पु.लंच्या वल्ली या चौकटीत बसणारे मन मौजी आणि स्वच्छंदी व्यक्तिमत्व म्हणजे आमचे पकोबा.
वयाच्या सत्तरीतले, विनोदी, हजर जबाबी, उत्तम चेस आणि व्हॉलीबॉल खेळाडू आणि मेषेच्या व्यक्तीला शोभेल असा खोडकर आणि खट्याळ स्वभाव. चुकूनही कुणी यांची टर उडवली तर हसत हसत विनोद तुमच्याच गळ्यात उतरवला जाईल याची खात्री.
लहानपणी चुकून साप हातात घेतला आणि मग काय बाबां कडून केळ्याच्या सोपट्याने बसला मार.
वडील पोलिसात असल्याने जेवढे कडक तेवढेच आपले पकोब मऊ स्वभावाचे.
कोणताही विषय घ्या इतिहास, भूगोल, खेळ, पकोबा काही गूगल पेक्षा कमी नाही. जगातलं कुठलं विमान कोणता मार्गाने जातं आणि का जातं पासून जिथे गूगल अद्याप पोहोचला नाही अश्या गावातील रस्त्याची माहिती यांच्याकडे जरूर मिळते.
बोलायची इतकी आवड की घरात आलेल्या पेस्ट कंट्रोल वाल्या माणसा पासून तर खालच्या वॉचमन पर्यंत सगळ्याचं मूळ गाव यांना माहीत असतं. अगदी अमेरिकेत यांना एखाद्या अनोळखी तलावावर फिरायला सोडलं तेव्हा तिथे पण हे मनसोक्त ओळखी काढून गप्पा मारून येतात.
सरकारी बँका तर पकोबांमुळेच चालतात जणू. सगळ्या सरकारी बँकेत यांचं एकतरी खातं असलच पाहिजे. पासबुक अपडेट करणे हा यांचा आवडता उद्योग. बँकेतील लोक यांना एवढं छान ओळखतात की एक दोन वेळा तर बँकेतील कर्मचाऱ्यांनी यांना सही न घेताच पैसे दिलेत.मग पकोबांना फोन आला की साहेब कृपया सही करून जा नाहीतर आमची नोकरी जाईल.
पकोबा म्हणजे सगळ्या भाच्यांचा आवडता मामा आणि सगळ्या नातवंडांचे आवडते आजोबा. मुळातच दिलदार स्वभाव, खेळकर, हसरे व्यक्तिमत्व त्या मुळे माणसं यांच्याशी पटकन जोडली जातात. सुट्टीमध्ये सगळ्या बच्चे कंपनीला घेऊन कधी सज्जनगड तर कधी अजिंक्यतारा असा भरपूर फिरवणे आणि मनसोक्त खायला घालणे हा यांचा आवडता छंद. एकदातर लग्नातील व्हराडी मंडळींना चहा मिळत नाही म्हणल्यावर यांनी अख्ख्या व्हराडासाठी चहा नाष्टा मागवला.
जुन्या वस्तू सांभाळायची यांना एव्हढी सवय असते की कपटातला अर्धा कप्पा कपडे सोडल्यास बाकी कपाटात फाईल्स, आणि जुन्या वस्तू सापडतात.वेळेवर कामाचा कागद नाही सापडला तरी वीस वर्षापूर्वीची बिलं नक्कीच सापडतात.
खाण्याचा बाबतीत पकोबा म्हणजे पोह्यातली मोहरी सुद्धा शोधून बाहेर काढणारे आणि वाटण्याच्या उसळीचे साल बाजूला काढून खाणारे खवय्ये.जेवणाची यांची कल्पना म्हणजे डोसा, सँडविच, भजी, वडे आणि केळी. घरातून फिरायला म्हणून बाहेर गेल्यास नक्कीच ते तुम्हाला सॅन्डविच च्या गाडीवर गरम सॅन्डविच आणि कटिंग चहा चोपतांना दिसतील आणि घरी जेवायचं विचारल्यावर जमेल तेवढा गरीब चेहरा करून भूक नाही असं सांगतील.
आता रिटायर्ड असले तरी कंपनीच्या गप्पा पकोबांचा आवडीचा विषय. तिथल्या कॅन्टीन मध्ये शिफ्ट ड्युटी करताना यांनी कशी ऐष केली या गप्पांमध्ये ते तासनतास रमतात. कंपनीत मिळणारी बिस्कीटं खाऊनच बहुदा यांची मूले कशी मोठी झाली असं ते कंपनीच्या इतक्या वर्ष वापरत असलेल्या टॉवेल ने नाक पुसत सांगतात.
दिलदार, अस्सल खवय्या, मन मोकळा स्वभाव, उस्फुर्त बोलणं, मनमुराद गप्पा, खेळ, फिरणे, गाणी, नाटक यांची आवड असणारा, असेल तो दिवस आनंदात घालवणारा असा स्वच्छ मनाचा वल्ली प्रत्येकाच्या आयुष्यात असावा...
नाव: रोहिणी कुलकर्णी (स्त्री)
मोबाईल: ९८१९७५५९१९
शहर: ठाणे
email:rokul.rk@gmail.com
Attachments area
Comments