top of page

बालक-पालक




"अरे अपूर्व! ऐक न! माझा मोबाईल कुठंय बघ बरं? दे मला." असं आई स्वयंपाक करताना आपल्या मुलाला हाक मारते, पण उत्तर येत नाही म्हणून ती स्वतःच शोधायला हॉल मध्ये येते, तर मुलगा सोफ्यामागे बसून तिच्या मोबाईल वर काही तरी बघत असतो,आणि ती जेंव्हा त्याच्या हातातून मोबाईल काढून घेते,तेंव्हा तिच्या चेहऱ्यावरचे आणि मुलाच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून आपण ही चाट पडतो.

ही आहे एक टेलिव्हिजनवरची एक रिफाईंड ऑईलची जाहिरात. एक जाहिरात म्हणून आपण क्षणभरात ती विसरून ही जातो,किंवा दुर्लक्ष करतो..पण ही गोष्ट दुर्लक्ष करून चालणार आहे का खरंच? तर हे पडताळले पाहिजे.



आज सर्वांच्या हातात मोबाईल आलेत. प्रत्येका कडे स्मार्ट नसला, तरी एक टीव्ही आहेच….इंटरनेट सर्वांसाठी थोडक्यात उपलब्ध आहे. आज अगदी साधारण घरातील व्यक्तीही इंटरनेट सहज वापरू शकते. त्यामुळे होत काय ,की आज 'सारे जग मेरी मुट्ठीमे', अशी परिस्थिती आहे. आज गुगलला तर नुसतं व्हॉइस कमांड दिली, तरी हवे ते तो आपल्यापुढे चित्र,प्रसंग क्षणात उघडून देऊ शकतो. अगदी आरामात लोळत आपण विश्वाच्या कोणत्याही भागाची सफर करू शकतो. हवं ते ज्ञान मिळवू शकतो…



पण...ह्याची दुसरी बाजू पण खूप भयानकता दाखवू लागली आहे. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात असं सहज म्हणतो आपण. किंवा लहानपणी वक्तृत्वात नेहमी एक विषय असायचा, 'विज्ञान एक शाप की वरदान'...म्हणजे दोन्ही बाजू आपण पडताळून पहात होतो. पण आज घडीला या मोबाईल,कॉम्प्युटर ,लॅपटॉप,इ… गोष्टींमुळे या अनेक माध्यमांची दुसरी भयानक बाजू आता आपल्या घरात येऊन बसलीय.आजची लहान मुले टीव्ही वरच्या साध्या जाहिराती बघत, न कळत अनुकरण करत असतात..लक्षात ठेवतात… कंडोम,सॅनिटरी नॅपकिन्स,इनर वेअर या बरोबरच कमी कपड्यातील तरुण तरुणींच्या जाहिराती ही बघतात. आता आपली ही नजर हे सगळं बघायला सरावलेली आहे. काळानुरूप हे बदलायला हवे ही….पण याचा परिणाम आपल्या नवीन येऊ घातलेल्या पिढीवर ही होत आहे, हे लक्षात घ्यायला हवे.आज केजी तील लहान मुलांचे तोंड बंद करायला हातात सर्रास मोबाईल दिले जातात..भले ते गाणी, किंवा कार्टून बघत असतील,पण हे सत्य आहे..त्या एवढ्या लहान मुलांना आजकाल मोबाईल वर ,'हे गुगल'म्हणून कमांड ही देता येते,हे मी बघितले आहे.



