ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते | पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवा वशीश्यते || अर्थ :: (अेका धार्मिक पुस्तकात आढळला) ब्रम्ह पूर्ण आहे, भासमान निर्मितीही पूर्णच आहे, ब्रम्हापासून विश्वनिर्मिती झाली आहे तरी ब्रम्ह परिपूर्णच आहे.
हा अर्थ वाचून, ब्रम्ह म्हणजे काय हे नेमकं समजलंच नाही. विश्वनिर्मितीचं कारण म्हणजे ब्रम्ह आहे का? परमेश्वरानं विश्व निर्माण केलं असं आपलं अध्यात्म सांगतं. याचा अर्थ म्हणजे परमेश्वर हेच ब्रम्ह. शेवटी प्रश्न राहतोच. परमेश्वराला म्हणजे ब्रम्हाला कोणी निर्माण केलं. उत्तर अगदी सोपं आहे. परमेश्वर म्हणजे ब्रम्ह स्वयंभू आहे. हाही विचार आपल्या मेंदूला झेपत नाही.
गुगलवर शोधलं तेव्हा पुढील माहिती मिळाली :-
हा श्लोक बृहदारण्यक अुपनिषदाच्या पाचव्या अध्यायात आहे आणि तो अीशावास्य अुपनिषदाचा शांतीपाठ आहे.
शब्दश: अर्थ ---अद: (ते) ब्रम्ह, इदं (हे) विश्व सर्व प्रकारे परिपूर्ण आहे. पूर्णात (पूर्णापासून) पूर्णमुदच्यते (पूर्ण) निर्माण होतं तेही पूर्णच आहे. पूर्णातून पूर्ण वजा केलं तरी पूर्णच शिल्लक राहतं.
अीश्वर, परमेश्वर, परमात्मा या संकलपना आहेत. अीश्वर ही मानवी स्वरूप असलेली व्यक्ती नसून ती शक्ती आहे. या विश्वात कोणतीही घटना कारणाशिवाय घडत नाही आणि त्यात कोणत्यातरी अुर्जेचा सहभाग असतोच असतो. हे विश्व हे वास्तव आहे त्याअर्थी ते कोणत्यातरी कारणानं निर्माण झालेलं असणार हा तर्कशूध्द विचार आपल्या पूर्वज विचारवंतांच्या मेंदूत आला असणार. त्या कारणाला त्यांनी अीश्वर हे नाव दिलं. विश्वाला, निर्माण करणाराच असला पाहिजे हाच विचार होता. अन्य कोणत्यातरी कारणामुळे विश्व निर्माण होअू शकतं हा विचारच केला गेला नाही.
शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अभियंते, डॉक्टर वगैरे विज्ञान जाणणार्या व्यक्ती आपल्या पारंपारिक अध्यात्माला विज्ञानीय दृष्टीकोनातून पुष्टी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण त्यांच्या प्रयत्नांना अध्यात्मवाद्यांनी सहकार्य दिलं पाहिजे.
आपलं अध्यात्म गेल्या सुमारे ५००० वर्षांपासून गोठलं आहे. त्यात अुत्क्रांती झालीच नाही. आता विज्ञानानं, निसर्गासंबंधी, विश्वासंबंधी आणि सजीवांसंबंधी, खूप आणि खात्रीपूर्ण माहिती मिळविली आहे. विज्ञानाचे निष्कर्ष, योग्य परिस्थिती जुळवून आणल्यास, कुणालाही, केव्हाही, कुठेही आणि कितीही वेळा पडताळून पाहता येतात. या महितीचा अुपयोग करून आपल्या अध्यात्मिक संकल्पनांना नव्यानं पुष्टी देणं शक्य आहे.
अुदाहरणार्थ गीतेच्या ११ व्या अध्यायात, श्रीकृष्णानं अर्जुनाला विश्वरूप दर्शन घडविलं. ते फक्त अर्जुनच पाहू शकला. पण आता हबल दुर्बिणीनं विश्वाचं वास्तव रूप प्रत्यक्ष दाखविलं. ते कुणीही, केव्हाही आणि कितीही वेळा पाहू शकतं. चंद्राचरचे खड्डे, शनीची कडी, गुरूचे चंद्र, मंगळ आणि गुरूग्रहांच्या कक्षांच्या मधोमध असलेला लघुग्रहांचा पट्टा, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो हे ग्रह, दूरदूरच्या आकाशगंगा, वेळोवेळी दर्शन देणारे धूमकेतू, कृष्णविवरं, पल्सार तारे वगैरे शिवाय गीतेतलं विश्वरूप दर्शन अपूर्ण आहे असं नाही वाटत? आपल्या पूर्वज विचारवंतांनी, नुसत्या डोळ्यांनी बघून विश्वासंबंधी नोंदी केल्या हे खरोखर खूप कौतुकास्पद आहे आणि ते ज्ञान आपल्यापर्यंत पोचलं हे आपलं सुदैव आहे.
