
गड्या सांगतो ते नक्की ऐंक पटलं तुला तरच स्विकार
विनंती नाही करणार मी तू दिलाच पाहिजे होकार !
एकमेकांना बघून समजून लग्नाला दिली न् संमती
चार दोन महिन्यातच मग कशी हो सूचली उपरती ?
पहिल्या प्रेग्नंसीच्या दोघांना कितीतरी सुखद धक्का
दोघांच्या प्रायव्हसीत सुरु पोटातील बाळाच्या गप्पा
सांगा सुखाच्या संसारात कशी शिंकली हो माशी
सुरु झाले दोघांत तुणतुणे तू असा तू तसा मी अशी
सात फेरे अन् सात वचन का पडला दोहोंना विसर
संसाराची तत्व सोडून तुम्ही का होता एकमेका शिरजोर
वाद तिथे नक्की आहे संवाद आपणच ते समजून घ्यावे
तुटली असतील मनं जरी तडजोडीच्या धाग्यात सांधावे
सूर्य कितीही तापला तरी त्याचा द्वेष करतो का कुणी
आपले म्हणून स्विकारले न् मग काढूच नये उणीदुणी
संसाराचा खेळ होण्यापूर्वी जाणून घ्यावेत बारीक नियम
नक्कीच टाळता येईल मग जीवनात वादविवादाचा नेम
उठसुट ठेवू नको गड्या तू शब्द भात्यावर आपला हात
धनुष्यातून सुटलेला बाण करायला लावतो पश्चात्ताप
गड्यांनो,हाती असू द्यावी सतत संयम अन् नितीची ढाल
तरच सुखाने सुरु राहणारतुमच्या संसाराची वाटचाल
संसार म्हणजे युद्ध नव्हे ती तर आहे एक तडजोड
साध्या सरळ कारणांनी घेऊच नका रे काडीमोड !
म्हणून गड्यांनो समजून घ्या नेहमीची येतो न् पावसाळा
दरवर्षीची दैना विसरुन मना असतो न् त्याचा लळा
संसार म्हणजे युद्ध नव्हे
ती तर आहे एक तडजोड
साध्या सरळ कारणांनी
घेऊच नका रे काडीमोड !
घटस्फोट म्हणजे समजा
दोन बुद्धीघटांचा विस्फोट
सहवासाचा प्रत्येक क्षण
आयुष्यभर ठरतो काळेबोट
© प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प "
म्हसावद
Email.: patelpm31@gmail.com
Comments