top of page

मातृत्व


मोबाईलचा आवाज ऐकून मीनाला जाग आली. दुपारच्या वेळी कोणी फोन केला असेल याचा विचार करत ती सावकाश उठून बसली. सात वर्षाचा गौरव जवळच खेळत होता. न सांगताच त्याने मोबाईल आईला आणून दिला.

“ हॅलो, “ मीना सावकाश बोलली.

“ हॅलो मीना! कशी तब्येत आहे ?

“ आता बरी आहे.”

“ मि.राजेश कसे आहेत ?

“ आता तेही ठीक आहेत. अपघातातून वाचले हेच आमचे नशीब म्हणायचे ! पायावर पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.”

“ अच्छा ! मीना, मला कसं सांगू कळत नाही. पण सांगणं आवश्यक आहे. काल अमेरिकेतून फोन आला होता. मिस्टर व मिसेस सॅम्युअल आता या जगात नाहीत.”

“ काय ?” मीना किंचाळली. राजेशला जाग आली. तो पडल्या पडल्या संभाषण ऐकू लागला.

“ मीना कुल डाऊन. सांभाळ स्वत:ला. “

“ कायं.. कायं झालं त्यांना अचानक ?”

“ अग मिसेस सॅम्युअलना कोरोना झाला होता. त्या पंधरा दिवसापूर्वी गेल्या. मिस्टर सॅम्युअलना काल हार्ट अँर्टॅक आला. त्यांच्या वकीलाचा फोन आला होता. त्यांनी या महिन्याचे पैसे पाठविले आहेत. पुढच्या महिन्यापासून पैसे पाठवू शकणार नाही, असे कळवले आहे आणि मीना, आता बाळाची जबाबदारी कोणी घेणार नाही तेव्हा बहुतेक तुम्हांला ....”

मीनाला काही सुचेना. ती थरथरायला लागली. तिने फोन कट केला. सुन्न होऊन खुर्चीत बसली. राजेश कॉटवर उठून बसला. आपल्या आईला नेमकं काय झालं आहे गौरवला कळेना. तो भांबावल्या नजरेने आईकडे पहायला लागला.

राजेशने गौरवला सांगितले, “ गौरव, आईला जरा पाणी आणून दे.” गौरवने मीनाला पाणी दिले. पाणी प्यायल्यावर तिला जरा बरे वाटले. ती गौरवला म्हणाली, “ गौरव, थोडावेळ प्रतिकबरोबर खेळायला जातोस का ? तू सकाळी जायचं म्हणत होतासं ना!”


२.

“ माझ्याकडची सापशिडी घेऊन जाऊ का आई? ,“ गौरव म्हणाला.

“ बरं ! ” कसंनुसं हसत मीना म्हणाली. गौरव बाहेर गेला. राजेशने शांतपणे विचारले, “ फोन कोणाचा होता ? नेमकं काय झालं ? ”

मीनाने आवंढा गिळला व म्हणाली, “ अँडव्होकेट कदमबाईंचा फोन होता.”

मीनाला घाम फुटत होता. तिची ती तणावपूर्ण अवस्था राजेशला कळेना. तो म्हणाला, “ तू एवढी का घाबरली आहेस? असं काय सांगितलं त्यांनी?”

मीना दबक्या आवाजात म्हणाली, “ मिस्टर व मिसेस सॅम्युअल आता या जगात नाहीत.”

“ असं कसं होईल? ते पंधरा दिवसापूर्वी बोलले ना तुझ्याशी ?”

“ हो! ते बोलले. त्यावेळी ते थोडे थकलेले जाणवत होते. त्याच कालावधीत मिसेस सॅम्युअल कोरोनाने गेल्या. काल मिस्टर सॅम्युअल हॉर्ट अँटॅकने गेले. या महिन्यात फक्त पैसे मिळणार असं त्यांचा वकील म्हणाला आणि ... “ मीना बोलायची थांबली.

“ अगं आणि काय ? तुझ्या पोटातल्या बाळाचं काय ?” राजेश रागाने बोलला.

“ आता बाळाला कोण स्वीकारणार? ज्याना हवं होत ते तर गेले.”

राजेश आवेशाने म्हणाला,” मीना, अग हे आपलं बाळ नाही. त्यात तुझा-माझा अंश नाही. तू फक्त सरोगेट मदर आहेस.”

मीना भरल्या डोळ्यांनी म्हणाली, “ पण ज्यांचा तो अंश आहे ते आता या जगात नाहीत. “

राजेश तुसड्यासारखा म्हणाला, “ मग त्यालाही या जगात राहायचा अधिकार नाही. जन्माला येण्याआधीच आईबापाला खाणारं हे मूल मीना या घरात नको. “