या श्लोकाचा, विज्ञानीय दृष्टीकोनातून, मी लावलेला, व्यवहार्य अन्वयार्थ ::
(१) हा श्लोक सजीवांच्या मातेला, आअीला देखील लागू पडतो, कसा तो ध्यानात घ्या.
माता किंवा मादी ही परिपूर्ण सजीव असते, ती, तिच्यासारख्याच सजीवाला, (अपत्याला) जन्म देअू शकते, जन्मलेला सजीव (अपत्य) हा देखील परिपूर्ण असतो, हा सजीवही दुसऱ्या सजीवाला जन्म देअू शकतो. जनक सजीव आणि जात सजीव, (अपत्य) दोन्हीही स्वतंत्रपणे दुसऱ्या जिवंत सजीवाची निर्मिती करू शकतात. अेका परिपूर्ण सजीवाने दुसऱ्या परिपूर्ण सजीवाला जन्म दिला तरी तोही जननक्षम असा परिपूर्णच शिल्लक राहतो.
२) हा श्लोक, वनस्पतींना देखील लागू पडतो. झाडाची बी जमिनीत पेरली, तिला थोडं पाणी आणि सूर्यप्रकाश मिळाला की अंकुर फुटतो. बी मध्ये बंदिस्त असलेले आनुवंशिक संकेत अुलगडू लागतात आणि झाडाचा जन्म होअून ते वाढू लागते. बी हा जनक परिपूर्ण असतो आणि निर्माण झालेलं झाडही परिपूर्णच असतं. पुढे झाड मोठं होतं, त्याला फुलं येतात नंतर फळं येतात, त्यात, त्या झाडाचे सर्व गुणधर्म असलेले आनुवंशिक तत्व असलेल्या बिया निर्माण होतात आणि त्या झाडाचा वंश पुढे चालू राहतो. येथे झाड हे जनक परिपूर्ण आहे आणि त्यानं निर्मिलेली बी ही परिपूर्णच आहे कारण त्या बी पासून पुढे, परिपूर्ण झाडाची निर्मिती होअू शकते. जनक झाडाला पुढल्या वर्षीही फुलं, फळं आणि बियाही येतात म्हणजे ते परिपूर्णच शिल्लक राहतं.
झाडाची बी, न पेरता, त्या झाडाची लहानशी फांदी तोडून ती जमिनीत खोवली, तिला रोज थोडं पाणी घातलं, सूर्यप्रकाश मिळाला की काही दिवसांनी, त्या फांदीला मूळं फुटतात, पानं फुटतात आणि झाड वाढू लागतं. त्यालाही फुलं येतात, फळं येतात, बिया निर्माण होतात आणि झाडाचा वंश पुढे चालू राहतो. म्हणजे परिपूर्ण झाडाची फांदीही परिपूर्णच असते आणि तिच्यामुळे निर्माण झालेलं झाडही परिपू्र्णच असतं.
३) हा श्लोक सजीवाच्या पेशीलाही लागू पडतो. सजीवांची अेक पेशी परिपूर्ण असते. या पूर्ण पेशीपासून दुसरी पेशी निर्माण होते. तरी तीही परिपूर्णच असते. परिपूर्ण अशी दुसरी पेशी निर्माण झाली तरी पहिली पेशी परिपूर्णच असते, दुसरी पेशी, पहिल्या पेशीपासून निर्माण झाली असली तरी ती तिसरी परिपूर्ण पेशी निर्माण करू शकते. जात पेशी परिपूर्ण असली तरी जनक पेशी पूर्णच शिल्लक राहते.
४) हा श्लोक सजीवांच्या, डीअेनअे च्या स्वरूपातील, आनुवंशिक तत्वास आणि आनुवंशिक आज्ञावलीसही तंतोतंत लागू पडतो. या आनुवंशिक तत्वामुळे सजीवांच्या जिवंत पेशी निर्माण होतात. पेशींचे विभाजन होअून अनेक पेशी निर्माण होतात. मातेच्या गर्भाशयात मूळ पिंड पेशीपासून विभाजनानं अेकाच्या दोन, दोनाच्या चार, चाराच्या आठ अशी वाढ होअून केवळ सुमारे ३७ आठवड्यात परिपूर्ण मानवी बालक जन्म घेतं.
वाढीव पेशी वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. हाडांच्या पेशी वेगळ्या, ह्र्दयाच्या पेशी वेगळ्या, ज्ञानेंद्रियांच्या पेशी वेगळ्या वगैरे वगैरे...प्रत्येक पेशीला, शरीराच्या कोणत्या भागात स्थिर व्हायचं हे माहित असतं. आनुवंशिक तत्व आणि आनुवंशिक आज्ञावलीमुळे हे सर्व ठरलेलं असतं.
परिपूर्ण मानवी देहात, १ या अंकावर १४ शून्यं मांडून जी संख्या होते तितक्या जिवंत पेशी असतात. अेका पेशीपासून दुसरी पेशी निर्माण होते तरी दोन्ही पेशी परिपूर्ण तर असतातच, पण त्या दोन्ही पेशी स्वतंत्रपणे कार्य करू शकतात.
Comentarios