top of page

आपले मराठी वर्ष -" चैत्र " महिनासर्व प्रथम सर्व सुहृदांना गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या अमृतमयी शुभेच्छा .


वरील रांगोळीची संकल्पना सौ . उमा जोशी यांची तर रांगोळीचे रेखाटन श्रीमती सुधा फडके,म्हणजेच माझी आई यांची.


चैत्रांगणाच्या रांगोळीबद्दलची माहिती :


होळी पौर्णिमा झाल्यावर मराठी मनाला वेध लागतात ते नववर्षाचे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला नवीन मराठी वर्ष सुरू होत. या चैत्र महिन्यामध्ये जणू घरातल्या लाडक्या माहेरवाशिणीच्या रुपामध्येच मोठ्या हौसेनं चैत्रगौरीचं महिन्याभरासाठी आगमन होतं. आपल्या रोजच्या पूजेमधीलच अन्नपूर्णामाता निराळ्या आसनावर बसविली जाते. कुणी तिला पाळण्यातही बसवतात. तिची रोज मनोभावे पूजा करून गोडाधोडाचा नैवेद्य दाखविला जातो. त्यानिमित्त आजूबाजूच्या चार सुवासिनींना बोलावून हळदीकुंकू केलं जातं . ही अन्नपूर्णादेवी म्हणजे माता पार्वतीच आपल्या घरी महिनाभर वास करते असं समजलं जातं. तिच्या स्वागतासाठी जी रांगोळी महिनाभर काढली जाते , तिला "चैत्रांगण" असे म्हणतात. घरापुढच्या अंगणात शेणाने सारवलेल्या जमिनीवर ही रांगोळी काढली जाते. देवी पार्वतीच्या रुपाला शोभेलशी तिची शस्त्रे म्हणजे शंख,चक्र,गदा, पद्म आणि तिची वाहने गाय, हत्ती,कासव,नाग आणि गरुड त्याचप्रमाणे तिची कंगवा,फणी,करंडा ,आरसा अशी सौभाग्यलेणी तसेच सुवासिनीच्या ओटीचे ताट आणि दारचे तुळशी वृंदावन या साऱ्या शुभचिन्हांची रांगोळीने चितारलेली आकृती म्हणजे चैत्रांगण. त्यामध्ये मग गौरीचा मुलगा म्हणजे आपला लाडका गणराया पण रेखाटला जातो. कारण तो आपल्या आईला घरी न्यायला आलेला आहे अशी छानशी कल्पना त्यामागे आहे. असं या आपल्या माहेरवाशिणीच महिनाभर कोडकौतुक करून मग चैत्र महिना संपला की वैशाख शुद्ध तृतीया ( अक्षय तृतीया ) या दिवशी या अन्नपूर्णा मातेला परत सर्व देवांमध्ये बसवून रोजच्यासारखी पूजा केली जाते.अशा या आपल्या विसरत चाललेल्या रेखीव परंपरेचा वारसा जपण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे .


आपले मराठी वर्ष म्हणजे

चैत्र म्हणजे


चैत्र हा हिंदू पंचांगानुसार मराठी वर्षाचा पहिला महिना आहे. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिना चैत्र प्रतिपदेला ( गुढी पाडव्याला) सुरू होतो. चैत्र महिना साधारणपणे मार्च आणि एप्रिल महिन्यात येतो.