आता पुढची गोष्ट म्हणजे मुलांना आपण सिनेमाला नेतो,घरात टीव्ही बघतो, तेंव्हा हे किसिंग शॉट आपण ही त्यांच्या समोर सहजतेने बघतो. त्यांना काय कळते म्हणून….पण नाही, मुलांना भले ही कळत नसेल,पण ती अनुकरण प्रिय असतात. शाळेत, डेकेअर मध्ये आणि घरी ही मुलं आपापसात हे करतात….सगळी नाही पण 20% मुलं जी खूपच लहान आहेत ती. जी तरुण होत आहेत अशा पौगंडावस्थेतील मुलं/मुली खूप संभ्रमावस्थेत आढळतात. एक तर प्रत्यक्ष चित्र आता त्यांच्या पुढे उपलब्ध होत असेल, तर ही मुलं थोडी बिथरणारच न! मग चोरून अशा पॉर्न फिल्मस् ,किंवा अश्लील चित्र,फोटो, व्हिडीओ बघितल्या जातात त्यांच्या कडून. शिवाय आता शाळेपासूनच आपले मूलं कुठं आहे, यासाठी तिला किंवा त्याला मोबाईल घेऊन दिला जातो..प्रत्येक वेळी त्यांच्यावर आपण लक्ष नाही ठेवू शकत.कारण आपला विश्वास असतो. अगदी 100%मान्य ! आपण रस्त्यावरून गाडी चालवत असतो, कारण आपला आपल्यावर पूर्ण विश्वास असतो,पण समोरचा किंवा मागचा येऊन आपल्यावर आदळतो तेंव्हाच अक्सिडेंट होतो. तसाच अपघात इथे होऊ शकतो,जेंव्हा बाहेर समाजात वावरताना मित्रमैत्रिणी किंवा इतर लोकांशी संपर्कात आल्यावर अशा साईटवर जाऊन बघायची इच्छा होते…. चर्चा होऊन ही या गोष्टी बघायची इच्छा होते.



मग आपण केलेले संस्कार कमी पडतात का? आपण आपल्या मुलांकडून सर्व श्लोक, शुभंकरोती, पाढे,इ...सर्व करून घेत आलोय, तर हे कसे शक्य आहे? तर 'हो' असंच उत्तर आहे याचे. ही उत्सुकता किंवा क्युरेसिटी आहे...नवीन वेगळं काही दिसलं,ऐकलं तर त्या बद्दल माहिती काढायची, ही उपजत वृत्ती असते; आणि त्यातून हे घडतचं आणि पुढे ही घडत राहणार आहे.



ह्यामुळेच मागच्या पिढी पेक्षा नवी पिढी लवकर मोठी म्हणजे वयात येताना दिसतेय.याचे कारण ही हेच आहे..पूर्वी 13 किंवा 14 वर्षाच्या आसपास मुलींना ऋतुप्राप्ती व्हायची, मुलांना ही साधारण 15 वर्षाच्या नंतर मिसरूड फुटायची.पण आज हे चित्र बर्याच अंशी बदललेले दिसतेय. मुली आणि मुलं लवकर वयात येऊ लागलीत..त्यामुळे त्यांच्यात भिन्न लिंगी आकर्षण ही लवकर निर्माण होत आहे.



यापुढचा धोका या क्युरेसिटी तुन होण्याचा संभव नाकारता येत नाही, आणि यातून मग प्रयोग म्हणून म्हणा किंवा कुठं तरी वाचलेले,बघितलेले असते, म्हणून हे एखाद्या भिन्न लिंगी व्यक्तीवर आजमावून बघायचा मोह होतो. त्यातून काही मुलं हस्तमैथुनच्या ही आहारी जातात,व त्याचा बळी पडतात.

आजची तरुण पिढी ही या सर्व तांत्रिक माध्यमातून हुशार झालीय. त्यांना आता या सर्वच गोष्टी माहित आहेत. त्यांना आता नावीन्य नाही, की लग्नानंतर काय करतात. आजच्या मुलांना सर्व कल्पना असते. मागच्या पिढीला जेंव्हा हे मोबाईल, टीव्ही ही साधने उपलब्ध नव्हती ,त्यांना लग्नाचे एक गोड आकर्षण असे….त्यांच्या दृष्टीने समोरची व्यक्ती ही पूर्ण अनभिज्ञ असे..त्यामुळे आकर्षणाची गोडी ही अद्भुत होती…【एकमेकांस समजून घेता आई बाबा बनत...आणि नाती टिकुन रहात...आज ही परिस्थिती नीट बघितली की जाणवते,ते हे की फार लवकर ह्यांच्या जोडीतील गोडी कमी होत जातेय.अर्थात सर्व बाबतीत हा निष्कर्ष नाहीय. 】



आता या गोष्टी अपरिहार्य झाल्या आहेत. वैज्ञानिक प्रगती तर उत्तरेत्तोर होतच जाणार. त्याचे लाभ ही होणार पुढच्या पिढीला…..आणि काही तोटे सुद्धा….



