top of page
Writer's pictureVishwa Marathi Parishad

" वसा "


लहानपणी दररोजच

चौकातील गजावर बसलेल्या

चिमण्यांच्या चिवचिवाटाने

येणारी पहाट

सुखावह होऊन जायची

रविवारी मात्र

भल्या मोठ्या

तोंडोळीच्या वाड्यात

सोबतीला

सुर्योदयालाच आईचे स्वर ही

कानावर पडायचे ;


" तुला रे वसा कशाला हवा ? उतशील : मातशील : घेतला वसा टाकून देशील "


नागवेलीच्या पानावर मांडलेली पुजा

त्या पाटाभोवती

आम्ही हात जोडून बसलेलो बहिणभावंडे ;


खरं सांगू ?

त्या मांडलेल्या पूजेकडे कमी

त्या कथेत रमणारे आम्ही

आईकडेच कुतूहलाने

जास्त टक लावून बघायचो ;


वसा म्हणजे काय ? उतशील ; मातशील ??

पूर्ण अर्थबोध न झालेले आम्ही

इवल्या इवल्या डोळयांनी

जगाचा शोध लागल्यासारखे

डोळे होता होईल तेवढे

नकळतपणे मोठ्ठे करायचो ;


पण आताशा थोडसं

अंधश्रद्धेच्या उंबरठ्याबाहेर

पाऊल टाकत

सजग झालेल्या

आपल्या सर्वांच्या नजरेतून

मनात डोकावलं तर----


खरचं आपल्यातील

किती जणांना उमजलं

वसा तो काय असतो ?


आपण कुठला वसा घेतला

कि घेतलाच नाही ?

जर घेतलाच तर तो

आपली नीयत विकून

बाजारात तर मांडला नाही ना ?


नाही म्हणायला काहीजण

अखेरच्या श्वासापर्यंत

मिळालेला वसा

स्वतःचे निर्माल्य होऊनच

पूर्णत्वास नेतात

तर काही ठिकाणी

दैवाने दिलेला

कर्माने गमावला तर नाही ना ?

असे पुन्हा एकदा कथेप्रमाणेच

विचारण्यास भाग पाडतात


थोडसं अंतर्मुख होऊन

बघितले तर

बऱ्याच ठिकाणी

मला लख्ख दिसतंय


" उतणार नाही

मातणार नाही " म्हणायला


मिळालेला वसा तर

कळायला हवा ना ----- ?

नी मी बरेच बघितलेत

आयुष्याची संध्याकाळ

व्हायला आली तरी

पदरात वसाच

न् पडलेले


मग त्यांचं काय---?

कि देवाला वेळच नाही

ओटीत जोगवा घालायला---- ? नी


" घेतला वसा टाकणार नाही " ऐकायला

देवच जाणे----?


पण काही म्हणा

लहानपणी तोंडोळीच्या वाड्यात

आईचा तो निनादलेला स्वर


न् जाणे

कधी न पाहिलेल्या

अनादी काळापासून

पण आजही स्त्री ने

घेतलेला आणि घराघरांतून

कमालीच्या ममतेने

अधिष्ठीत झालेला

" आई "

नावाचा वसा देवालाही

" तथास्तु "

म्हणायला भाग पाडतो ;


कारण फक्त इथेच

वसा घेणारी स्त्री नाही तर

जीचा वसा घेतला

ती आदित्य शक्तीच

म्हणते आहे


" मला फक्त विश्र्वास नाही तर

पूर्ण खात्री आहे

हे आदिमाये

तु उतणार नाही ; मातणार नाही

घेतला वसा कधी

टाकणार नाही ---! "


सुभाष मधुकरराव तोंडोळकर

औरंगाबाद

मोबाईल नंबर 9595611161

Email. tondolkar@gmail.com

689 views1 comment

Recent Posts

See All

1件のコメント


Sunil Khot
2021年3月07日

वसा ही कथा-कविता स्वरुपातली असून नेमकेपणाने मांडलेली आहे...... खूप छान..

いいね!
टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page