हिंदू पंचांगाप्रमाणे आपले मराठी महिने चंद्राचं पृथ्वी भोवती होत असलेल भ्रमण लक्षात घेऊन त्याप्रमाणे ठरविले जातात.या महिन्यातील पौर्णिमेला चंद्र चित्रा नक्षत्राच्या सान्निध्यात असतो म्हणून या मराठी महिन्याला चैत्र महिना असे म्हणतात.चैत्र महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात होते. चैत्र म्हणजे कडक ऊन. चैत्राचा उदय म्हणजे साऱ्यांनाच नवी उमेद आणि नवा उत्साह यातून फुलत जाणारे उत्सव समारंभ,निरनिराळ्या रंगाच्या आणि वासाच्या फुलांची होत रहाणारी बरसात आणि नवलाई ल्यालेली पालवीची झाडे एकूणच हा सृष्टीचा सोहोळा असतो. कडक उन्हामुळे चैत्र महिन्यात हवा खूप गरम असते. त्याच सुमारास झाडावर चैत्र पालवी आलेली असते आणि त्याच वेळी गुलमोहराला बहर येतो आणि लाल फुलांचा सडा जमिनीवर पडतो. चैत्र महिन्यात बहाव्याला पण खूप छान बहर येतो आणि तो आपली पिवळी फुले मिरवत छान उभा असतो. फळांचा राजा आंबा याच काळात मोहरतो आणि आपल्या रसाळ फळांनी खवैयांना आकर्षून घेतो. चैत्राचे दिवस म्हणजे गावोगावी होणाऱ्या जत्रा,यात्रांचे दिवस.बहुतेक साऱ्या ग्रामदेवतांच्या यात्रा चैत्रातच असतात.


गुढीपाडवा , चैत्र शुद्ध प्रतिपदा.


गुढीपाडवा हा हिंदू पंचांगाप्रमाणे मराठी वर्षाचा पहिला दिवस मानला जातो . चैत्र महिन्याची वर्ष प्रतिपदा म्हणजेच मराठी नवीन वर्षाचा आरंभ म्हणजेच गुढीपाडवा. या दिवसापासून नवीन शालिवाहन संवत्सर सुरू होते. आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरा होणारा गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. म्हणून कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी हा दिवस अतिशय उत्तम आणि शुभ मानला जातो. जेव्हां दुष्टांचा संहार होतो आणि सुष्टांना विजय मिळतो तेव्हां आनंद व्यक्त करायचे साधन म्हणजे गुढ्या उभारणे असे आपल्याकडे मानतात. श्रीरामांनी वालीचा वध करून समस्त वानर सेनेला त्याच्या त्रासापासून वाचविले होते तसेच रावणाचा वध करून श्रीराम जेव्हां सितामाईंना घेऊन अयोध्येला परत आले , या दोन्ही वेळेला समस्त नगरजनांनी गुढ्या तोरणे उभारून आनंद व्यक्त करून त्यांचे स्वागत केले होते तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा होता. म्हणून या दिवशी आपण सर्वजण उंच गुढ्या उभारून आपला आनंद व्यक्त करतो. ही उभारलेली गुढी सूर्यास्ताच्या आधी अक्षता टाकून उतरविली जाते . गुढीला ब्रम्हध्वज असेही म्हणतात. विजयाचे प्रतीक हे उंच असते म्हणूनच आपण गुढी उंच उभी करतो आणि या दिवशी गुढीपाडवा हा सण साजरा करतो.


गुढीपाडवा हा दिवस मराठी माणसांसाठी खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी घराला सजवून,रांगोळ्या काढून,दाराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधून गुढी उभारली जाते. गुढी उभारताना छोटा कलश आणि खण यांच्या बरोबरीने गुढीला साखरेची गाठी,चाफ्याच्या फुलांचा हार,कडुनिंबाची आणि आंब्याची डहाळी बांधली जाते. या दिवसापासून हवेमध्ये उष्णता वाढत जाते त्यामुळे कडुनिंबाचे महत्व आहे. पाडव्याच्या दिवशी कडुनिंबाची गूळ आणि जिरे घालून केलेली चटणी खाण्याची पद्धत आहे. आयुर्वेदानुसार कडुनिंब औषधी आहे आणि कडुनिंब हा हवा शुद्ध पण करतो ,म्हणून या दिवसात कडुनिंबाला फार महत्व आहे. मागे घडलेल्या कडु गोष्टी विसरून नवीन वर्षाची सुरुवात गोडव्याने करावी असे मानतात म्हणून साखरेची गाठी पण गुढीला बांधतात आणि घरोघरी गोडा धोडाचा स्वयंपाक होतो. अंघोळीच्या पाण्यातसुद्धा कडुनिंबाची पाने टाकतात त्याचेही आयुर्वेदिक महत्व आहे. गुढीपाडव्याचा सण आंध्र प्रदेश आणि कर्नाटक मध्ये उगादी या नावाने साजरा केला जातो.

