विश्व मराठी परिषद

Jul 3, 20201 min

एक निर्धार ठाम कर...

(कवयित्री: कंद करुणा सुखदेव)

अडू नको चालत राहा  

ध्येयाकडे रोखून पहा

संकटांच्या पर्वतांना

वळसा घालून पुढे जा

खचू नको धीर धर

विसावा घे क्षणभर

ठेव विश्वास  स्वतःवर

प्रयत्नांचा जागर कर

अन् एक निर्धार ठाम कर

थोडा अपमान पचव जरा

प्याला दुःखाचा रिचव जरा

वाटाड्या घेऊन स्वतःलाच

मार्ग नवा सुचव जरा

हातामध्ये हात घे

हसू ठेव ओठांवर

अश्रू दडव डोळ्यातच

नि प्रेम कर स्वतःवर

अन् एक निर्धार ठाम कर

अनुभवांना सोबत घे

अज्ञानाला फेकून दे

उसळलेल्या दऱ्यांमध्ये

स्वतःला झोकून दे

वादळाचा शोध घे

समुद्रांच्या लाटांवर

तुफानाला भेदून तू

नजर ठेव किनार्‍यावर

अन् एक निर्धार ठाम कर

माणुसकीची मशाल हो

वातीसारखी जळत रहा

घेऊन सूर्य सत्याचा

जगाला तू उजळत राहा

अंधार आहे घडीभर

पहाट होईलच लवकर

प्रकाश पसरेल गगनभर

तोवर थोडी तग धर

अन् एक निर्धार ठाम कर

जिंकण्याचा  एक निर्धार ठाम कर

एक निर्धार ठाम कर.

कंद करुणा सुखदेव

मो: 9579672140

ईमेल: kandkaruna@gmail.com

    3030
    18