चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या भ्रमणाच्या काळात कृत्तिका नक्षत्र जेव्हां चंद्राच्या सान्निध्यात येते त्या दिवशी सुरू होणाऱ्या महिन्याला कार्तिक महिना असे म्हणतात. भारतभर साजरा होणारा सगळ्यांचा लाडका सण म्हणजे दिवाळी. या काळामध्ये आकाश निरभ्र असते,त्यामुळे आकाशात चमचमणाऱ्या लक्षावधी चांदण्या आणि दिवाळीचा आनंद द्विगुणीत होण्यासाठी लावलेल्या लक्षावधी पणत्या,आकाशकंदील यामुळे संपूर्ण वातावरण अधिकच प्रकाशमान होते. म्हणूनच दिवाळी हा दिव्यांचा सण आहे असे म्हटले जाते. वातावरणातला किंवा आपल्या आयुष्यातला सुद्धा अंधक्कार कमी होऊन आयुष्य या दिव्यांसारखे उजळून जावे अशी या सणामागची कल्पना आहे.अश्विन महिन्यामध्ये वसुबारस,धनत्रयोदशी, नर्क चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन असे दिवाळीतले चार दिवस साजरे केले जातात. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अश्विन अमावास्या असल्यामुळे दिवाळीतले मुख्य दोन दिवस म्हणजे बळीप्रतिपदा आणि भाऊबीज कार्तिक महिन्यात येणाऱ्या प्रतिपदा आणि द्वितीयेला अनुक्रमे साजरे केले जातात.
बळीप्रतिपदेला दिवाळी पाडवा असेही म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णूंनी वामन बटूंचे रूप घेऊन दानशूर आणि उदार मनाच्या बळी नावाच्या राक्षसाला जमिनीत गाडून त्याला पाताळलोकीचे राज्य दिले असे सांगतात. पौराणिक कथेप्रमाणे शंभर यज्ञ करून इंद्राचे राज्य मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या बळीराजाला त्यापासून परावृत्त करण्यासाठी आणि स्वर्गाचे राज्य अबाधित राखण्यासाठी आणि बळीराजाला एक प्रकारे त्याच्या राक्षसी महत्वाकांक्षेपासून दूर ठेवण्यासाठी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला होता.भगवान विष्णूंच्या इच्छेनुसार त्यांना तीन पावले भूमी दान म्हणून देण्यासाठी हातामध्ये कमंडलूतिल पाणी घेऊन संकल्प सोडणाऱ्या बळीराजाला दैत्य गुरू शुक्राचार्यांनी वामन अवतारात आलेल्या भगवान विष्णूंचा हा डाव ओळखून संकल्प सोडण्यासाठी अडविण्याचा खूप प्रयत्न केला परंतु बळीराजाने त्यांचे न ऐकता विष्णूंना हवे ते दान देण्याचा संकल्प सोडला. एक पाऊल स्वर्ग आणि एक पाऊल पृथ्वी व्यापून टाकलेल्या या विराट रुपातल्या भगवान विष्णूंना ओळखून बळीराजाने नम्र होऊन आपले मस्तक तिसरे पाउल ठेवण्यासाठी वाकविले आणि प्रभूंनी त्याला तिसऱ्या पावलाने पाताळात ढकलून पाताळलोकीचे राज्य त्याला दिले. बळीराजा हा एक उत्तम राजा होता,म्हणून भगवान विष्णूंनी बळीराजाच्या गुणांची कदर करण्यासाठी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बळीप्रतिपदा असा म्हटला जाऊन त्या दिवशी बळीराजाची आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची पूजा केली जाईल असा वर दिला होता. या दिवशी नवीन विक्रम संवत्सर सुरू होते. विक्रम संवत कालगणनेचा प्रारंभ या दिवशी होतो. उजैनीचा राजा विक्रमादित्य याने शकांचं आक्रमण परतवून लावलं आणि त्यांचा पाडाव केला.