटीचा वापर करणारे आणि व्यवसाय यांना त्याच्या वापराचे पैसे मोजावे लागतील. चॅट जीपीटी प्रोफेशनलचे कार्यक्षेत्रही अधिक व्यापक असेल आणि ते अधिक वेगाने काम करेल. २०२३मध्ये ओपन एआयला २० कोटी डॉलर एवढ्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.


कंपनीच्या वेबसाईट, अ‍ॅप आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर चॅटबॉटचा समावेश करून घेण्याची प्रचंड क्षमता आहे. आज अनेक मर्यादा असूनही चॅट जीपीटीकडे उज्ज्वल भवितव्य म्हणून अनेकजण पाहत आहेत. जनरेटिव्ह एआय ही पुढच्या युगाची परिभाषा आहे. यामुळे इंटरनेटशी आपला संवाद बदलणार आहे.


डॉ. रवींद्र उटगीकर

(लेखक व्यवस्थापन तज्ज्ञ असून, उद्योग क्षेत्रामध्ये गेली तीन दशके कार्यरत आहेत.)





हा ब्लॉग कसा वाटला याबद्दल कमेंट करा.

विश्व मराठी परिषदेच्या वेबसाईटला सबस्क्राईब करा

1,646 views2 comments

2 Comments


Samapda Padhye
Samapda Padhye
Feb 21, 2023

अत्यंत वैचारिक, माहितीपूर्ण आणि उपयुक्त अशा या लेखासाठी डॉक्टर उटगीकर यांचे मनापासून आभार.

Like

Anil Prayag
Jan 24, 2023

The concept, the uses and the limitations of Chat GPT have been explained so well by Dr.Utagikar! All the members are grateful to him and Vishwa Marathi Parishad! Keep it up!

Like
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page