top of page

मराठीतील काव्य नक्षत्रे

महाराष्ट्राला समृद्ध साहित्य वारसा लाभला आहे. कादंबरी, कथा, चरित्र अशा या साहित्याच्या डोहातील सगळ्यात छोटा आणि गर्भितार्थ असणारा साहित्य प्रकार म्हणजे "कविता".


12व्या शकतात चक्रधर स्वामी, म्हाइंभट, महदंबा, भास्करभट बोरीकर अशा महानुभाव पंथातील केलेल्या रचनांनी 'काव्य' या प्रकाराला सुरवात झाली. पुढे संत साहित्य , समाजसुधारकरांच्या कविता असा हा प्रवास अगदी आताच्या संदीप खरे, गुरु ठाकूर अशा नवकवींपर्यंत चालूच आहे.

जगणं हे नुसतं जगणं म्हणून न राहता ज्यांनी त्याचीच एक कविता केली , आपल्या ओंजळीत शब्दपुष्प अपर्ण केली. परंतु आजच्या 'मॉडर्न' जगात कविता आणि साहित्य सातत्याने वाचणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे. नवीन पिढीला तर अनेक रत्नांची नावेही माहित नाहीत. अशा 'भाषा आता लोप पावेल का' हि भीती हळूहळू सर्वत पसरत आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन थोडं काम केलं तरी अजूनही या भीतीवर मात करू शकतो. नव्या पिढीला ओळख करून देऊया आपल्या बहुमूल्य साहित्यिकांची.


वर्षातील १२ महिने साजरा करूया उत्सव साहित्यिकांचा, त्यांच्या अवर्णनीय कामाचा आणि त्यांनी आपल्याला बहाल केलेल्या शब्दसुमनांचा. प्रत्येक महिन्यात जन्मलेल्या एका प्रतिभावान कवीची निवड करून वेध घेऊया त्यांच्या योगदानाचा.


जानेवारी - इंदिरा संत


शिक्षकीपेशात असलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाची सुरुवात केली. १९५०च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहिण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. शेला, मेंदी, मृगजळ, रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम, चित्कळा, वंश कुसुम व निराकार असे त्यांचे नऊ स्वतंत्र कवितासंग्रह पन्नास वर्षाच्या कालखंडात प्रसिध्द झाले.

फेब्रुवारी - कुसुमाग्रज


मराठी साहित्य विश्वातील ‘कोलंबस’ म्हणजेच विष्णु वामन शिरवाडकर, साहित्यप्रेमींचे कुसुमाग्रज आणि जनमानसतील तात्यासाहेब ! त्यांना मिळालेल्या अगणित पुरस्कारांमध्ये त्यांच्या साहित्यसेवेसाठी मिळालेला ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार हा अत्युच्च शिखर होय. साहित्य क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च मानला जाणारा हा पुरस्कार मिळवणारे, वि. स. खांडेकर यांच्यानंतर कुसुमाग्रज हे दुसरे मराठी साहित्यिक होते. फक्त मराठी साहित्यात नुसतीच मोलाची भर घातली म्हणून नव्हे, तर आपल्या मातृभाषेला उचित सन्मान मिळावा म्हणून केलेल्या अविरत जनजागरणामुळेच त्यांचा जन्मदिवस अतिशय कृतज्ञतापूर्वक ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.


मार्च - मंगेश पाडगाववार


मंगेश पाडगावकर यांनी तब्बल ७२ वर्षे काव्यलेखन केले. ‘जिप्सी’, ‘छोरी’, ‘उत्सव’, ‘गझल’, ‘सलाम’ हे पाडगावकर यांचे काही प्रसिद्ध कवितासंग्रह. त्यांनी बालगीते, बोलगाणी, गजल, लावणी, मुक्तछंद अशा अनेक प्रकारातील काव्य लिहिले….पण ह्या सगळ्यात लोकप्रिय ठरली ती त्यांची प्रेमगीते! "प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं" ही त्यांची कविता 20 वर्षानंतरही तरुणांच्या मनाला भुरळ घालते.


एप्रिल - सुरेश भट


‘रूपगंधा’, ‘रंग माझा वेगळा’, ‘एल्गार’, ‘झंझावात’ हे त्यांचे काही प्रसिद्ध काव्यसंग्रह. ‘गझल’ हा काव्यप्रकार सुरेश भटांमुळेच सामान्य रसिकांमध्ये लोकप्रिय झाला आणि म्हणूनच त्यांना 'गझलसम्राट' असे मानाने संबोधले जाते. ‘रूपगंधा’, ‘रंग माझा वेगळा’, ‘एल्गार’, ‘झंझावात’ हे त्यांचे काही प्रसिद्ध काव्यसंग्रह. मराठी काव्याला एक नवे, वेगळे वळण लावण्याचे सामर्थ्य त्यांच्या लेखनातून प्रत्ययास येते. आज प्रत्येकाच्या ओठावर असणाऱ्या ‘मराठी अभिमान गीत’ ही भटांचेच आहे.