आपल्या मुलांना या पासून वाचवायचे असेल, तर आपण एक करू शकतो. अगदी लहान वयापासून म्हणजे तो बडबड करायला लागल्या पासून तो त्याच्या व्यक्त होण्याच्या प्रक्रियेस सुरुवात होते. एक म्हणजे अगदी त्या वयापासून त्याच्याशी सतत बोलणे….याने तो लवकर बोलू लागतो,शिवाय व्यक्त होण्याची प्रकिया काम करू लागते.



दुसरे ते मूल शाळेत प्रवेश करते, तेंव्हा ते समाजात मिसळते. तेंव्हा शाळेतून आल्यावर ते सतत बोलत असते काहीही निरर्थक… पण त्याही वेळी त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकायला हवे. हळूहळू त्याला कळत जाते की आपलं कुणी तरी मन लावून ऐकत आहे. हे त्याच्यासाठी खूप महत्वाचे आहे.जसजसे मूल मोठे होत जाते, तसतसे त्याचे बोलणे ऐकणे व त्यावर आपली प्रतिक्रिया ही द्यायची..म्हणजे त्याच्यात अजून काँफीडन्स वाढत जातो..आपल्यासाठी आपल्या आईला किंवा बाबांना वेळ आहे हे, हे त्याला समजायला लागते आणि ते हळूहळू अजून मोकळे होत जाते. ही प्रोसिजर कायम चालू ठेवावी. मूल अगदी कॉलेजला,नोकरीला लागते तेंव्हा ते आपोआपच मोकळेपणाने बोलू लागते. त्यावेळी आपण प्रत्येक फेज मध्ये मुलाशी नाळ जोडली गेल्याने, योग्य वयात त्याला लैंगिक शिक्षण ही सहज देऊ शकतो. चांगले वाईट याचीही ओळख करून देऊ शकतो. मोकळेपणा आला की या गोष्टी सहज होत जातात….आणि सहज बोलता बोलता दिले गेलेलं ज्ञान नेहमी सकस असत..आणि कायम लक्षात राहत. मग मुलं ही सहजतेने प्रश्न विचारतात आपण ही सहजतेने उत्तरे द्यायची ,मग ती लैंगिक का असेना, किंवा स्त्रीच्या मासिक पाळी विषयी का असेनात....उत्तर तर द्यायलाच हवे आणि ते ही खरे,न लपवता…..आणि असे हे मुलं व पालक यांच्यात सकस नाते घडवायचे असेल, तर मूल जन्माला आल्यापासून ती प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. तू अजून लहान आहेस, तुला काय कळतंय, हे बोलणे टाळावे. आजकाल सर्व वयोगटातील मुलांना सर्व काही समजत आहे, हे आता पालकांना समजून घ्यायची गरज आहे. मुलांना आई वडिलांमध्ये सुद्धा भेदभाव नाही वाटला पाहिजे, कीं हे आई पाशीच,किंवा हे फक्त वडिलांशीच बोलायला हवे. बालक-पालक यांच्यात इतका मोकळे पणा जर कुटुंबात निर्माण झाला, तर मग कोणता ही मुलगा किंवा मुलगी अशी सोफ्यामागे बसून चोरून काही बघणार नाही...हे नक्की.




पल्लवी उमेश

जयसिंगपूर

Email : pallavikularni@gmail.com


ही ब्लॉग पोस्ट कशी वाटली ? लाईक करा, कमेंट करा आणि व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करा.


नविन ब्लॉगचे नोटिफिकेशन येण्यासाठी विश्व मराठीच्या ईमेल लिस्टला सबस्क्राइब करा.

306 views0 comments

Recent Posts

See All

'जात' म्हणजे काय?

जात म्हणजे जन्मत:च तुम्हाला जे जे मिळतं ते तुमचं 'जात' असतं. जात हा शब्द संस्कृत .. जन .. जा या धातूपासून आलेला आहे. जनन, जन्म, पूर्वज,...

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page