त्या विजयाचे प्रतीक म्हणून राजा विक्रमादित्याने विक्रम संवत ही कालगणना सुरू केली. लक्ष्मी पूजनाला पूजा केलेल्या नवीन वह्या व्यापारी लोक पाडव्याच्या मुहूर्तावर वापरायला सुरुवात करतात. महाराष्ट्रात या दिवशी घरातील सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात आणि पती पत्नीला पाडव्याची ओवाळणी म्हणून काहीतरी भेटवस्तू देतो. नवीन लग्न झालेल्या दांपत्याला मुलीच्या माहेरी बोलावून त्यांचा पहिला दिवाळसण या दिवशी साजरा करण्याची पद्धत आहे. या दिवशी जावयाला आहेर दिला जातो आणि घरामध्ये पंचपक्वान्नांचे मिष्टान्न भोजन केले जाते.उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा असते. श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या मंदिरात ही गोवर्धन पूजा होते. देवाला नैवेद्य म्हणून मिठाईचा आणि पक्वान्नांचा डोंगर उभा केला जातो आणि तो प्रसाद म्हणून वाटला जातो, आणि म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हणतात. भारतामध्ये काही ठिकाणी मातीचा किंवा गाईच्या शेणाचा बळिराजा तयार करून त्याची पण पूजा केली जाते.
दिवाळीतला पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण मुहूर्त म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला येणारा गुढीपाडवा,वैशाख शुद्ध तृतीयेला येणारी अक्षय तृतीया, आणि अश्विन शुद्ध दशमीला येणारा विजया दशमी म्हणजेच दसरा हे होत,आणि दिवाळीतला पाडवा हा अर्धा मुहूर्त म्हणून या दिवसांना साडेतीन मुहूर्त असे म्हणतात. हे मुहूर्त पूर्ण शुद्ध असल्यामुळे या दिवशी इतर दिवसांप्रमाणे कोणतेही शुभ काम सुरू करण्यास मुहूर्त बघण्याची गरज नसते.
आपल्या मराठी पद्धतीप्रमाणे दिवाळीतला सहावा दिवस म्हणजे भाऊबीज असतो.कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच भाऊबीज,भाईदूज किंवा यमद्वितिया. या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाला त्याचे आरोग्य चांगले राहून आयुष्य वाढावे आणि त्याची भरभराट व्हावी यासाठी---
"सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळीते भाऊराया रे
वेड्या बहिणीची रे वेडी माया."
या गाण्यात सांगितल्याप्रमाणे मोठ्या मायेने आपल्या भावाला भाऊबीजेच्या संध्याकाळी आधी चंद्राला आणि मग भावाला ओवाळते.ज्या बहिणींना भाऊ नसतो त्या बहिणी चंद्राला भाऊ मानतात आणि ओवाळतात. आपल्या भावाला अपमृत्यु येऊ नये म्हणून यमराजाची प्रार्थना करून त्याला दीपदान केले जाते. या दिवसाला यमद्वितिया पण म्हणतात.,कारण भाऊबीजेला यमराज आपल्या यमुना नावाच्या बहिणीला भाऊबीज घालण्यासाठी तिच्या घरी जातात,आणि तिच्याकडून ओवाळून घेऊन तिच्या घरी भोजन करून तिला भेटवस्तू देतात असे म्हणतात. काही समाजाचे लोक चित्रगुप्ताच्या मंदिरात जाऊन दौत टाकाची आणि वहीची पूजा करतात.,भाऊबीजेला जर बहीण भावांना भाऊबीजेचा सण साजरा करता आला नाही तर पांडवपंचमी या दिवसापर्यंत केव्हांही हा सण साजरा करता येतो. पांडवपंचमी म्हणजे कौरव पांडव युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या मदतीमुळे पांडवांनी कौरवांवर मिळविलेल्या विजयोत्सवाचा दिवस. उत्तर भारतामध्ये भाऊबीजेला भाईदूज असे म्हणतात.यमराजांची बहीण यमी हिचे पृथ्वीवरचे रूप म्हणजे यमुना नदी , म्हणून भाईदूज या दिवशी उत्तर भारतीयांमध्ये यमुना स्नानाचे महत्व आहे. भाऊबीज हा सण बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला असा मंगल दिवस आहे.
कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिकी एकादशी म्हणून साजरी केली जाते. ही कार्तिकातली मोठी एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी पंढरपूरच्या विठोबाची आराधना,उपासना,पूजा केली जाते.वारकरी लोक या दिवशी आळंदीला यात्रेसाठी आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. आपल्या महाराष्ट्रात खूप लोक या दिवशी उपवास करतात आणि तो उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजे कर्तीकातल्या द्वादशीला सोडतात.आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशी पर्यंतचा चातुर्मासाचा काळ असतो.आषाढी एकादशीला देवषयनी एकादशी असे म्हणतात, तर कार्तिकी एकादशीला देव उठणी किंवा प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात आणि पुन्हा या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्वीकारतात असे मानले जाते.कार्तिकी एकादशीपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह केले जातात आणि या दिवसापासून लग्नसराई सुरू होते. पुराणात म्हटल्याप्रमाणे बळीला विष्णूंनी दिलेल्या वचनाप्रमाणे त्याच्या राज्याचे रक्षण करण्यासाठी बळीच्या राज्यामध्ये विष्णुलोक सोडून द्वारपाल म्हणून पाताळात जातात. हा काळ आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी पर्यंतचा आहे.कार्तिकी एकादशीला भगवान विष्णू स्वगृही परत येतात आणि सृष्टीच्या पालनाचा भार स्वीकारतात, म्हणून आषाढी एकादशी देवशयनी आणि कार्तिकी एकादशी देवउठणी आशा नावाने ओळखल्या जातात. आषाढ महिन्यापासून कार्तिक महिन्यापर्यंत या चार महिन्याच्या काळात पावसाळाच असतो आणि सुर्यदर्शनही बऱ्याच वेळा होत नाही,आणि हवा पण दमट असते,त्यामुळे पचनक्रिया मंदावते आणि उत्सव साजरे करण्याचा उत्साह कमी असतो. अश्विन महिन्यानंतर सूर्याचे ऊन किंवा किरणे चांगल्या प्रकारे पृथ्वीपर्यंत येतात,त्यामुळे हवा शुद्ध होते,उत्साह वाढलेला असतो आणि पचनक्रिया सुधारते म्हणून चतुर्मासामध्ये पूजा अर्चना,निरनिराळी व्रते,उपासतापास करायला सांगितलेले असते पण अश्विन महिन्यानंतर शुद्ध हवेमुळे आरोग्य पण सुधारते त्यामुळे अश्विन महिन्यानंतर सण , उत्सव ,लग्नसमारंभ,गृहप्रवेश असे विधी केले जातात.
कोजागिरीपासून सुरू झालेल्या कार्तिक स्नानाची समाप्ती कार्तिक शुद्ध पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमेला होते. या काळात रोज पहाटे स्नान करून भगवान विष्णू , पांडुरंग यांच्या मंदिरामध्ये पूजा , आरती करून लोणी साखरेचा नैवेद्य दाखविला जातो, याला काकड आरती असे म्हणतात.
त्रिपुरी पौर्णिमेच्या आधीचा दिवस म्हणजे वैकुंठ चतुर्दशी.या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान महादेव यांची पूजा केली जाते,या पूजेला हरिहर भेटीची पूजा असे म्हणतात.
चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर शाळीग्रामरुपी भगवान विष्णूंचा वृंदा म्हणजेच तुळस हिच्याशी विवाह केला जातो. यालाच तुळशी विवाह असे म्हणतात. कार्तिक शुद्ध एकादशीपासून(प्रबोधिनी एकादशी) कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत म्हणजेच त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत हा तुळशी विवाह जमेल त्या दिवशी केला जातो. पुराण कथेप्रमाणे जालंदर नावाच्या दैत्याची वृंदा नावाची पत्नी असते. जालंदर शूर आणि युद्धात प्रवीण असतो.तो देवांचाही पराभव करतो. त्यामुळे इंद्राचे आसन डळमळीत होते. इंद्रदेव घाबरून मदतीसाठी भगवान विष्णूंना प्रार्थना करतात. जालंदरची पत्नी वृंदा ही अतिशय साधी आणि पतिपरायण असल्यामुळे पतिव्रता असते आणि तिच्या पुण्याईमुळे जालंदर सगळी युद्धे जिंकत असतो. भगवान विष्णूंनी इंद्रदेवांना वाचविण्यासाठी जालंदरचे खोटे रूप घेऊन वृंदाचे पातिव्रत्य भंग केले,आणि त्यामुळे वृंदाचे पुण्य कमी झाल्यामुळे जालंदर मारला जातो. आपण फसविले गेलो असल्याचे जेव्हां वृंदाच्या लक्षात येते तेव्हां तिने भगवान विष्णूंना शाप दिला की तुम्ही दगड व्हाल,त्याप्रमाणे विष्णु शालिग्राम रूपामध्ये येतात आणि वृंदा पण मरते. भगवान विष्णूंनी तिला दिलेल्या वरदानाप्रमाणे वृंदा उर्फ तुळशीच्या रोपाच शाळीग्रामशी लग्न लावले जाते.तुळशी विवाहाच्या मागची ही पौराणिक कथा आहे. भगवान विष्णूंना तुळस खूप प्रिय आहे आणि तुळस ही लक्ष्मीचे प्रतीक मानतात. हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्व आहे, त्यामुळे बहुतेक हिंदू कुटुंबियांच्या अंगणात तुळशी वृंदावन असते.,तुळशीला विष्णुप्रिया असे म्हटले जाते. तुळशीमुळे तिच्या आसपासच्या वातावरणातील हवा शुद्ध होते. तुळशीपत्रांचा अर्क बऱ्याच आजारांवर रामबाण उपाय आहे
वैकुंठ चतुर्दशीनंतर येणारा दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध पौर्णिमा. या दिवसाला भगवान शंकरांनी तारकासुराच्या अनुक्रमे तारक्ष , कमलाक्ष , आणि विद्युन्माली या मुलांना मयासुराने बांधून दिलेल्या तीन शहरांचा किंवा पुरांचा आपल्या त्रिशुलाने जाळून टाकून नाश केला तो हा दिवस. म्हणून भगवान शंकरांना त्रिपुरारी असे नाव मिळाले आणि या दिवसाचे नाव त्रिपुरारी पौर्णिमा असे पडले. खरे म्हणजे मयासुराने या तिघांना तीन शहरे तयार करुन देताना कुणालाही उन्मत्त होऊन त्रास देऊ नका असे बजावले होते. पण शेवटी त्यांच्यातील असुर वृत्ती जागी झाली आणि त्यांनी देवांनाच त्रास द्यायला सुरुवात केली.त्यामुळे मग भगवान शंकरांना आपल्या त्रिशूलाने त्या तीन असुरांना आणि त्यांच्यासाठी बांधलेल्या तीन पुरांना जाळून भस्म करावे लागले. या त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी भगवान शंकरांच्या मंदिरात त्रिपुर वाती उजळविल्या जातात. त्रिपुर उजळविणे म्हणजे या असुरांच्या नाशाचे एक द्योतकच आहे.
असुरांचा नाश झाल्यामुळे वाईट प्रवृत्तींवर चांगल्या प्रवृत्तींचा विजय झाला म्हणून या दिवशी सगळीकडे लक्षावधी पणत्या लावून सगळ्या देवळांमध्ये घरांमध्ये, अंगणांमध्ये, बागांमध्ये दीपोत्सव साजरा केला जातो.