चैत्र शुद्धप्रतिपदा , किंवा गुढी पाडव्याच्या दिवशी ब्राम्हदेवांनी सृष्टीची उत्पत्ती करायला सुरुवात केली ,आणि याच दिवशी शिव पार्वतींचा विवाह झाला होता असे उल्लेख पुराणात सापडतात.


श्री. अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिन, चैत्र शुद्ध द्वितीया.

श्री.अक्कलकोट स्वामी महाराज पुण्यतिथी , चैत्र कृष्ण त्रयोदशी.


अक्कलकोट निवासी श्री. स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातल्या अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे. चैत्र शुद्ध द्वितीया हा दिवस श्री . स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन म्हणून ओळखला जातो."भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" या त्यांच्या वचनाने अनेकांना कठीण प्रसंगातूनही पुन्हा उभे राहण्यासाठी प्रेरणा मिळते. श्री . स्वामी समर्थ यांनी चैत्र वद्य त्रयोदशीला अक्कलकोट येथे"वटवृक्ष समाधी मठ स्थानी" दुपारच्या वेळी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली.


गौरी तृतीया ( तीज ) , चैत्र शुद्ध तृतीया.


महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुद्ध पक्षात चैत्र शुद्ध

तृतीयेपासून चैत्र गौर बसविली जाते. या दिवसाला गौरी तीज असेही म्हणतात .देवातल्या अन्नपूर्णा देवीला झोपाळ्यात बसवून महिनाभर म्हणजे वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय तृतीया ) पर्यंत तिची पूजा केली जाते. शिवपत्नी पार्वतीची ही गौरी रूपातील पूजा होय. हा चैत्र महिन्यातील मराठी स्त्रिया साजरा करीत असलेला एक पारंपरिक सोहळा आहे. स्त्रिया आपापल्या घरी हा सोहळा साजरा करतात. एका छोट्या सुंदर पाळण्यामध्ये गौरीची स्थापना करतात. या दिवशी आंब्याची डाळ,कैरीचे पन्हे,बत्तासे,भिजवलेले हरभरे,टरबूज,कलिंगड यासारखी फळे असा नैवेद्य देवीला अर्पण करण्याची पद्धत आहे. महिनाभरातल्या कोणत्याही एका दिवशी आजूबाजूच्या स्त्रियांना हळदीकुंकवाला बोलावतात.काही ठिकाणी घरी आलेल्या स्त्रिया आणि कुमारिका यांचे पाय धुवून त्यांच्या हातावर चंदनाचा लेप लावतात. भिजवलेले हरभरे,फळे यांनी त्यांची ओटी भरतात आणि कैरीचे पन्हे,आंब्याची डाळ देऊन त्यांचे स्वागत करतात. काही ठिकाणी चैत्र गौरीपुढे शोभिवंत आरास मांडण्याची पद्धत आहे. या महिन्यात गौरी आपल्या माहेरी येते . आपल्या आईकडून सर्व प्रकारची कौतुके करून घेते. मैत्रिणींबरोबर खेळते. झोपाळ्यावर बसून झोके घेते आणि अक्षय तृतीयेला परत सासरी जाते अशी कल्पना आहे. या निमित्ताने महिनाभर घराच्या अंगणात रांगोळीने चैत्रांगण काढले जाते. या चैत्रांगणाच्या रांगोळीत देवीची शस्त्रे, तिची वाहने , तिची सौभाग्याची लेणी,स्वस्तिक , कमळ , सूर्य , चंद्र , गोपद्म यासारखी शुभ चिन्ह काढली जातात. रांगोळीत मध्यभागी झोपाळ्यात बसलेल्या देवीचे चित्र,राधाकृष्ण , तुळशी वृंदावन अशी चित्रे काढली जातात . हीच ती चैत्रांगणाची रांगोळी.


मत्स्य जयंती , चैत्र शुद्ध तृतीया .