मे - गोविंदाग्रज


गडकरी यांना महाराष्ट्राचे ’शेक्सपियर’ समजले जाते. अवघे तेहतीस वर्षे आणि काही महिने इतकेच अल्पायुष्य गडकऱ्यांना लाभले पण त्यांनी वाङ्मयीन क्षेत्रात केलेली कामगिरी ‘न भूतो न भविष्यती’ अशीच म्हणता येईल. ‘एकच प्याला’, ‘पुण्यप्रभाव’, सारखी लोकप्रिय नाटकं, कविता व विनोदी लिखाण त्यांनी केलं. ‘गोविंदाग्रज’ या टोपण नावाने त्यांनी आपल्या कविता लिहिल्या व विनोद लेखन ‘बाळकराम’ या नावाने केलं.त्यांनी लिहिलेलं ‘मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा’ ‘महाराष्ट्र गीत’ मराठीतील एक महत्वाचं स्फुर्तिगीत मानलं जातं.


जून - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर


‘मराठी विनोदपीठाचे आद्य कुलगुरू अशी सार्थ पदवी प्र. के. अत्रे यांनी कोल्हटकरांना दिली. आद्य विनोदी लेखक, नाटककार आणि कवी म्हणून ते सर्वज्ञात आहेत. ‘गीतोपायन’ हा त्यांचा प्रसिद्ध कवितासंग्रह. ‘कठीण कठीण कठीण किती’ , ‘उगीच का कांता’, ‘प्रेम तिच्या उपमा नोहे’ ही काही त्यांची प्रसिद्ध नाट्यगीते. त्यांनी लिहिलेलं ‘बहु असोत सुंदर संपन्न की महा । प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा’ हे महाराष्ट्र गीत आजही प्रेक्षकांच्या ओठी आहे.


जुलै - वसंत बापट



'गगन सदन तेजोमय' हे त्यांनी लिहिलेलं अप्रतिम प्रार्थना गीत अजूनही सर्वतोमुखी आहे, त्याप्रमाणेच ‘छडी लगे छमछम’, ‘चांद मातला मातला’, ‘येशील येशील राणी’ ही त्यांची काही प्रसिद्ध गीते. १९५० ते १९९० अशी तब्बल चार दशके मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर आणि बापट या तिघांच्या काव्यवाचनाची मोहिनी कायम होती. त्यांच्या कार्यक्रमांनी काव्यवाचनाची एक वेगळी परंपराच महाराष्ट्रात रुजवली. सेतु ‘ ह्या काव्यसंग्रहास व लहान मुलांसाठी त्यांनी लिहिलेल्या बालगोविंद (१९६५) ह्या नाटकास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला.


ऑगस्ट -आचार्य अत्रे


आचार्य अत्रे यांना मराठीतील उच्च कोटीचे साहित्यकार मानले जाते.विविध विषयांवर अत्र्यांनी केलेल्या लेखनात लहानमोठी चरित्रे, व्यक्तिदर्शने, मृत्यूलेख, प्रवासवर्णने, वृत्तपत्रीय लेख, साहित्यविषयक लेख आणि भाषणे, शालेय पाठ्यपुस्तके इत्यादींचा समावेश होतो. आचार्य अत्रे यांचे आत्मचरित्र ‘कऱ्हेचे पाणी’ हे पाच खंडात विभागले गेली असून त्याची एकूण पृष्ठसंख्या तब्ब्ल २४९३ आहे. साने गुरुजींच्या कथेवर आधारित सुप्रसिद्ध ‘श्यामची आई’ चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन त्यांनी केले.


