Profile

Join date: Dec 16, 2020

About

हंगामी भाषाप्रेमी


आज 'मराठी राजभाषा दिन', व्हॕलेन्टाईन डेच्या दिवशी जसे 'हंगामी प्रेमवीर' गल्लीगल्लीतून प्रकट होतात, अगदी त्याचप्रमाणे आजच्या दिवशी गल्लोगल्ली आणि विशेषतः सोशल साईट्सवर 'हंगामी भाषाप्रेमी' प्रकट होतात. आजच्या दिवशी यांचे मराठीवरील प्रेम अगदी ऊतू जाते. मराठी भाषेला वाईट दिवस आले अशी हळहळ व्यक्त केली जाते. मराठी भाषेत आता चांगले साहित्य निर्माण होत नाही याची खंत व्यक्त केली जाते.


आता तुम्ही म्हणाल, यात वाईट काय आहे? नाही वाईट काही नाही हो... पण पुढचे वर्षभर यांचं मराठीवरील प्रेम कुठे गायब होतं तेच कळत नाही. कुणाचा वाढदिवस असो, एखादा सणवार असो, यांना शुभेच्छा द्यायला इंग्रजीची मदत लागते. इतकंच कशाला यांना यांच्या मुलाबाळांनी 'आई-बाबा' म्हटले तर लाज वाटते. तेव्हा कुठे जातो हो 'मराठी बाणा'? बरं ते जाऊद्या, किती घरात मराठी पुस्तकं विकत घेऊन वाचली जातात? त्यातही नवोदित लेखकांची पुस्तके किती जण विकत घेतात? नाटक-सिनेमांना तर सगळेच गर्दी करतात. किती लोक साहित्य संमेलनांना हजेरी लावतात?


बरं या सोशल मिडियावर जशी हंगामी भाषाप्रेमींची कमी नाही ना, तशीच हंगामी लेखक - कवींचीही काही कमी नाही. गायकांच्या काही जाती असतात बघा, जसे शास्त्रीय गायक, उपशास्त्रीय गायक, सुगम संगीत गायक तसाच एक खास प्रकार म्हणजे 'बाथरूम सिंगर्स' नावाचा एक प्रकार असतो ना? अगदी तसाच एक प्रकार हल्ली साहित्य क्षेत्रातही पहायला मिळतो, तो म्हणजे 'सोशल मिडिया रायटर्स' अर्थात समाज माध्यमांवरील लेखक! आता या समाजमाध्यम लेखकांनी मराठी साहित्यात किती मोलाची भर घातली हा वादाचा मुद्दा असला तरी, मराठी भाषेला मात्र ह्यांनी अगदी विद्रूप करून टाकले आहे. ऱ्हस्व-दीर्घाची जाण किंवा अनुस्वारांचे स्थान या गोष्टींचे यांना अजिबात भान नसते. गीतेला गिता, श्रीधरचा श्रिधर वाचायलाच किती विचित्र वाटतं. यमकांची जुळवाजुळव करायला कुठे 'जातं' ला जात लिहायचं तर कुठे रेफ (रफार) भलतीकडे टाकून अर्थाचा अनर्थ करायचा. रोज एक कविता 'पाडायच्या' नादात ही मंडळी स्वतःचं आणि मराठीचं हसं करून घेतात.


मराठी संवर्धन आणि मराठी शाळा -


आता काही लोकांना असं वाटतं की आपण मुलांना मराठी शाळेत घातलं की आपलं मराठीभाषा संवर्धनाचं कर्तव्य पार पडलं. पण मला सांगा, आज किती मराठी माध्यमाचे शिक्षक मुलांना शुद्ध मराठी शिकवतात? किती मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलांना 'ऱ्हस्व' आणि 'दीर्घ' या शब्दांचा अर्थ समजतो? मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलेली आहे. मलासुद्धा बाराखडी शिकवताना 'उ' आणि 'ऊ' तसंच 'इ' आणि 'ई' मधला फरक शिकवलाच गेलेला नाही, फक्त पहिली इ लहान आणि दुसरी ई मोठी एवढेच शिकवले गेलेय, तेच 'उ' आणि 'ऊ' चे... त्याचप्रमाणे शाळेचा 'श' आणि षटकोनाचा 'ष' या दोघांचे उच्चार वेगवेगळे असतात हेसुद्धा मला माहिती नव्हते. कारण जे शिक्षक स्वतः 'बानाचा 'न'(ण)आणि णळाचा 'ण' (न) म्हणतात त्यांच्याकडून अधिक अपेक्षा न केलेलीच बरी...


मुलांच्या मनात खरोखरीच मराठीविषयी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा निर्माण करायचा असेल तर सर्वात आधी आपल्या घरात मराठीची बीजं रूजवा. आधी त्यांना आई-बाबा म्हणायला शिकवा, त्यांच्या वाढदिवसाला 'हॕप्पी बर्थडे टू यू' म्हणत टाळ्या पिटणं बंद करून औक्षण करताना मराठीतून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. हे बघा इंग्रजी ही जागतिक व्यवहाराची भाषा आहे, हे सत्य नाकारून आपल्याला चालणार नाही. त्यामुळे मराठी भाषा गळी उतरवण्यासाठी गणित, विज्ञान असे व्यवहारोपयोगी विषय मराठीतून शिकण्याचा/शिकवण्याचा अट्टाहास सोडून त्यापेक्षा दसरा-दिवाळीच्या शुभेच्छा मराठीतून द्यायचा हट्ट धरा. अर्धा तास टि. व्ही. बंद ठेवून/ मोबाईल बाजूला ठेवून त्यांच्यासोबत दासबोध ज्ञानेश्वरी किंवा ते खूपच कठीण वाटत असल्यास मराठी कविता/कथांचं मोठ्याने वाचन करा. वर्षातून एकतरी मराठी पुस्तक (नवोदित लेखकांचं) खरेदी करा.


एका दिवसापुरता मराठी भाषेचा उदोउदो न करता मराठीला आपल्या दैनंदिन जगण्यात स्थान देऊया. 'मराठी राजभाषा दिना'च्या खूप खूप शुभेच्छा


सौ. अमृता श्रीरंग देशपांडे, नागपूर

Amrita Deshpande

More actions