हिंदू वर्षाचा तिसरा दिवस म्हणजेच चैत्र शुद्ध तृतीया . हा दिवस मत्स्य जयंती म्हणून ओळखला जातो. विष्णूच्या प्रमुख दशावतारांपैकी पहिला अवतार म्हणजे मत्स्य अवतार .हा मत्स्य या दिवशी अवतीर्ण झाला असे मानतात. पुराणकथेनुसार पृथ्वीला प्रलयापासून वाचविण्यासाठी भगवान विष्णूंनी हा अवतार घेतला अशी कथा आहे.


राजा सत्यव्रत नदीत स्नान करून जलांजली देत असताना त्यांच्या ओंजळीत एक मासा आला. त्या माशाच्या विनंतीवरून राजा त्याला घरी घेऊन गेला. हा मासा दररोज असाधारण रीतीने मोठा होऊ लागल्याने राजाने त्याला मूळ रुपात दर्शन देण्याची विनंती केली. तेव्हां भगवान विष्णू प्रकट झाले. पुढे सात दिवसांनी होणाऱ्या प्रलयाची कल्पना त्यांनी राजाला दिली पुढे त्यांनी राजाला प्राणी आणि सप्तर्षी यांना घेऊन माझ्या नावेतून चल असे सांगितले. या नावेतून जाताना मत्स्याने राजाला जी माहिती दिली ती मत्स्य पुराण म्हणून प्रचलित आहे. सत्यवत राजाने वाचविलेल्या काही प्रमुख लोकांपैकी राजा चाक्षुष हा राजा पुढे मनू म्हणून प्रसिद्धीस आला. याच मनूचे वंशज म्हणजे मानव किंवा मनुष्य, म्हणजेच आपण मानव.


या मत्स्य जयंतीच्या दिवशी " ओम मत्स्याय मनुपालकाय नम:" या मंत्राने मत्स्य अवतार प्रतिमेची किंवा भगवान विष्णूची पूजा करण्याची प्रथा आहे.


मत्स्य अवतारामागे हयग्रीव राक्षसाची पण कथा आहे.या राक्षसाने ब्राम्हदेवांचे सारे वेदांचे ग्रंथ चोरले त्यामुळे सर्वत्र अज्ञानाचा अंध:कार पसरला.आशा वेळी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार धारण करून हयग्रीवचा वध केला आणि वेद सुरक्षितपणे ब्राम्हदेवांकडे पोहोचवले असे सांगतात.


श्रीराम नवमी , चैत्र शुद्ध नवमी.


चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र नवरात्राचा नववा दिवस आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून चैत्र शुद्ध नवमी पर्यंत नवरात्र साजरे केले जाते. या काळामध्ये निरनिराळे गायक आणि वादक कलाकार रामाच्या मंदिरात आपली कला सादर करतात. गीतरामायणाचे कार्यक्रमही या दिवसात सादर केले जातात. या दिवसात रामायणाच्या ग्रंथाचे वाचन, आणि पारायण पण केले जाते. या दिवसात रामरक्षा कवच,रामरक्षा स्तोत्र यांचे रोज पठण केले जाते, आणि कीर्तने पण सादर केली जातात. " श्रीराम जयराम जय जय राम " हा जप पण या दिवसात करतात. तेरा अक्षरांचा हा जप खूप पुण्यकारक आहे असे समजतात.


चैत्र शुद्ध नवमी या दिवशी भगवान विष्णूंचा सातवा अवतार,भगवान श्रीराम यांचा जन्म दुपारी बारा वाजता झाला. म्हणून हा दिवस रामनवमी म्हणून साजरा करतात. या दिवशी दुपारी बारा वाजता रामाच्या छोट्या मूर्तीला पाळण्यात ठेऊन पाळणा म्हणून श्रीराम जन्माचा सोहळा साजरा केला जातो. श्रीरामांना केवडा , चंपा , चमेली, जाई , जुई, मोगरा , दवणा , सब्जा इत्यादी सुगंधी फुलांनी सजविले जाते, आणि मग आरती करून प्रसाद म्हणून सुंठवडा ,भिजवलेली हरभऱ्याची डाळ,काकडीचे तुकडे सर्वांना दिले जातात. या दिवशी सगळीकडे श्रीराम मंदिरात पूजन,भजन,कीर्तन,प्रवचन असे कार्यक्रम करून जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी रामचरीत मानस लिहिण्यास सुरुवात केली होती असे उल्लेख सापडतात. श्रीरामांचा जन्म शरयू नदीच्या तिरावर अयोध्येत झाल्यामुळे अयोध्येमध्ये श्रीराम जन्मोत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.


