स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, १९२४ च्या सुमारास भाषाशुद्धीची चळवळ सुरू केली. त्यात थोडी लिपीशुद्धीही होती. त्यांची तर्कशुध्द विचारसरणी म्हणजे.... क ला वेलांटी लावली तर ‘कि’ होते आणि ते आपण स्वीकारलं आहे तर अ ला वेलांटी लावून ‘अि’ का स्वीकारू नये? क ला ईकार लावला तर की होते, मग अ ला ईकार (ी) लावला तर अी का होअू नये? म ला एकार (े) लावला तर मे होतो तर अ ला एकार लावला तर अे का होअू नये? ही तर्कशुध्द विधानं स्वीकारलीत तर अ ची बाराखडीही स्वीकाराविशी वाटते. त्यानुसार इ, ई, उ, ऊ, ए, ऐ या चिन्हांबद्दल (अक्षरांबद्दल..स्वरांबद्दल..) अि, अी, अु, अू, अे अै ही स्वरचिन्हं स्वीकारावी. अिंग्रजीच्या आक्रमणानंतर, अॅ आणि ऑ या स्वरांची सोय करणं आवश्यक होतं. त्यामुळे ते स्वरही आपण स्वीकारले आहेत. त्यामुळे अ ची बाराखडी आता अ ची चौदाखडी म्हणजे स्वरमाला झाली आहे. डोळ्यांना आणि मेंदूला, या चौदाखडीची म्हणजे चौदा स्वरांची सवय, लवकरच होते. आपणही हीच अक्षरचिन्हं वापरावीत अशी नम्र विनंती. ही अक्षरचिन्हं वापरून तयार झालेले काही शब्द ...... अॅपल अॅक्शन बॅरिस्टर बॅग बँक ऑगस्ट ऑक्टोबर. हे अिंग्रजी शब्द मराठीत लिहीता येतात. अिंद्र, अिन्द्र, अिंदिरा, अिन्दिरा, अितक्यात, अितीहास, अिच्छा ....अिंडिया. मुंबअी, आअी, अीश्वर, अीशस्तवन, अीशान्य, अीर्षा, अीशान, अीशा .... अुत्तर, अुपकार, अुपवन, अुकळणं, अुचापत्या, अुंच, अुंट, .... अून, अूब, अूर, अूस .... अेक, अेकवीस, अेकाअेकी, अेकादशी, अेकूण, अेकवीरा ..... अैरावत, अैतिहासिक, अैवज, अैवजी, अैहिक .... हे शब्द वाचतांना काही अडचण आली? लिहीतांनाही कठीण वाटणार नाही. आ, ओ, औ, अं आणि अ: ही स्वरचिन्हं आपण आधीच स्वीकारली आहेत. अशारितीनं अ ची चौदाखडी जर आपण स्वीकारली तर, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ या स्वरचिन्हांची आवश्यकता राहणार नाही. हाच विचार मी पुढे नेला आहे. क ला काना लावला तर ‘का’ होतो तसाच अ ला काना लावून ‘आ’ होतो आणि तो आपण स्वीकारला आहे. क ला ओकार लावला तर ‘को’ होतो, तसाच अ ला ओकार लावला तर ‘ओ’ होतो. हा ही आपण स्वीकारला आहे. क ला औकार लावला तर ‘कौ’ होतो, तसाच अ ला औकार लावला तर ‘औ’ होतो...तो ही आपण स्वीकारला आहे. क वर अनुस्वार दिला तर ‘कं’ होतो, तसाच अ वर अनुस्वार दिला तर ‘अं’ होतो, तो ही आपण स्वीकारलाच आहे. क ला विसर्ग चिन्ह लावलं तर ‘क:’ होतो, तसाच अ ला विसर्ग चिन्ह लावलं तर ‘अ:’ होतो..