'सौन्दर्यतत्व ज्यात प्रधान आहे.' ते साहित्य होय. असेच सौन्दर्याचा खजिना आपल्या साहित्यातून वाचकांसमोर उघडणारी एक प्रतिभासंपन्न, शब्दांची उपासना करणारी, सौन्दर्यतत्वाचे आविष्करण करणारी, ललित साहित्याच्या दालनात आपल्या लेखनशैलीने एक विलोभनीय कलाकृती साकारणारी, महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवयित्री,लेखिका प्रा. मीनल येवले .
त्यांचे 'आंदण ' हे ललित लेखांचे पुस्तक मला फार आवडले. पुस्तक हि आवडण्यासारखीच असतात. पण या पुस्तकांच्या शिंपल्यात एखादे पुस्तक मोती म्हणून आपल्याला गवसते. आणि यातून मिळणाऱ्या आनंदाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. तसे काहीसे मनात घर करून राहणारे हे पुस्तक होय. या लेखिकेचे बाह्य रूप हे इंद्रायणी पात्राप्रमाणे गूढ,रहस्यमय,शांत,समाधानी होऊन वाहणारे आहे. जमिनीच्या कुशीत उमलणार फुल ज्याप्रमाणे मातीच्या गुणधर्मानुसार जन्म घेते, त्याप्रमाणे या लेखिकेचा पिंड गावखेड्याच्या वातावरणातून तयार झाला आहे. हि लेखिका त्या मातीचेच एक फुल होय. शहरी भागात वास्तव्य असले तरी ज्या धरणीमातेच्या कुशीत तिचा बीजांकुर रुजला,वाढला,बहरला,फुलाला त्या मातीत असणारे प्रेम,जिव्हाळा,उमाळा,उदारता,कृतज्ञता या साऱ्यांचा तिच्या प्राणात दाटून आलेला भावोघ या पुस्तकात दुथडी भरून वाहताना दिसतो. मनाला संवेदनांची पालवी फुटून सृजनाचं प्रानफूल ती रसिक वाचकांच्या ओंजळीत घालते.
मातीच माझे सासर माहेर, मातीच माझी माय
मी मातीच्या दुधावरची, कृष्णसावळी साय
मी मातीचे गोंदण ल्याले अन मातीचे डूल
मी मातीची लेक लाडकी, मी मातीचे फूल
या शब्दात ती तिचे वर्णन करते. यावरून मातीशी असणाऱ्या घट्ट नात्याची जणू ती ग्वाही देते.
मला तर ती निसर्ग कन्या च भासते. निसर्गाचे मोहक असे ऋतुविभ्रम,झाडं,पानं,फूल या अलंकारांनी नटलेला,सजलेला,मनाला आल्हाद देणारा निसर्ग त्यांच्या या पुस्तकातून आपल्याला पावलोपावली साद घालतो. आपल्या चेतवितो,मोहवितो आणि त्याचबरोबर सृष्टीच्या गूढ महाकाव्याकडे घेऊन जातो. ऋतूबदलातील अत्यंत सूक्ष्म निरीक्षणे टिपताना त्यीच्यातील चिंतनशील लेखिका प्रतिमांनी मोहरून आलेली दिसते. निसर्ग आणि त्याच्या परिघात येणाऱ्या म्हणून ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मनाला प्रफुल्लीत करून जातात.
त्यांची ओघवती शब्दरचना आपला हात धरून निसर्गाच्या जवळ कधी घेऊन जाते हे कळतही नाही. आणि आपणही त्याचा भाग आहोत ,त्याचा रोज अनुभव घेत असल्यासारखे एकरूप होऊन जातो. त्या शिशिराळा आर्ततेशी नातं सांधणारा,विरहाचे प्रतीक मानतात. आतुरता,व्याकुळता,दुरावा या भावनांच्या छटा केवळ शिशिर ऋतूच करू जाणे. शिशिरात होणारी पानझड हि आपल्या आयुष्यातील दुःखे अशीच संपतील हा संदेश देतात आणि त्याचा पुरावा म्हणजे वसंताची चाहूल लागते आणि आपल्या जगण्याला आशेची नवी पालवी फुटून जीवनात असलेली उदासीनता,मरगळ सारी दूर सरून प्रीतीचे,सुखाचे धुमारे फुटू लागतात.