श्री . रामदास जयंती , चैत्र शुद्ध नवमी.


भगवान श्रीरामांचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला दुपारी बारा वाजता झाला होता. त्याप्रमाणे २४ मार्च, १६०८ साली चैत्र शुद्ध नवमीलाच आणि ते सुद्धा दुपारी बाराच वाजता जांब (जिल्हा जालना ) या गावच्या सुर्याजीपंत ठोसर यांच्या घरी नारायणाचा जन्म झाला . तोच नारायण पुढे समर्थ रामदास स्वामी या नावाने जगप्रसिद्ध झाला.


समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्रातील कवी आणि समर्थ संप्रदायाचे संस्थापक होते. रामाला आणि हनुमंताला उपास्य मानणाऱ्या समर्थ रामदासांनी परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांच्या प्रसारासाठी देशभर हिंडून प्रबोधन आणि संघटन केले. ते संत तुकारामांचे समकालीन होते. शक्तीचे उपासक आणि प्रभू रामचंद्राचे दास असलेल्या श्री. समर्थ रामदासांनी ठिकठिकाणी श्रीराम आणि श्री. हनुमानाची मंदिरे स्थापित केली. महाराष्ट्रातल्या राजकारणात आणि धर्मकारणात त्यांनी भाग घेतला होता.,कारण त्यांना श्री . शिवाजी महाराजांच्या मनातलं स्वराज्य व्हायला हवं होतं. श्री. समर्थ रामदासांनी त्यावेळी भ्यायलेल्या , गांगरलेल्या , घाबरलेल्या जनतेला


धिर्धरा धिर्धरा तकवा

हडबडू गडबडू नका

केल्याने होत आहे रे

आधी केलेचि पाहिजे


असा उपदेश करून मराठी मन जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला. श्री . समर्थ रामदासांच्या " जय जय रघुवीर समर्थ " या गर्जनेने मरगळलेला अवघा महाराष्ट्र जागा झाला होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तेव्हां सगळ्यात जास्ती आनंद श्री. समर्थ रामदासांना झाला असणार कारण ते म्हणतात,


"बुडाला औरंग्या पापी

म्लेंच्छ संहार जाहला"

उदंड जाहले पाणी

स्नान संध्या करावया"


पर्यावरणावर प्रबोधन आणि लिखाण पण त्यांनी केले होते. श्री. रामदासांनी दासबोध,मनाचे श्लोक,करुणाष्टके,भीमरूपी स्तोत्र ,गणपतीची आणि मारुतीची आरती आशा प्रकारची भरपूर स्तोत्रे आणि ग्रंथ लिहिले आहेत.


शालिवाहन जयंती , चैत्र शुद्ध दशमी


आपण सर्वजण इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे तारीख आणि वार मानत असतो आणि त्याप्रमाणे आचरण करतो. खरी मराठी दिनदर्शिका पैठण नगरीच्या सातवाहन उर्फ शालिवाहन कुळातला गौतमीपुत्र सातकर्णी यांच्या नांवाने सुरू झालेलं शालिवाहन शक आणि त्याप्रमाणे आखलेली दिनदर्शिका आपल्याकडून दुर्लक्षित होऊन राहिली आहे. खरे म्हणजे शालिवाहन राजाच्या नांवाने सुरू झालेले संवत्सर हे आपण मराठी माणसांनी तरी ग्राह्य धरून त्याप्रमाणे आचरण करायला पाहिजे पण बहुतेक इंग्रजी दिनदर्शिका जगाच्या व्यवहारांशी जुळवून घेण्यासाठी सोपी पडत असावी म्हणून तिला कदाचित मान्यता मिळाली असावी. आता या वर्षी २०२१ सालात गुढी पाडव्याच्या दिवसापासून शार्वरी संवत्सर संपून प्लव नावाचे नवीन संवत्सर म्हणजेच शक