राजेशच्या या बोलण्याने मीना हादरून गेली. ती काय बोलणार होती. पाच महिन्यापूर्वी राजेशचा अपघात झाला. मित्राच्या बाईकवरून येताना एका ट्रकने त्यांना उडवले. मित्र त्याच वेळी गेला. राजेश मात्र गंभीर जखमी झाला. डोक्याला मार लागल्याने शस्त्रक्रिया करावी लागणार होती. दोन्ही पायाची हाडं मोडली होती. हॉस्पिटलचा लाखो रूपयांचा खर्च कसा करायचा हा त्या वेळी मीनासमोर यक्ष प्रश्न होता. नातेवाईकांनी हात वर केले. अपघाताच्या केस संदर्भात तिची अँडव्होकेट कदमबाईंशी ओळख झाली. मीनाच्या आर्थिक परिस्थितीवर तिने सरोगेट मदर बनण्याचा सल्ला दिला. ज्यांना मूल होत नाही त्यांना आपलं गर्भाशय भाड्याने द्यायचं. सुरूवातीला मीनाने या सल्ल्याला केराची टोपली दाखवली. पण एका ऑपरेशनलाच तिचे दागिने, साठवलेले पैसे संपले.



३.

घरखर्च चालवणंही तिला अवघड होतं. अजून राजेशचे दोन ऑपरेशन बाकी होते. तो आपल्या पायावर उभा राहिल की नाही हेही माहित नव्हते. शिक्षण कमी असल्याने मीनाला चांगली नोकरी मिळणं अवघड होतं. वेगवेगळ्या संस्थाकडून मदत मिळवण्याचा तिने प्रयत्न केला. पण म्हणावे तसे यश मिळाले नाही. शेवटी धीर एकवटून तिने राजेशला सरोगेट मदर होऊ का विचारले. त्याच्याकडेही दुसरा पर्याय नसल्याने त्याने मंजुरी दिली.

मिस्टर व मिसेस सॅम्युअल दोन दिवसात अमेरिकेहुन आले. कायदेशीरबाबी पूर्ण करून झाल्यावर आठ दिवसात मीनाच्या गर्भाशयात बीजारोपण करण्यात आले. नऊ महिने घरखर्च व बाळाच्या जन्मानंतर पाच लाख रूपये दिले जाणार होते. सगळं व्यवस्थित चालू होतं आणि आता अचानक ही बातमी...

मीनाने डोळे पुसले. राजेश म्हणाला, “ हे बघ मीना, जास्त विचार करू नकोस. उद्याच डॉक्टरकडे जा आणि पाडून टाक तो गर्भ. तो आपला नाही आणि खर्चही आपल्याला परवडणारा नाही.”

मीनाने काहीच उत्तर दिले नाही. एवढ्यात गौरव आला. आईकडे खाऊ मागायला लागला. मीनाने त्याला डब्यातला चिवडा दिला व ती संध्याकाळच्या स्वंयपाकाला लागली. खाता खाता गौरव मीनाकडे आला व म्हणाला, “ आई आपलं बाळ कधी बाहेर येईल? राजू आपल्या ताईबरोबर खेळतो. सोनू आपल्या दादाबरोबर खेळते. मलाही माझ्या भावाबरोबर खेळायचे आहे. लवकर येईल ना बाळ आई?”

मीनाने आपल्या पोटावर हात ठेवला व म्हणाली, “ अजून पाच महिनेतरी लागतील ; पण तुला त्याच्याबरोबर खेळायला दोन-तीन वर्षे थांबावे लागेल ,” असं म्हणत तिने गौरवचा गालगुच्चा घेतला.

“ ठीक आहे. ते येईल त्या वेळी मी खेळेन, “असं हसून गौरव म्हणाला व उड्या मारायला लागला. त्याचे निरागस विचार मीनाला सुखावून गेले. रात्रभर मीना आपल्या पोटावरून हात फिरवत राहिली. तिला त्या अर्भकाविषयी अचानक प्रेम वाटायला लागले. इतके दिवस ती परक्याचे मूल म्हणूनच विचार करत होती. पण आज त्या निराधार अर्भकाची सरोगेट का असेना आपण ‘ आई ‘ आहोत , याची तिला नव्याने जाणीव होत होती. तिच्यातली आई जागी व्हायला लागली. तिला निराधारांचं मातृत्व स्वीकारणा-या सिंधुताई सपकाळ आठवल्या. सिंधूताईंनी कोण-कुठल्या रस्त्यावरच्या मुलांना आपल्या मायेच्या पदराखाली घेतले होते. मग ज्या अर्भकाने आपला संसार पडत्या काळात सांभाळला, त्याला या जगात न आणणे म्हणजे कृतघ्नपणा ठरेल असे मीनाला वाटायला लागले.



४.

सकाळी मीनाने आपला निर्धार पक्का केला. तिने राजेशला जागे केले व म्हणाली, “ माझा संसार सावरणा-या या बाळाला मी जन्म देणार आणि वाढवणारही. यासाठी मला जे कष्ट करावे लागतील ते एक ‘ आई ‘ म्हणून मी आनंदाने करेन. आता या निर्णयात काही झाले तरी बदल होणार नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. ” उत्तराची वाट न बघता मीना नोकरी शोधण्यासाठी घराबाहेर पडली. चालताना नकळत तिचा हात पोटावरून फिरत होता.



मंगल कातकर

एैरोली, नवी मुंबई.

whatsapp no. 9757088884

Email: mukatkar@gmail.com


विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा

846 views0 comments

Recent Posts

See All

コメント


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page