निसर्ग हा मराठी साहित्याचा फार जवळचा आणि जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. इतकेच नव्हे तर बालकवी,केशवसूत, कुसुमाग्रज,बा. भ. बोरकर,शांता शेळके यासारख्या दिग्गज प्रतिभावंतांनी निसर्गाला आपली जणू प्रेयसी,मंमंदिरातील देवता असे मानून तिची आराधना केली,तिच्यावर जीवापाड प्रेम केले व आपल्या साहित्याची फुले तिच्या चरणी अर्पिली. प्रा. मीनल येवले यांच्या सुद्धा साहित्याची निर्मिती निसर्ग आणि त्यातील अद्भुतरम्य अश्या विभ्रमांवरच उभी आहे. आतापर्यंतचे त्याचे प्रकाशित साहित्याचे लेणे यावरच कोरले आहे. त्यांचे लेख हे चेतनगुणोक्ती अलंकार लेवून आपल्या समोर येतात. निसर्गचक्राच्या आवर्तनातलं लाडकं ऋतुरत्न म्हणजे वसंत असं या ऋतूच त्या वर्णन करतात. परमेश्व्राने मानवाला नि वसुंधरेला भलं केलेलं लावण्यखणी ऋतूपर्व म्हणजे वसंत. त्या वसंताचा हात धरून अगदी अलगद आपल्या बालपणात घेऊन जातात. पळस, काटेसावर,पांगारा,बोगनवेल,बाभूळ,यासारख्या उपेक्षित झाडांची दखल घेऊन त्यांचे बहरणे हे सुद्धा आपल्याला काही देऊ पहाते हे सांगण्याची त्यांची धडपड आपल्याला जाणवते. या साऱ्या झाडांशी आपले असणारे युगानुयुगाचे जणू जिव्हाळ्याचे आणि जवळचे नाते आहे असे सांगणारा त्यांचा 'रातराणी,चाफा,अल्मन्ड,स्वस्तिक,कन्हेरी या फुलांचे दान आपल्या पदरी घालत येतो तो वसंत. जणू या साऱ्यांसवे तो रंगोत्सवच साजरा करत असतो. 'मोगरा फुलाला'या लेखात केवळ सावलीच देत नाही तर मनाला चैतन्य,आनंद देण्यासाठी अजबजुन येतं फुलाचं रंगीत,हळवं,कोमल विश्व् याचे संवेदना जागृत करणारे वर्णन लेखिकेने बहारदाररित्या केले आहे. त्यांचा फुलांप्रती असणारा भावनांचा गंध आपल्याला भारावून टाकतो. कर्दळी,सदाफुली,जास्वंद,मधुमालती,गुलाब यांना फुलण्यासाठी,बहरण्यासाठी वसंताची गरज नसते. तर हे सदैव बहरण्याचे भाग्य घेऊन आलेले असतात. पण मोगरा मात्र फुलतो तो मात्र वसंतातच. तप्त उन्हाच्या झळा सोसत फुलून येतो. पानापानातून चैतन्य पसरवतो. आणि म्हणूनच लेखिकेला त्याचे अप्रूप वाटते. म्हणून तो तिला जवळचा वाटतो. ती त्याला तेजाचा उपासक मानते. ती त्याला प्रेमाचे प्रतीक मानते देहभान विसरण्याचा उत्कट क्षणी समर्पणाची फुलं होऊन आयुष्य सुगंधित करतो तो मोगरा. खरंच निसर्गसारखं अनमोल देणं देवाने मानवाच्या पदरात घातलाय याची पुन्हा एकदा प्रचित इथे आल्याशिवाय राहत नाही.