तो ही आपण स्वीकारला आहे. जर, आ, ओ, औ, अं आणि अ: ही स्वरचिन्हं आपण आधीच स्वीकारली आहेत तर मग …. अि अी अु अू अे अै ही स्वराक्षरही का स्वीकारू नये? खरं म्हणजे अै आणि औ हे मिश्र किंवा जोडस्वर आहेत. अै म्हणजे (अ अि) आणि औ म्हणजे (अ अु) आद्य लिपीकारांना हेच विचार सुचले असते तर इ ई उ ऊ ए ऐ ही अक्षरचिन्हं घडविण्याची गरजच नव्हती. नवीन स्वरांची भर : अिंग्रजीच्या आक्रमणानंतर, अॅ आणि ऑ या स्वरांची सोय करणं आवश्यक होतं. ऑगस्ट, ऑक्टोबर, डॉक्टर, बँक, बॅरिस्टर, अॅक्ट, अॅडव्होकेट वगैरे शब्द मराठीत लिहीतांना अर्धचंद्राच्या सहाय्यानं हे अुच्चार लिहिले यातच मराठी लिपीकारांची प्रतिभा दिसून येते. कौतुकास्पद आहे. नाही तर हे शब्द आगस्ट, आक्टोबर डाक्टर, आडव्होकेट ब्यांक, ब्यारिस्टर, असे लिहावे लागले असते. पूर्वी ते तसे लिहिलेही गेले आहेत. हिंदीत हेच शब्द बैंक, अैक्ट असे लिहीतात. गुजराथी बांधव ऑ चा अुच्चार ओ असा करतात. ते बॉम्बला बोम्ब आणि हॉलला होल म्हणतात. सॉंन्ग (गाणं) याला ते सोंग म्हणतात तर स्नॅक ला स्नेक म्हणतात. अेकदा, बँकेत, अेक अिसम, लोकर पाहिजे …असं म्हणत होता. बँकेत पैसे असतात, याला लोकर कशी मिळणार? नंतर लक्षात आलं. त्याला बँकेचा लॉकर हवा होता. अिंग्रजीचे काही शब्द मराठीत लिहीतांना अडचणी येतात. महाराष्ट्र, राष्ट्र आणि धृतराष्ट्र या शब्दांत येणारा अर्धा र अिंग्रजी शब्दात आला तर त्याला अुकार लावतांना अडचणी येतात. अुदा. ट्रुथ (Truth), ट्रू (True) वगैरे.
स्वरांची व्याख्या पारंपारिक स्वरमालेत ऋ (र्हस्व आणि दीर्घ) आणि लृ (र्हस्व आणि दीर्घ) हे स्वर समजले आहेत. पण ते स्वरांची व्याख्या पूर्ण करू शकत नाहीत. स्वराचा अुच्चार करतांना, ओठ. दात, टाळू आणि जीभ यांचा अेकमेकांशी स्पर्श व्हावयास नको. नाद केवळ घशातूनच यावयास हवा. स्वरांचा दीर्घ अुच्चार करीत राहता येतो. अऽऽऽऽऽऽ किंवा आऽऽऽऽऽऽ. अीऽऽऽऽऽऽऽ अूऽऽऽऽऽऽऽ. अै आणि औ हे शुध्द स्वर नाहीत, मिश्र किंवा जोड स्वर आहेत. अै म्हणजे (अ अि) आणि औ म्हणजे (अ अु). अैऽऽऽऽऽऽ आणि औऽऽऽऽऽऽऽऽ असा अुच्चार करीत राहिल्यास शेवटी अि आणि अु च अैकू येतात .अॅऽऽऽऽऽऽ आणि ऑऽऽऽऽऽऽऽ च्या बाबतीत तसं होत नाही. म्हणूनच अॅ आणि ऑ हे स्वर समजले जातात. तसं व्यंजनांच्या बाबतीत होत नाही. कऽऽऽऽऽ. शेवटी क अैकू न येता अ च अैकू येतो. ऋ आणि लृ अुच्चारतांनाही तसं होत नाही. यास्तव ही अक्षरचिन्हं स्वर नाहीत म्हणून त्यांचा स्वरमालेत समावेश करता येत नाही. ऋऽऽऽऽऽऽऽ. लृऽऽऽऽऽऽऽऽ वरील विवेचनानुसार अ ची चौदाखडी म्हणजे चौदा स्वरांची स्वरमाला येणे प्रमाणे स्वीकारावी : अ अॅ आ ऑ अि अी अु अू अे अै ओ औ अं अ: आता ही अ ची चौदाखडी सर्व मराठीप्रेमी जनांनी हट्टानं वापरावी अशी माझी नम्र सूचना आहे. महाराष्ट्रशासन, वृत्तपत्रं, मासिकं, मराठी जाहिरातदार, मराठी शाळा वगैरेंनीही हीच चौदाखडी वापरावी. असं करण्यानं होणार आहे... मराठी लिपी समृध्दी.