सप्टेंबर - ना. धो. महानोर


नामदेव धोंडो महानोर गेली ६१ वर्षे कवितेची साधना करीत आले आहेत. त्यांच्या अद्भुत निसर्गकवितांनी, त्यातल्या रंग-गंधानी, नदीच्या प्रवाहासारख्या नाद-लयींनी वाचक-रसिकांना वेड लावलं.‘जैत रे जैत’ (‘नभ उतरू आलं’, ‘मी रात टाकली’ इ.) , ‘अजिंठा’ (‘मन चिंब पावसाळी’, ‘जग जेठी’ इ.), ‘एक होता विदूषक’ (‘गडद जांभळं’, ‘भरलं आभाळ पावसाळी पाहूणा’ इ.) अशा काही अजरामर चित्रपटांसाठी त्यांनी ५० हून अधिक गीते लिहिली. त्यांच्या या वेगळ्या धाटणीच्या लेखणीला अनेक पुरस्कार मिळाले, त्यातील भारत सरकारने दिलेला 'पद्मश्री' पुरस्कार हा सर्वोच्च बहुमान मानला जातो.


ऑक्टोबर- ग. दि. माडगूळकर


या अष्टपैलू कलावंताने कवी, गीतकार, पटकथालेखक, कादंबरीकार, गीतरामायणकार अशा विविध रूपात मराठीसाहित्य क्षेत्रात मुशाफिरी केली.साधारण ४० वर्षाच्या कालखंडात २००० हूनही अधिक गीते तसेच मराठी चित्रपटांसाठी १५७ पटकथा लिहिल्या व अनभिषिक्त सम्राटपद निर्माण केले. ‘गीतरामायण’ हे महाकाव्य म्हणजे तर ग. दि. मां. नी महाराष्ट्राला दिलेला अमूल्य ठेवा होय.त्यांच्या या असामान्य रचने मुळे त्यांना 'आधुनिक वाल्मिकी' ही पदवी दिली गेली.भारत सरकारने १९६९ साली ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.


नोव्हेंबर - बा. भ. बोरकर


गोव्यातील या कोंकणी वल्लीची ‘आनंदयात्री’ कवी म्हणून मराठी साहित्य विश्वात विशेष ओळख आहे. कवी, कादंबरीकार, ललित लेखक, कथाकार व चरित्रात्मक प्रबंधक म्हणून त्यांनी केलेलं कार्य अलौकिक मानलं जातं. 'फुलत्या लाख कळ्या', ‘तव नयनांचे दल हलले गं' या त्यांच्या प्रेमकविता तसेच ‘झिणि झिणी वाजे बीन सख्या रे, अनुदिन चीज नविन’, ‘नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी’ अशी त्यांची गीते आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.राष्ट्रपतींनी १९६७ साली ‘पद्मश्री’ हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला आहे.


डिसेंबर - बा. सी. मर्ढेकर

ज्यांच्या काव्यापासून कवितेचे नवे युग सुरू झाले ते म्हणजे भाषाप्रभू मर्ढेकर. मर्ढेकरांनी कवितेप्रमाणेच कलाविचार, समीक्षा, कादंबरी, नाटक, सांगीतिका या प्रांतातही महत्वाचे योगदान दिले. मराठीत नवटीकेचा प्रारंभ त्यांनीच केला. समीक्षेच्या क्षेत्रातील मर्ढेकरांची कामगिरी संस्मरणीय ठरली.‘शिशिरागम’, ‘काही कविता’, ‘आणखी काही कविता’ हे त्यांचे प्रसिद्ध काव्यसंग्रह.‘वाङमयींन महात्मता’, ‘सौन्दर्य व साहित्य’ इत्यादी समीक्षा ग्रंथातून अत्यंत बहुमोल असा उत्कृष्ट समीक्षालेखनाचा पाठ त्यांनी मराठी रसिकांना बहाल केला.


अशा 12 रत्नांनी मराठीत दिलेलं योगदान आणि मानवंदना म्हणून 'सक्षम फाऊंडेशन' व 'सुकृत क्रिएशन्स' यांनी 'माझा मराठाचि बोलू कौतुके' या ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ओळीलाच शीर्षक बनवत एक दिनदर्शिका काढली. या 12 निवडक अभिजात कवींच्या कामाचा वेध घेत, त्यांच्या काही अजरामर काव्यांची झलक व त्यांची उत्तम रेखाचित्रे दाखवणारी हि दिनदर्शिका एप्रिल 2021 ते एप्रिल 2022 अशा स्वरूपाची असणार आहे. प्रत्येक साहित्यप्रेमीने संग्रही असावी अशी दिनदर्शिका... नव्हे एक एक बहुमूल्य साहित्यिक ठेवा!


या दिनदर्शिकेची संकल्पना अदिती प्रमोद देशपांडे यांची असून सुगम कुळकर्णी यांनी सूत्रधार म्हणून धुरा सांभाळली.

ही दिनदर्शिका घरपोच मिळविण्यासाठी संपर्क - 9137503820 (फक्त Whatsapp)

649 views0 comments

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page