कथा आणि पटकथा यामध्ये अंतर आहे. पटकथा म्हणजे चित्रपट, दूरदर्शन मालिका, माहितीपट आणि वेबसेरीज यासाठी लिहणे. त्यामध्ये दृष्यांच्या स्वरुपामध्ये कथा लिहली जाते. प्रेक्षकांसमोर आपले कथानक दृष्य माध्यमातून आणि घटना, प्रसंगातून सादर केले जाणार आहे, हे लक्षात घेऊन केलेली कथेची मांडणी म्हणजे पटकथा होय. त्यासाठी पटकथा लेखकाला त्याची कथा कशी सादर होणार आहे याची दृष्ये त्याच्या डोळ्यासमोर आणावी लागतात. त्याप्रमाणे कथेची दृष्यकथा स्वरूपामध्ये मांडणी करावी लागते. पटकथा लेखन हे एक विशेष प्रकारचे कौशल्य आहे. ते फार अवघड नाही, मात्र त्याचे तंत्र आणि मंत्र नीट समजावून घ्यावे लागते. एकदा ते लक्षात आले आणि त्याचे कौशल्य आत्मसात केले की मग ते सहजपणे जमू शकते. सध्याच्या काळात पटकथा लेखकांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मोठ्या प्रमाणावरील दूरदर्शनच्या वाहिन्यांना सतत कथानके हवी असतात. त्याचबरोबर डिजिटल जगामध्येही पटकथाकारांना मागणी आहे. शिवाय ओटीटी (Over The Top) या नाविन्यपूर्ण प्लॅटफॉर्ममुळे वेबसेरीजची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यांनाही सातत्याने पटकथाकार हवे असतात. त्यामुळे पटकथालेखन हे एक सतत मागणी असलेले क्षेत्र आहे. त्याचबरोबर माहितीपटांची संख्याही वाढत आहे. आपली संस्था, आपले प्रॉडक्ट, आपली सेवा यांची माहिती लोकांपर्यंत माहितीपटांच्या माध्यमातून नेता येते. माहितीपटांसाठीही पटकथा लेखकांची गरज आहे.