बेंदूर : संपन्न कृषीसंस्कृतीचा वारसा

पेरण्या झाल्या! पावसानंबी साथ दिल्या. जित्राबं चांगलीच सुराला लागल्यात. खड्या, डोंगर, रानमाळ अगदी हिरवंगार झालंय. आखाड (आषाढ) सुरूय. आखाडी जत्रला सालागत बकरी पडली (कोरोना असला तरी), गावपांढरीच्या भायरनं चरूक शिपला, माणसांनी गुमान पैपाव्हणंबी जेऊ घातलं. सालाची परंपरा हाय ती. औंदा कोरोनामुळं 'बा ईठ्ठलाची, माऊलीची, पांडुरंगाची' आखाड वारी काय माणसास्नी लाभली न्हाय. दिंडीत ईठ्ठल्लापायी चालायची सवय असणारं वारकरी कसंनुसं झालंत. तेवढ्यात दोन दिसात आखाड पोर्णिमेला 'मुळावर' ( आषाढ शु. १४ मुळ नक्षत्रावर) बेंदूर आलाच. (लाॅकडाऊनमुळे मी गावी आहे आणि त्यातही सुट्टीमुळे मामांच्या गावी म्हणजे आजोळी मु. पो. उपवळे, ता. शिराळा येथे आहे.)
बेंदूर म्हणजे बैलांचा सण! कृषीप्रधान महाराष्ट्रात शेतक-याच्या प्रपंचाचा गाडा ओढणारा बैल म्हणजे मालकाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा गडी; अर्थात जीवच. तर बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. बैलाच्या विश्रांतीचा दिन. काही भागात पोळा म्हणून हा दिवस श्रावणी अमावस्येला साजरा केला जातो; पश्चिम महाराष्ट्रात मात्र 'बेंदूर.... आषाढी पोर्णिमेला'.
बेंदूर म्हटलं की बैल, त्यांना आंबील, ऊंडे, पोळी असे गोडधोड खाऊ घालणे, कुंभारमामांनी/मामींनी दिलेले मातीचे बैल, बैलांना हळद- तेलाने बैलांचे खांदे मळणे, त्यांना धुणे, लाल गेरूने रंगविणे, शिंगे रंगविणे, अंगावर रंगीबेरंगी झूल टाकणे, काही गावांत मिरवणूक वगैरे असा एकंदरीत सण! (यावर्षीच्या कोरोनामुळे काही गावांना मिरवणूकीची परंपरा असूनही त्यांनी त्या टाळल्या हे कौतुकास्पद आहे.) मात्र बेंदूर या सणाला फक्त बैलच नाही तर काळ्या आईचेही कृतज्ञतापूर्वक त्र्रण मानून शेतास पिंपळ अथवा आंब्याच्या पानांचे तोरण व पोळी- भाताचा नैवेद्य दाखविला जातो. तसेच गावदैवतांनाही तोरणे, नैवेद्य ठेवला जातो.
शेती म्हटलं की आठवते माती, पीके, धनधान्य, बैल, शेतीची औजारे आणि राबणारा बळीराजा. अवघ्या जगाचा भार वाहणारा भूमिपुत्र! तो मात्र नेहमीच मातीच्या त्र्रणाखाली राहणे पसंत करतो, तीची घाम गाळून सेवा करतो. सालाचं धान्य देणा-या, प्रपंच चालविणा-या भूमातेची कृतज्ञता व्यक्त करण्याचा, तीला पुजण्याचा, वंदन करण्याचा दिवसही हाच बेंदूर! या दिवशी प्रत्येक रानात तोरणासह पोळी-भाताचा नैवेद्य ठेवला जातो. ही तोरणे तयार करण्याची परंपरागत पद्धतही भारी असते. त्याविषयी थोडेसे....
बेंदरादिवशीचे तोरण म्हणजे एका दीड-दोन फूट लांबीच्या, हातावर वळलेल्या दोरीत खोवलेली पाच/सात आंब्याची अथवा पिंपळाची पाने. तोरण जर घराचे, वाड्याचे दरवाजे, धान्याचे टोपले इ. ला बांधावयाचे असेल तर दोरी आवश्यकतेनुसार लांब वळली जाते व पानांची संख्याही वाढते. तोरणासाठी आवश्यक असणारी दोरी शेतकरी स्वतः हातावर वळतो किंवा काही गावांत विशिष्ट बलुतेदार दो-या वळून गरजेएवढ्या प्रत्येक घरी पोहोच करत असतात.