असे आपल्या साऱ्यांचे जीवन आनंदी करणारे,सुगंध व रंग यांची उधळण करणारे फुलांचे वर्णन मन मोहरून टाकते. लेखिका आपल्या 'उन्हवेडी झाडे' या लेखात झाडांची उदारता,एकनिष्ठता यांची प्रचिती देऊ पाहते. सूर्याचे प्रखर तेज सहन करत हिरवी छाया देणाऱ्या या झाडांमधे ओल कुठून येत असेल ? असा प्रश्न तिला पडतो. बहावा, करंज,गुलमोहर,कडुलिंब,अशोक,सप्तपर्णी यासारखी झाडे मानवाच्या मनाला आल्हाद देणारी त्याच्या डोळ्यात हिरवे स्वप्न रुजवणारी अश्या या रणरणत्या उन्हात कशी हिरवी राहतात त्यांची पाने ? असे प्रश्न पडल्याशिवाय कराहतीलया साऱ्यांच्या पंक्तीत बाभळी हीच उल्लेख लेखिका विसरत नाही. बाभळी हि रानाला हिरवाई देण्याचे व्रत नित्यनेमाने जोपासत असते. तिच्याकडे आपली बघण्याची दृष्टी उपेक्षित असली तरी. ग्रीष्मशाखा गुलमोहर या लेखात 'धगधगीत तेजाला केशररंगात विलीन करताना ग्रीष्माला पडलेलं सुंदर स्वप्न म्हणजे गुलमोहर!' या शब्दात गुलमोहराची वर्णन करते. वैशाखातल्या कडकडीत उन्हात त्याच लावण्य येतं ऐन ब्रास. आपले मन रमविण्याचा,रिझवण्याचा पिढ्यानपिढ्या वसा चालवतोय तो गुलमोहर. असा निस्वार्थी, कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता, अडून न बसता, कशाचाही अट्टाहास न करता अप्रतिम सौन्दर्य अंगोपांगी असताना त्याच्यात अडकून न पडता रान्गसौन्दर्याच पुष्पमयी लावण्य उधळत राहतो तो गुलमोहर. अश्या या गुलमोहराकडून घेता येईल का काही आपल्याला! निसर्गातील प्रत्येक घटकांकडून आपल्याला शिकण्यासारखे कसे आणि काय काय आहे याची जाणीव करून देणारे हे पुस्तक म्हणूनच मला फार आवडते. सुखदुःखाना तटस्थपणे पेलण्याचं निर्विकार सामर्थ्य, साऱ्यांवर सावली धरणारी त्याची संयमी वृत्ती, सोसण्याच्या कळा अंगभर लपेटून, देहाचा कण न कण उत्कटतेने फुलविण्याचं त्याचं कौशल्य घ्यावं, जे जे घेता येईल ते. कुणाकडून ओंजळभर पाण्याची अपेक्षा न करता अंगणात,गावात,रस्त्याच्या कडेला,गावाबाहेर गुलमोहर रुजत जातो.
पळस,मोगरा,गुलमोहोर यांना आपण नात्यानेच पाहत आले आहोत पण निसर्गातील हे घटक अद्भुत असे दान आपल्या पदरात घालतात किंबहुना घालत आले आहेत. पण आपण मात्र त्यांची म्हणावी तशी दखल घेत नाही. यासाठी आपला दृष्टिकोन कारणीभूत आहे. त्यासाठी संवेदना जागृत करणे त्या सतत चेतवत ठेवणे नितांत गरजेचे आहे. आणि हि अशी पुस्तकेच आपल्यात या साऱ्या गोष्टी ,जाणिवा निर्माण करण्याचे फार मोठे काम करत असतात. निसर्ग हा दोन्ही हातानी आपल्या जवळील खजिना लुटत असतो. पण आपण कपाळ करंटे मात्र खऱ्या अर्थाने श्रीमंत होण्याचे टाळतो. आपली आत्मकेंद्री वृत्ती सोडून या घटकांशी घटकांशी संवाद साधू शकू त्यांच्या जगण्याशी एकरूप होऊ शकू हाच प्रयत्न लेखिकेने जणू या ललित साहित्याच्या माध्यमातून केला आहे ;असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