सरकारी मान्यता ::
महाराष्ट्रशासन, सामान्य प्रशासन विभागानं, ६ नोव्हेंबर २००९ रोजी अेका अध्यादेशानं, मराठीचे स्वर आणि व्यंजनं स्वीकारली.
त्यात पारंपारिक स्वरांबरोबरच अॅ आणि ऑ हे स्वर स्वीकारले पण अ ची, वर दिलेली चौदाखडी मात्र स्वीकारली नाही, ती आता स्वीकारावी असं वाटतं.
पण जनताजनार्दनानं हे स्वर कित्येक वर्ष आधीच स्वीकारले आहेत. १९७६ साली प्रकाशित झालेल्या प्रा. देशपांडे यांच्या अिंग्रजी-मराठी शब्दकोशात, ऑगस्ट, ऑक्टोबर, बँक,बॅरिस्टर हे शब्द असेच छापले आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकारांची लिपीशुध्दी ::
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, १९३० ते १९३७ या कालखंडात १७ विज्ञाननिष्ठ निबंध आणि २ काव्यं लिहीली आणि हे सर्व साहित्य किर्लोस्कर मासिकानं प्रसिध्द केलं. या सर्व साहित्यात अ ची चौदाखडीच वापरली आहे. मीही ही बाराखडी गेल्या सुमारे ५० वर्षांपासून माझ्या सर्व लिखाणात वापरतो आहे. सावरकरांची ही दोन्ही पुस्तकं माझ्याजवळ आहेत...त्यांचा संदर्भ, मी नेहमी घेतो. ही पुस्तकं, दादरच्या शिवाजी अुद्यानाजवळ असलेल्या सावरक रस्मारकात विक्रीस ठेवली आहेत.
पू र्व स्वीकार ::
मराठी विज्ञान परिषद, मुंबअी आणि विज्ञानप्रसार, दिल्ली यांच्या सहकार्यानं, अेप्रिल २०११ मध्ये, ‘मराठीतील विज्ञान विषयक लेखन....कालखंड १८३० ते १९५० ’हा ग्रंथ, दोन खंडात प्रसिध्द केला. या कालखंडात, मराठीतून प्रसिध्द झालेले ९८१ लेख, खूप परिश्रमानं संकलीत करण्यात आले होते. आर्थिक मर्यादा असल्यामुळं, फक्त २० टक्केच लेख निवडावे असं ठरलं.
यापैकी वैचारिक लेखांची निवड करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली होती. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की, सुमारे १९३० ते १९४० या कालखंडात, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आणि काही अितरही नामवंत लेखकांनी अ ची चौदाखडी वापरली आहे. त्या काळी संगणक नव्हते. परंतू त्यांनी सुचविलेली चौदाखडी आजच्या संगणकयुगात फार अुपयोगी आहे असं वाटतं. पण आता ती कुणीच वापरतांना आढळत नाही. असं का व्हावं कळत नाही.
गजानन वामनाचार्य.
मोबाअील 82911 42539,
कामशेत
Email.: gee.waman@gmail.com
नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.
Comments