विद्यार्थी आणि युवकांना हे प्रेरणा देणाऱ्या धमाल तितक्याच हृदयस्पर्शी अनुभवांचे कथन करणाऱ्या आनंदाचे ए. टी. एम या वेबमालिकेची निर्मिती विश्व मराठी परिषदने केली आहे. या वेबमालिकेचा लोकार्पण सोहळा नुकताच (दि. ४ मार्च 2025 रोजी) रोटरी हॉल एसएनडीटी महाविद्यालय, पुणे येथे पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय किर्तनकार विद्यावाचस्पती चारुदत्तबुवा आफळे, अ.भा. मराठी साहित्य महा मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, विश्व मराठी परिषदेचे संचालक अनिल कुलकर्णी, माजी प्रांतपाल लायन शरदचंद्र पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी स्नेहसेवा संस्थेच्या अध्यक्ष डॉ. राधा संगमनेरकर होत्या.

प्राचार्य शाम भुर्के हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ते कारकून म्हणून रुजू झाले आणि उपव्यवस्थापक म्हणून निवृत्त झाले. बँकेत नोकरी करताना त्यांनी “टू इन वन” अशी भूमिका निभावली. बँकेचे हित याचबरोबर ग्राहकांचे हितही तेवढेच महत्वाचे अशी त्यांची कार्यपद्धती होती. पोटासाठी नोकरी आहेच मात्र त्याच बरोबर समाजसेवा करण्यासाठीची “पेड संधी” म्हणजे नोकरी असेच त्यांना पहिल्यापासून वाटत होते. त्यामुळे त्यांचा जीवन प्रवास नानाविध विलक्षण अनुभवांनी भरलेला आहे. त्यांचे अनुभव आनंदाचे ए. टी. एम या वेबमालिकेमध्ये चित्रीत करण्यात आले आहेत. एकूण 150 भागांची ही वेबमालिका विश्व मराठी वाणी या यूट्यूब चॅनल वर दर आठवड्याला तीन भागात याप्रमाणे 10 मार्चपासून प्रदर्शित होत आहे.

या प्रसंगी प्रास्ताविकात विश्व मराठी परिषदेचे अध्यक्ष प्रा. क्षितिज पाटुकले म्हणाले, “प्राचार्य श्याम भुर्के यांचे वक्तृत्व, साहित्य, कला क्षेत्रातील अनुभव प्रेरणादायी आहेत. विश्व मराठी परिषद ४० हून अधिक देशात कार्यरत आहे. या वेबमालिकेचे १५० भाग आम्ही जगातील लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवित आहेत''.
यावेळी डॉ. चारुदत्तबुवा आफळे म्हणाले, “जीवनात दु:ख ही असतातच, पण त्यांचा सतत त्रास करून न घेता जीवनात आनंद शोधता आला पाहिजे. प्राचार्य श्याम भुर्के यांनी सातत्याने आनंददायी आणि प्रेरणादायी गोष्टींना प्राधान्य दिले. त्याला विश्व मराठी परिषदेने जगभर पोहोचविण्याचे हे महान कार्य केले. प्रेरणा ही एक महान शक्ती आहे. त्यामुळे अनेकजण कार्यरत राहतात. या वेब मालिकेतील प्रसंग जगभर प्रेरणा देण्याचे कार्य करतील."
दरम्यान डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, प्रा. क्षितिज पाटुकले, प्राचार्य श्याम भुर्के, डॉ. राधा संगमनेरकर यांनी मनोगत व्यक्त केले. वेबमालिका निर्मितीत महत्त्वाचे योगदान देणारे श्री. महेश शेंद्रे यांचा सत्कार डॉ. चारुदत्तबुवा आफळे यांचे हस्ते करण्यात आला. ईशस्तवन सौ. गीता भुर्के यानी गायले आणि आभार प्रदर्शन नीला सरपोतदार यांनी केले.
यावेळी चित्रकार रवी मुकुल, गायक राजेश दातार, ला. नितीन पाटील, उद्योजक योगेश कुलकर्णी, उत्कर्ष प्रकाशनचे सुधाकर जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. अनिकेत पाटील यांनी केले.
आनंदाचे एटीएम ही वेबमालिका विश्व मराठी वाणी या युट्यूब चॅनेलद्वारे पुढील लिंकवर क्लिक करून पाहता येईल - https://www.youtube.com/c/VishwaMarathiVani
Comments