'काली घटा छाई ', सौख्याचा मोरपिसारा',' रिमझिम गिरे सावन', या तीन लेखात त्यांनी प्राणिमात्रांबरोबरच साऱ्या सृष्टीला नवचैतन्य,नवसंजीवनी देणारा, ग्रीष्माचा दाह शांत करणारा, धरेला तृप्त करणारा, तळी,विहीर,नदी,नाले याना पुनर्जीवन देणारा,कविमनात कल्पनांची बीज रुजवणारा ,तिचा युगायुगांचा प्राणसखा पाऊस याचे वर्णन केले आहे. मृगसरींपासून सुरु होतो त्याचा प्रवास.आणि मग अंगणी येतो तो श्रावण. कलावंताला अभिव्यक्त होण्याची पर्वणी म्हणजे श्रावण. यात विविध कवींच्या प्रसिद्ध काव्यातील ओळीने लेखिका वाचकांना अक्षरशः भिजवते. श्रावणाची आपण सारेच आतुरतेने वाट पाहत असतो.असा हा चित्तचोर श्रावण. याचे वर्णन अतिशय सुरेख शब्दात केले आहे. 'अजून माती साद घालते',स्नेहबंध या आपल्या लेखात लेखिका गावाकडच्या आठवणींमधे विहार करण्यासाठी घेऊन जाते. मी आधीच म्हंटल्याप्रमाणे तिचे मातीशी असलेले नाते तुटले व खंडलेले नाही. आजही ती माती तिला साद घालते. पंखात बळ आलेले पाखरू पुन्हा घरट्यात ज्या ओढीने सांजेला परत येते. आईपासून कितीही तिचे मुलं शरीराने दूर असले तरी मानाने मात्र ते आईच्या पदराशी बांधलेले असते. अगदी तसेच मातीच्या उबेपासून ती दूर असली तरी ती माती तिला साद घालते ; नुसती सादच नव्हे तर माहेरवाशीण म्हणून निसर्ग,शब्द,प्रतिभा,जाणिवा,कल्पना या साऱ्यां मिळून तिची ओटी भरते. आणि यातूनच तिच्या लेखणीला बळ मिळते. ज्या मातीने बालपण पोसलं, तारुण्य जोपासलं त्या मातीचा गंध तिच्या मनात अजूनही ताजा होऊन दरवळत असतो. तिची मातीशी जुळलेली नाळ आजही तशीच आहे. ते स्न्हेबंध आजही तिने जपले आहे. सासुरवाशीण हि आपले माहेर कलेखिका निसर्ग कन्या असल्यामुळे तिच्या नसानसात,रोमरोमात,शब्दाशब्दात खळखळणारा,बहरणारा,ओढ लावणारा,वेड लावणारा,ऋतुगणिक नवनवीन,उत्तेजक रसांचे पान करणारा चैतन्यमयी प्रवाह तिच्या या पुस्तकातून वाहताना दिसतो,आणि हेच तिचे वेगळेपण आहे.
'हेमंतच्या अस्तित्वखुणा' या लेखात ती हेमंतची गाणी गुणगुणते. ऋतूबदलाविषयीची असणारी तिच्यात दाटलेली उत्कटता पावलोपावली आपल्याला दिसते. जणू ऋतू तिला साद घालतो आणि आपल्या लेखणीतून ती त्याला प्रतिसाद देते. ती म्हणते माझ्यासारखे तुम्हीही या ऋतूंशी मैत्री करून पहा , तुमच्या मनात देखील हा झरा ओथंबून येईल. ती कलावंताला सिकंदराची उपमा देते. त्याच्या वृत्तीनेच तो नव्या,सत्याच्या जवळ घेऊन जाणाऱ्या, माणसाच्या जगण्याला खऱ्या अर्थाने फुलवणाऱ्या,भरणाऱ्या,भव्य दिव्य अश्या अद्भुत जगात घेऊन जातो. आणि खऱ्याखुऱ्या निर्मळ अश्या सौन्दर्याची अनुभूती देतो. लेखिका ऋतूच्या वागण्यातील विसंगती नाही स्वीकारू शकत माणूस सहजपणे. असे मत मांडते. तो आपल्याच नित्यनेमाचा,जागरहाटीच्या धावणाऱ्या,पळणाऱ्या धडपडणाऱ्या चक्राच्या कचाट्यात असा गुंतलेला असतो,कि त्याला हे सृष्टीचे,निसर्गाचे प्रकाशमान,तेजोमय,सारा तिमिर,अंधार पुसून टाकणाऱ्या या विश्वाचे दर्शन जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत त्याचे विश्वाशी एकरूप होणे अशक्य आहे. रंग,रस,गंधाचा परिपोष करणारा आगळा वेगळा ऋतू असे ती हेमंत ऋतूचे वर्णन करते. जणू या रसपानाने मनुष्य पुन्हा ताजातवाना होऊन आपल्या रंध्रात चैतन्याचे घडे भरून घेऊन जगण्याचे बळ एकवटून घेतो.
