विश्व मराठी परिषद

Feb 26, 20212 min

सेल्समनचे आयुष्य (विक्रेत्यांचा दिपस्तंभच !) - पुस्तक परिक्षण

ग्राहक आणि विक्रेते यांच्यातील यशस्वी सुसंवादातूनच बाजारातील अर्थचक्राला गती मिळते, अर्थचक्राला चालना मिळते. हा सवांद, संपर्क आणि विश्वासाचे नाते जर बिघडले तर पर्यायाने उभ्या उद्योगालाच खीळ बसण्याचे भय असते. शरीरातला पाठीचा कणा जसा मजबुतीने उभा देह तोलून धरतो, त्याच शर्तीवर बाजारातील विक्रेता हा संपूर्ण व्यवहाराचा तोल समर्थपणे सांभाळतो. आणि त्यातूनच सकारात्मक परिणाम घडतात. नेमक्या याच विषयावर एक परिपूर्ण आणि मार्गदर्शक असे 'सेल्समनचे आयुष्य' हे पुस्तक डॉ. चेतन कुळकर्णी यांच्या प्रदीर्घ अनुभवातून साकार झाले आहे. जे ग्राहक, विक्रेते, उद्योजक, अभ्यासक यांना दिपस्तंभच ठरणार आहे.

सेल्समन कसा असावा?, कसा नसावा?, त्याची देहबोली, वाईट सवयी, स्वयंशिस्त, टार्गेट अचिव्हमेंट, प्रॉडक्ट नॉलेज, स्पर्धकांची माहिती, नातेसंबंध, आहार, दुकाने, मॉल, सुपरमार्केट मधले सेल्समन अशा प्रकरणातून सुरु झालेला लेखकाचा सवांद हा अगदी नव्या बदलत्या संकल्पनेवरही प्रभावी भाष्य करतो. कुरियर कंपनी, टेलिफोनिक सेल्समन, क्लब-रिसॉर्ट, विमा एजंट, प्रदर्शनातील विक्रेता यावरील दिलेल्या टिप्सही खूप काही सांगून जातात. हे या पुस्तकाचे आकर्षण आणि वैशिष्ठ म्हणावे लागेल.

एकंदर प्रत्येक प्रकरणातील भाषा ही सहजसुंदर आहे. पण त्यासोबतच काही युक्त्या व नवीन सादरीकरण यावरही केलेले निवेदन प्रभावी आहे. एखाद्या ग्राहकाशी संवाद साधत असतांना जर कुणाचा फोन आला तर काय करावे? सेल्समनने आपली डायरी कशी काय अद्यावत ठेवावी?

ग्राहकांना दाखविण्यात येणारी वस्तूची खबरदारी कशी काय द्यावी? विक्रेत्यांचा गणवेश, वृत्ती, संपर्क कौशल्य, कामाच्या वेळा. यावरही तपशिलात जाऊन लेखकाने काही मुद्दे मांडले आहेत. जे विक्रेत्याला 'आदर्श विक्रेता' म्हणून साथसोबत करून सिद्ध करू शकतील.

या पुस्तकाचे लेखक डॉ. चेतन कुळकर्णी हे विक्री विषयक तज्ञ म्हणून ओळखले जातात. गेली तीस एक वर्षे त्यांचा मार्केटिंग क्षेत्रात थेट सहभाग आहे. अनेक पुरस्कारांनी त्यांना यापूर्वी गौरवण्यातही आले आहे. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाची प्रचिती प्रत्येक प्रकरणातील निवेदनातून येते. अशा काहीशा दुर्लक्षित विषयावर अधिकार वाणीने व समृद्ध अनुभवाच्या जोरावर मराठीत लिखाण करणारे डॉ. कुळकर्णी हे एकमेव लेखक आहेत. 'ओएमजी बुक ऑफ नॅशनल रेकॉर्ड' चेही हे पुस्तक मानकरी ठरते. मराठी वाचकांपर्यंत हा विषय समर्थपणे पोहचला पाहिजे ही तळमळ या पुस्तक निर्मितीमागे स्पष्टपणे दिसून येते.

इंग्रजी भाषेत अशा विषयांवर अनेक पुस्तक आहेत. पण मराठी विक्रेत्यांना मराठी भाषेत सांगणारी प्रकाशने दिसत नाहीत. इंग्रजाळलेल्या या क्षेत्रातील ही मक्तेदारी या पुस्तकामुळे मोडीत निघाली आहे. महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्था, वाचनालये, उत्पादन करणाऱ्या कंपन्या यांनी हे पुस्तक संग्रही ठेवावे. आणि महाराष्ट्रातील मराठमोळ्या विक्रेत्यांनी तर या पुस्तकाला गुरुस्थानी मानावे. त्यांच्या कौशल्यात नक्कीच भर पडेल. डॉ. चेतन कुळकर्णी याचे हे पुस्तक विक्रेत्यांच्या वाटेवरले मैलाचे निशाणच आहे.

सेल्समनचे आयुष्य

लेखक- डॉ. चेतन कुळकर्णी

ईमेल :- kulkarnichetan291@gmail.com

संपर्क :- 9967146324

प्रकाशक- ओम शांती प्रकाशन

पृष्ठे- एकूण १११

मूल्य- १५० रुपये

संजय डहाळे

९८२०३५५६०३

sanjaydahale33@gmail.com

    6261
    9