विश्व मराठी परिषद

Aug 1, 20201 min

प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्याआड

प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्याआड
 
बाईपण असते लपलेले
 
पदरात बांधलेले असतात
 
कित्येक सल  खुपलेले

कित्येक नजरा हसताना
 
सांगतात गुढ कहाणी
 
पंख छाटल्या पक्ष्याची
 
गातात हळवी गाणी

पैंजणे रुणझुणतात हळुवार
 
दंगा करत नाही 
 
दिवसभर नाचणाऱ्या पायांना
 
कुणी थांब म्हणत नाही

क्वचितच होतात मोकळे
 
घट्ट  बांधलेले केस
 
आकांक्षांनाही अशीच अडवते
 
बाईपणाची रुढ वेस

हातातली काकणं किणकिणतात
 
कुरकुरत नाहीत कधीही
 
अविरत राबतात कष्टतात
 
हात मायेचा शीणत नाही

प्रत्येक उंबऱ्याआड आहेत
 
घुसमटलेले बंदिस्त श्र्वास
 
दाबलेली गोठलेली चौकटीत
 
निस्तेज दुबळी आस

आदिशक्तीच्या या लेकींना
 
यावी थोडी शहाणीव
 
रसरसुन जगण्याची
 
व्हावी थोडी जाणीव

कवयित्री : सौ. शारदा रामदास गोरे (श्रीगोंदा, अहमदनगर)
 
मो: ८८०५२६७७३३

ईमेल: shardagore81@gmail.com

    2011
    7