सकाळच्या गडबडीमध्ये फोन वाजला.धाकट्या बहिणीचा फोन होता. ती आम्हा दोघांना गुळाच्या पोळ्या केल्या आहेत तेव्हा दोघे जण जेवावयास या असे म्हणत होती.गुळाची पोळी म्हटल्यावर आम्ही दोघांनी तिला हो म्हटलं.जानेवारी महिना होता,आणि तिळ-गुळाचे, संक्रांतीच्या वाणाचे, हळदी कुंकवाचे आणि एकूणच भरपूर गुळाची पोळी खाण्याचे ते दिवस होते.जेवावयास तिच्याकडे जायचे असल्यामुळे बाकीची सगळी आन्हिकं आटोपून आम्ही तिच्याकडे जायला निघालो तेवढ्यात फोन खणखणला.तो फोन माझ्या मैत्रिणीचा होता. ती मला संध्याकाळी संक्रांतिनिमित्त ती करणार असलेल्या हळदी कुंकवासाठी येण्याचं निमंत्रण देत होती.मी तिला बरं म्हटलं आणि दोघेजण माझ्या बहिणीकडे जेवावयास गेलो.
तिच्याकडे गेल्यावर एकूणच गप्पा,तिच्या दोन नातवंडांचा दंगा, आणि एकूणच गुळाच्या पोळीच साग्रसंगीत केलेलं जेवण अंगावर आल्यानं डोळ्यावर झापड येत होती.त्या दिवशी माझ्या बहिणीकडे पण संक्रांती निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता. हळदी कुंकवाचा विषय निघाल्यावर मला एकदम सकाळी माझ्या मैत्रिणीने तिच्याकडे हळदी कुंकवाला येण्याबद्दलच दिलेलं निमंत्रण आठवलं.त्याच वेळी माझ्या बहिणीकडेपण बायका हळदी कुंकवासाठी येऊ लागल्या होत्या.बहिणीने सगळ्यांच्या आधी पहिलं वाण आणि हळदीकुंकू मला दिल आणि आम्ही तिच्याकडून आमच्या घरी यायला निघालो.जानेवारीचे थंडीचे दिवस असल्यामुळे लवकर अंधार पडला होता त्यामुळे आम्हाला माझ्या मैत्रिणीकडे हळदी कुंकवासाठी जायला उशीर झाला होता.
मैत्रिणीच्या दाराची बेल वाजवून उभे राहिलो.काकांनीच दार उघडले आणि ते म्हणाले या या तुमची वाट बघून आत्ताच ही साडी बदलण्यासाठी आत गेली आहे,तेव्हा जरा बसा,ती येईलच आत्ता. आम्ही बसलो आणि मी इकडे तिकडे बघत असताना मंत्रिणीच्या डायनिंग टेबलवर ब्लाउज पीस,चमचे,छोटे काचेचे बाउल,स्टीलच्या वाट्या,तांब्या-भांडे अशा वेगवेगळ्या वस्तू पसरलेल्या दिसल्या. इतकं व्यवस्थित असलेल्या माझ्या मैत्रिणीच्या घरामध्ये डायनिंग टेबलवर हा पसारा कसला असा विचार मी करीत होते,तेवढ्यात ८५/८६ वर्षाची माझी सदाहरित तरुण मैत्रीण आतल्या खोलीतून हसत हसत बाहेर आली आणि तिने मला डायनिंग टेबलापाशी बोलावलं.हळदीकुंकू न देता ती मला डायनिंग टेबलापाशी का बोलावते आहे असा मला प्रश्न पडला. टेबलावरचा पसारा आठवतच मी टेबलापाशी गेले आणि मैत्रीण मला म्हणाली,उमाताई टेबलावर ज्या वस्तू मी ठेवल्या आहेत त्यातलं तुम्हाला काय हवे आहे? हा प्रश्न ऐकून मी भानावर आले आणि प्रश्नार्थक नजरेने मी तिच्याकडे पाहू लागले.माझ्याकडे बघत बघतच मला ती म्हणाली,बऱ्याच वेळा मी परदेशात जाऊन आल्यामुळे हौसे हौसेने येताना मी माझ्या मुलांसाठी,त्यांच्या संसारासाठी छान छान वस्तू जमविल्या होत्या.आता मुल या वस्तू तुलाच ठेव आम्हाला नको असे म्हणतात,त्यामुळे मी ठरवलं की या साऱ्या वस्तू मैत्रिणींना हळदी कुंकवाच्या निमित्ताने द्यायच्या ,पण तुम्हाला यायला उशीर झाला आणि तोपर्यंत छान छान वस्तू हळदी कुंकवाला आलेल्या इतर बायका घेऊन गेल्या,आणि आता उरलेल्या वस्तूंमधून तुम्हाला हवी ती वस्तू घ्या असे ती मला म्हणाली.टेबलावरच्या त्या वस्तूंमधून मी एक छोटस नाशिक घाटाच तांब्या भांड घेतलं.त्यांनी आम्हाला तिळगुळ दिला आणि काकांना आणि माझ्या मैत्रिणीला नमस्कार करून आम्ही आमच्या घरी निघालो.
घरामधले फुटक्या कानाचे कप,मोडक्या छत्र्या अशा अनेक वस्तू सुद्धा जपून ठेवणारे आपण मध्यमवर्गीय लोक आभाळाएव्हढं मन असलेल्या माझ्या मैत्रिणीची लूट बघून थक्क झालो आणि माझी मैत्रीण माझ्या मनाच्या गाभाऱ्यात उच्च स्थानावर जाऊन बसली.
सौ. उमा अनंत जोशी फ्लॅट नं ४, प्लॉट नं ४८, सोनल -२, जयराज कोऑप. होऊ. सोसायटी, आयडियल कॉलनी,कोथरूड, पुणे ४११०३८. फोन. 02025468213 / मोबा. 9420176429.
विश्व मराठी परिषदेचे टेलीग्राम चॅनेल सबस्क्राईब करा
Comments