म्हणजेच वर्ष सुरू होईल. इ. स . 078 साली जे शकांचे परचक्र शालिवाहन राजांच्या राज्यावर आले होते ते गौतमीपुत्र सातकर्णी या पराक्रमी राजाने परतवून लावले होते. तेव्हापासून शालिवाहन संवत्सराची त्यांनी सुरुवात केली. आपण रोज वापरतो ती इंग्रजी दिनदर्शिका आणि शालिवाहनाने सुरू केलेली दिनदर्शिका यांच्यामध्ये ०७८ वर्षांचा फरक पडतो. पण या पराक्रमी राजाची चैत्र शुद्ध दशमीला असलेल्या शालिवाहन जयंतीच्या दिवशी तरी आठवण काढून आपण त्यांच्या प्रती आपलं ऋण सादर केले पाहिजे .


हनुमान जयंती , चैत्र पौर्णिमा


चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला हनुमानाचा जन्म झाला. या दिवशी हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. हनुमान जयंतीचे कीर्तन चैत्र पौणिमेच्या दिवशी पहाटेच सुरू करून सूर्योदयाला संपविले जाते. सूर्य उगवला की हनुमानाचा जन्म झाला असे म्हणतात. त्यावेळी कीर्तन संपवून सर्वांना प्रसाद दिला जातो. हनुमानाच्या वडिलांचे नाव केसरी आणि आईचे नाव अंजनी होते. हनुमानाचा जन्म अंजनेरी येथे झाला. अंजनेरी नावाचे गाव आणि या नावाचा डोंगरी किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे. लहानपणी हनुमानाला सूर्याला पकडण्याची इच्छा झाली म्हणून त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली. हे पाहून सूर्याला आणि पृथ्वीला वाचविण्यासाठी इंद्राने आपले वज्र हनुमानाच्या दिशेने फेकले. त्या प्रहाराने हनुमानाचे तोंड वाकडे झाले आणि तो बेशुद्ध पडला. देवांनी हनुमानाला तूला आपल्या सर्व शक्तींचा विसर पडेल असा शाप दिला. पुढे श्री. राम वनवासात असताना त्यांची आणि हनुमानाची भेट झाली. सीतेला रावणाने पळवून अशोक वनात ठेवले आहे हे जेव्हा हनुमानाला कळले तेव्हां त्याला खूप वाईट वाटले. त्यावेळी महर्षी नारदांनी हनुमानाला त्यांच्यातल्या महापराक्रमी शक्तींची आठवण करून दिली. त्यामुळे सीतेच्या शोधासाठी आणि राम रावण युद्धामध्ये बेशुद्ध पडलेल्या लक्ष्मणासाठी संजीवनी वनस्पती आणण्यासाठी हनुमानाने श्रीरामांना मदत केली. हनुमान हा सप्तचिरंजीवांपैकी एक चिरंजीव आहे.,म्हणजेच तो अजूनही जिवंत आहे असे मानतात. महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या ध्वजाचे रक्षण हनुमानाने केले. महाबली हनुमान हे हनुमंत , बजरंगबली , अंजनेय , पवनपुत्र , वायुपुत्र केसरीनंदन या नावांनी ओळखले जातात. श्री . हनुमानाची श्रीरामावर अपार श्रद्धा होती. भगवान रामचंद्राचे हनुमान हे भक्त होते , त्यामुळे जिथे जिथे रामकथा चालते तिथे तिथे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात श्री . हनुमान येऊन बसतात अशी भक्तांची श्रद्धा आहे . श्री . हनुमानाचे वर्णन करणारे भीमरूपी हे मारुती स्तोत्र श्री . समर्थ रामदासांनी लिहिले आहे . हनुमान चालिसा हे अजून एक स्तोत्र श्री मारुतिरायांचे गुणवर्णन करणारे आहे


श्री. छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी , चैत्र पौर्णिमा.


३ , एप्रिल , 1680 रोजी चैत्र पौर्णिमेला श्री . छत्रपती शिवाजी महाराज यांचे वयाच्या पन्नासाव्या वर्षी रायगडावर निधन झाले, आणि अवघा महाराष्ट्र शोक सागरात बुडून गेला .


राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती , चैत्र वद्य चतुर्थी.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म चैत्र वद्य चतुर्थी या दिवशी ( ३० एप्रिल,१९०९ ) अमरावती जिल्ह्यातील यावली या गावात झाला. त्यांचे मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे. त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून आपण ओळखतो. अंधश्रद्धा निर्मूलन आणि जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनांचा प्रभावीपणे वापर केला. त्यांनी लिहिलेली ग्रामगीता प्रसिद्ध आहे . त्यांनी मराठी आणि हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केल्या आहेत . संत तुकडोजी महाराजांनी इ.स.१९३५ मध्ये मोजरी , जिल्हा अमरावती येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. त्यांचे गुरू श्री. अडकोजी महाराज हे होते . गुरूंनी आपल्या शिष्याचे नाव तुकडोजी असे ठेवले आणि तेव्हापासून श्री. माणिक बंडोजी इंगळे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने जगप्रसिद्ध झाले. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या समोर तुकडोजी महाराजांनी आपले खंजिरी भजन सादर केल्यामुळे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी खुश होऊन त्यांना राष्ट्रसंत ही पदवी बहाल केली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे देशभर हिंडून अध्यात्मिक,सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता यावर प्रबोधन करीत असत.त्यांनी जपान सारख्या देशात जाऊन सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. भारत हा लहान लहान खेडेगावांचा देश आहे त्यामुळे ग्रामोन्नती आणि ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा केंद्रबिंदू होता. त्यामुळे त्यांनी लिहिलेल्या ग्रामगीतेला विशेष महत्व आहे. आपल्या देशातली गावे सुधारली तर, तसेच शेतकऱ्याला मान दिला गेला तर, आणि स्त्रियांचा मान राखला गेला तर आपल्या भारत देशाचे भविष्य उज्वल आहे ,अशी त्यांची धारणा होती. आपले नागपूर विद्यापीठ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ या नावाने प्रसिद्ध आहे.


संत गोरोबाकाका पुण्यतिथी , चैत्र वद्य त्रयोदशी.

संत गोरोबाकाका ,( संत गोरा कुंभार ) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते. ते नामदेव आणि ज्ञानेश्वर यांचे समकालीन मानले जातात. त्यांनी अनेक अभंग लिहिले आहेत. ते विठ्ठलाचे मोठे भक्त होते. प्रत्यक्ष पांडुरंगाने ब्राम्हण रुपात येऊन महादेवबाबांच्या आठव्या मुलाला म्हणजेच गोरोबाकाकांना जळलेल्या गवरीच्या राखेतून उचलून वाचविले होते,आणि म्हणून पांडुरंगांनीच त्यांचे नाव गोरा असे ठेवले असे म्हणतात, आणि म्हणून पुढे ते त्याच नावाने म्हणजेच संत गोरा कुंभार या नावाने ओळखले जाऊ लागले.त्यांनी चैत्र वद्य त्रयोदशी ( शके १२३९ ,म्हणजेच २० एप्रिल, १३१७ ) या दिवशी समाधी घेतली. त्यांची समाधी समजले जाणारे संत गोरोबाकाका मंदिर उस्मानाबाद जिल्यात तेर नांवाच्या गावी आहे . महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांची मंदिरे आहेत .


चैत्र महिन्याची माहिती आणि चैत्रांगणाची रांगोळी आवडली का ते जरूर कळवावे.


सौ . उमा अनंत जोशी , १३.०४.२०२१.

४/४८,सोनल अपार्टमेंट,आयडियल कॉलनी,

कोथरूड, पुणे : ४११०३८.

फोन : ०२० २५४६८२१३/ मोबा.९४२०१७६४२९

414 views0 comments

Comments


टीप: विश्व मराठी परिषदेच्या ब्लॉगवरील पोस्ट केलेल्या सर्व लेखक / कवींच्या साहित्यामधील विचार हे लेखकांचे स्वत:चे आहेत. त्यासंदर्भात विश्व मराठी परिषद सहमत असेलच असे नाही.
bottom of page