आता या दोरीसाठी लागणारा कच्चा माल (raw material) काय? तर 'मुळूशी'! ही मुळूशी नावाची गवतवर्गीय वनस्पती शक्यतो पाणथळ जमीन, ओढा अथवा नदीकाठास सापडते. शेतकरी ओढ्यातील मुळूशी 'उंदरबीजाच्या' दिवसापासून कापून ठेवतात. आता हे 'उंदीरबीज' म्हणजे गणेश चतुर्थीनंतरचा पहिला दिवस असे जाणती माणसं सांगतात. ही कापलेली मुळूशी नंतर वर्षभर गवताप्रमाणे वाळवून ठेवली जाते आणि बेंदरादिवशी मुळूशीच्या पाच सहा काड्या हातावर वळून 'सेल्फमेड' दोरी (सुतळीसारखी) तयार केली जाते. या दोरीत आंबा अथवा पिंपळाची पाने खोऊन तोरण केले जाते. अशी ही तोरणे प्रत्येक शेतात नैवेद्य्यासोबत ठेवली जातातच तसेच गावदेव, घराचे दरवाजे, चौकटी, नांगर, कुरी, चौफण, तिफण अशी शेतीची औजारे, दावणीची सर्व जनावरे व कुत्रे, गावखताचा (शेणखत) खड्डा, धान्याची टोपली, तसेच परंपरागत धान्य मोजण्याची मापे जसे की मापटे, आडशीरी अशा सर्व शेतीशी निगडीत महत्त्वाच्या बाबींवर कृतज्ञतापूर्वक बांधली जातात. बेंदरादिवशी तोरण बांधणेपूर्वी पेरणीत वापरलेली औजारे स्वच्छही केली जातात व पावसाळा असल्यामुळे लाकडी अवजारे काळजीपूर्वक भिजणार नाहीत अशा पद्धतीने (दास्तानी) ठेवली जातात.
आता काळ झपाट्याने बदलत आहे. हजारो वर्षांपूर्वी जंगलातील कंदमुळे, फळे, कच्चे मांस खाणारा आदिमानव ते आजचा प्रगत मानव ..... या टप्प्यात मानवी बुद्धीच्या उत्क्रांतीमधून हळूहळू विकसित झालेले शेतीचे तंत्र; शेतक-याची माती, बैल व दावणीची इतर पाळीव जनावरे, गावदेव असोत किंवा शेतीची अवजारे इ. प्रती असणारा पिढ्यानपिढ्यांचा जिव्हाळा, श्रद्धा या सर्वांचे देखणे प्रतिबिंब म्हणजे हे विकसित झालेले सण असतात असे मला वाटते.
आजच्या शहरी, टेक्नोसॅव्ही पिढीत ग्रामीण कृषीसंस्कृतीचा ठेवा असणारे सण हे फेसबुक, व्हाॅट्सअॅपवर देखण्या बैलांचे स्टेटस ठेवणे, शुभेच्छा संदेश पाठविणे व गोडधोड करून खाणे एवढ्यावरच मर्यादीत राहत आहेत. आपण काळाचा अगाध महिमा थोपवू तर शकत नाही मात्र आपल्या पूर्वापार चालत आलेल्या संपन्न कृषीसंस्कृतीचा हा वारसा आजही गावगाड्यात पाहू शकतो, अनुभवू शकतो व पुढील पिढ्यांस सांगू शकतो हेही नसे थोडके! तसेच बेंदूर सणाशी निगडीत ग्रामीण प्रथा-परंपरांची 'गावच्या संस्कृतीवर प्रेम' करणा-या गावप्रेमी ह्रदयांत नव्याने उजळणी व्हावी म्हणून हा लेखनप्रपंच!
लेखक: श्री. कैलास वैशाली-सर्जेराव देसाई (भाटशिरगांव, ता. शिराळा, जि. सांगली.)
मो: 8600063705
ईमेल: desaikailas7@gmail.com
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.