शेवटच्या आपल्या 'निळी सावली गोकर्णी' या लेखात लेखिका निसर्गाच्या रंगपेटीतील अश्याच एका रंगाची नक्षी शब्दांच्या कुंचल्यातून आपल्या मनात रेखाटते. गोकर्णी सर्वपरिचित नाव. पाकळीचा गाईच्या कानासारखा आकार म्हणून गोकर्णी. इवल्याश्या बंद मुठीत साऱ्या विश्वाचं राज दडून असावं तशी तिची कळी लांबुडकी,कुण्या ललनेच्या मिटलेल्या सुकोमल पापण्यांसारखी. असे निसर्गात कितीतरी घटक आहेत जे आजही आपल्याला परिचयाचे नाही. साधी आपण त्यांची नावेही ऐकलेली नसतात. तिचे वर्णन करणे तर दूरच! अशीच एक उपेक्षित असलेली गोकर्णी ; तिचे वर्णन वाचून आपल्या मनात मात्र कायमचे घर करून जाते. आपल्या निळ्यासावळ्या देहाने युगंधर श्रीकृष्णाला आणि सार्वधिपती महारुद्र शंकराला आकर्षित करणारी गोकर्णी. लाभलेल्या अल्पायुष्यातही सण समारंभाच्या उत्साही ऋतूत श्रावण-भाद्रपदाशी असलेले आपले पूर्वापार लागेबांधे जेवढे म्हणून जपता येतील त्यासाठी हि गोकर्णी आपलं सर्वस्व पणाला लावत मोहरून येते.
असे शब्दांचे गूढ, सुंदर, लावण्यपूर्ण, सुंगधी, रंगीबेरंगी, शांत, अद्भुत, हे रस आपल्या साहित्यातून आपल्याला याची चव चाखायला लावणारी,जीवन सुरेख करणारे,जगण्यावर असीम निष्ठा वाढवणारे,उणिवांत सुख मानणाऱ्या त्या प्रत्येक निसर्गदत्त प्राणपणाने भरलेल्या घटकाशी आपली ओळख करून देऊन त्यांच्याकडून मानवाला मिळालेल्या आंदणाची आठवण करून देते. नवरसानी युक्त असा निसर्गराजा आंदण म्हणून मनुष्याच्या झोळीत परमेश्वराने घातला आहे. तेव्हा त्याच्याशी फारकत घेऊन कसे चालेले त्याला वगळून , वा त्याच्याशी असलेले नाते तोडून माणूस जगू शकणार नाही; कारण हा निसर्गच त्याच्या जगण्याचे साधन आहे. श्वास आहे. असेच लेखिकेला आपल्या या पुस्तकातून सांगायचे आहे. धीच विसरत नाही. असेच आहे.
नाव - सौ. मृगा मंदार पागे
मो. नंबर - ९७६६०१८२१६
शहर - नागपूर
Email.: mrugapagey@gmail.com
विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअॅप लिस्टमध्ये सामील व्हा - 7066251262 हा व्हॉट्सअॅप क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMP असा मेसेज पाठवा
Comentários