यशस्वी अनुवादक बना - ही कार्यशाळा का करावी?
संपूर्ण जग म्हणजे आज एक खेड झालं आहे. लोकल ते ग्लोबल हा प्रवास जसा सुरू आहे अगदी तसाच ग्लोबल ते लोकल हा ही प्रवास सुरू आहे. एकंदरीत वैश्विक समाज मानस विस्तारत आहे. अशा वेळेला अनुवाद कलेला प्रचंड मागणी निर्माण होत आहे. साहित्यांचे प्रवाह विविध भाषांचा अडसर ओलांडून वैश्विक होऊ पहात आहेत. अशा वेळी अनुवादकाची भूमिका फार महत्त्वाची आहे. अनुवाद म्हणजे नुसते शब्दशः भाषांतर नव्हे. मूळ कलाकृती नीट समजून उमजून घेऊन, त्याचा पुरेपूर आस्वाद घेऊन तिच्याशी समरस होऊन तिचा दुसऱ्या भाषेत अनुवाद करणे हे एक सृजनशील कौशल्य आहे. त्याचे एक तंत्र आहे. अनुवाद करताना काळजी घ्यावी लागते आणि दोन्ही भाषांच्या सामर्थ्याचे तसेच मर्यादांचे भान ठेवावे लागते. अनुवाद ही खरे तर एक नव निर्मितीच असते. उत्तम अनुवादाचे तंत्र आणि मंत्र शिकण्यासाठी विश्व मराठी परिषद आयोजित यशस्वी अनुवादक बना ही कार्यशाळा अतिशय उपयुक्त आहे. प्रख्यात अनुवादक लीना सोहनी या कार्यशाळेच्या मार्गदर्शिका आहेत. त्यांचा व्यासंग दांडगा आहे. अनुवादक म्हणून त्यांचा अनुभव फार मोठा आहे. विशेषतः सुधा मूर्ती यांच्या पुस्तकांचे त्यांनी केलेले अनुवाद गाजले आहेत.