या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊन त्यांची पूजा केली जाते. पुण्याच्या पर्वतीवर या दिवशी कार्तिक स्वामींचे मंदिर दर्शनासाठी उघडे असते. उत्तर भारतात गंगा नदीमध्ये दिवे सोडले जातात. या दिवशी गंगा स्नानाचे पण खूप महत्व आहे. भगवान कृष्णांच्या दामोदर रुपाच या दिवशी पूजन केले जाते , आणि त्या वयाच्या मुलांना दान दिले जाते. कृष्णाच्या दामोदर रूपाची पूजा करताना "ओम दामोदराय विदमहे पदमनाभाय धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात" हा मंत्र म्हणतात. दामोदर रूप म्हणजे कृष्णाने इतर गोपींच्याकडे जाऊन चोरून लोणी खाल्ले म्हणून रागावलेल्या यशोदेने कृष्णाला उखळीला बांधून ठेवले होते ते रूप. भगवान विष्णू चातुर्मासानंतर कार्तिकी एकादशीला आपल्या योग् निद्रेतून जागे होऊन त्रिपुरी पौर्णिमेच्या मध्यरात्री भगवान शंकरांना भेटायला येतात असे म्हटले जाते. भगवान विष्णू आपल्या योगनिद्रेत जेव्हा असतात तेव्हां साऱ्या विश्वाचा कारभार शंकर भगवान बघतात असे म्हटले जाते त्यामुळे त्रिपुरी पौर्णिमेच्या रात्री भगवान विष्णू भगवान शंकरांना भेटायला येतात असे म्हटले जाते.या मध्यरात्री बेलाची पाने आणि तुळशीपत्रे वाहून या दोन्ही देवांची पूजा केली जाते.
बुद्ध धर्मातले उपासक या दिवशी बुद्ध धर्मात सांगितलेली उपासना करतात. शीख धर्माचे लोक या दिवशी गुरू नानक यांची जयंती साजरी करतात. असुरांचा वध झाल्यामुळे काही ठिकाणी देवांचा विजयोत्सव देवदिवाळी म्हणूनही हा दिवस साजरा केला जातो. कार्तिकी एकादशीपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत होत असलेल्या तुळशी विवाहाचा त्रिपुरी पौर्णिमा हा शेवटचा दिवस असतो आणि त्यानंतर लग्नाचे मुहूर्त सुरू होतात.
मी स्वतः रचलेले दोन कडव्यांचे तुळशिविवाहासाठीचे मंगलाष्टक खाली लिहीत आहे,त्याचा तुळशीविवाहाचे दिवशी कोणाला उपयोग झाला तर मला आनंद होईल.
---- तुळशी विवाह ---
तुळशीचा शुभ विवाह आज करुया मुरलीधरा संगती
लक्ष्मी विष्णू पुनश्च आज बनले या जन्मीचे सोबती
हाती घेऊनि अक्षता उधळुया तुळशी मुरारिंवरी
जन्मोजन्मी अशीच प्रीत असुद्या लक्ष्मी आईच्या वरी.
शुभमंगल सावधान -----------
जन्मोजन्मी असाच आम्ही करितो हा सोहळा साजिरा
वृंदा साजिरी गोजिरी वधु पहा शोधीतसे प्रभुवरा
वृंदा विष्णुप्रिया सतेज तुळशी तुम्हास अर्पियतो
ठेवा दृष्टि कृपेचि हो प्रभूवरा तुम्हासि प्रार्थीयतो
शुभमंगल सावधान -----------
(वरील मंगलाष्टक नेहमीच्या मंगलाष्टकाच्याच चालीमध्ये
म्हणायचे आहे. वृत्त - शार्दूलविक्रीडित)
सौ. उमा जोशी,
फोन 020 25468213
मोबा.9420176429.
anantjoshi2510@gmail.com
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा
Comentários