अनिरुद्ध नाडकर्णी

Apr 252 min

माझ्या मराठी शाळेने मला काय दिले?                                                 

‘मुले हीच राष्ट्राची खरी संपत्ती!’ ‘मुले हेच राष्ट्राचे भावी आधारस्तंभ!’

लांबच्यालांब मिरवणुकीत, टिपेच्या आवाजात या घोषणा देत चालणारी, पांढऱ्या, निळ्या गणवेशातील आम्ही मुलंमुली, 'माझी शाळा' म्हटल्याबरोब्बर माझ्या डोळ्यापुढे उभ्या राहतात. हा आमच्या जगप्रसिद्ध 'बालमोहन विद्यामंदिर' शाळेचा 'बालदिन'. १५ जानेवारी, संक्रांतीच्या सुट्टीच्या नंतरचा दिवस.

नेहमीप्रमाणे फुललेल्या शिवाजीपार्कच्या बाजूने रस्त्याची एक बाजू व्यापून, रंगीबेरंगी फुलांनी आणि फुग्यांनी सजवलेल्या बैलगाड्या, त्यात दाटीवाटीने लगडलेले शिशु-आणि-बाल वर्गातील चिमुकले आणि त्यांच्या पाठोपाठ ‘IIविद्या विनयेन शोभतेII’ ‘IIबोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊलेII’ अशा सुविचारांचे फलक घेऊन चालणारी शाळेतील पाच हजार मुलं आणि शिक्षक, ही आम्हा सर्वांचीच एक अविस्मरणीय आठवण आहे.

त्यानंतर आमची वाट पाहत असायचे तिळाचे लाडू आणि उसाचं कांड. ते लाडूही, शाळेतले शिक्षक आणि वरच्या वर्गातल्या मुलांमुलींनी मजेमजेने, शाळेतच बनवलेले. ह्याशिवाय वर्षभर साजरे केलेले इतर सण, अगदी उन्हाळ्याच्या सुट्टीअगोदरच्या 'आंबेडाळ' आणि 'आंब्याचं पन्ह' ह्या थाटासहित.

‘माझ्या मराठी शाळेने मला काय दिले?’ ह्या प्रश्नाचं उत्तर येईल, ' सहजंच, जाता जाता, आम्हा सर्व मुलामुलींवर केलेले संस्कार!' मराठी बाणा आणि मराठी भाषा जपण्याचे संस्कार.

भव्य प्रवेशद्वारात पाऊल टाकल्याबरोबर नजर जायची ती उजवीकडच्या, लांब भिंतीवरती असलेल्या फळ्याकडे. त्यावर देखण्या हस्ताक्षरात लिहिलेलं असायचं त्या दिवसाचं महत्व - सांस्कृतिक, वैश्विक आणि शास्त्रीय सुध्दा. त्यानंतर उत्सुकता असायची 'आजचे वाढदिवस' फलकावरच्या नामावलीची. स्वतःच्या वाढदिवशी आपलं नाव त्या फलकावर वाचताना छाती भरून यायची.

क्वचित वर्गात पोहोचण्यास उशीर झालाच तर ध्वनिक्षेपणावरून कानावर पडायची शाळासुरवातीची 'प्रार्थना' - 'अंतर मम विकसित करी हे परात्परा....' आहोत तिथेच शिस्तीत उभं राहून म्हणायची. आता कळतंय कि आमची शाळा, 'अभ्यासात प्रगती होऊदे,' अशी प्रार्थना करायला न शिकवता, 'आमचं अंतर विकसित होऊदे....' हे मागणं त्या नियंत्याकडे करायला शिकवायची.

शाळेची दुसरी अविस्मरणीय आठवण म्हणजे आमच्या दादांची शिकवण. शाळेचे संस्थापक प. पू. श्री. दादासाहेब रेगे यांची. बंद गळ्याचा शुभ्र कोट, धोतर, आणि काळी टोपी घातलेली त्यांची हसरी, उंच मूर्ती, लाखो विद्यार्थ्यांच्या हृदयात कोरली गेली आहे. स्टेजवरून त्यांनी "बाळांनो" अशी हाक घातली, कि समोर बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ते 'आमचे दादा!' च असायचे.

मातृदिनाच्या दिवशी, कुणाही एका शिक्षिकेला पुढ्यात बोलवून, तिला स्टेजवरच घातलेला त्यांचा 'साष्टांग' नमस्कार कोण कसा विसरू शकेल?

बालमोहन विद्यामंदिराने अजून एक महत्वाचं आयुध आम्हाला दिलं. ते म्हणजे, 'शिकावं कसं,' याचं शिक्षण. गणिताच्या पेपरात, केवळ उत्तराला नव्हे तर गणित सोडवण्याच्या पद्धतीलाही वेगळे मार्क दिले जायचे. कवितेच्या पाठांतरापेक्षा कवितेच्या 'रसग्रहणा' वरती अधिक भर.

अभ्यासाच्या उत्तेजनासाठीचा अजून एक अप्रतिम उपक्रम म्हणजे वार्षिक परीक्षेत चांगले मार्क मिळवल्यास मिळणारं बक्षीस. हे बक्षीस असायचं वर्गशिक्षक-शिक्षिकेनं निवडलेली गोष्टींची पुस्तकं. विद्यार्थी-विद्यार्थिनीच्या आवडी-समजेनुसार निवडलेली. आमच्या लायब्ररीतले नव्याकोऱ्या, आकर्षक मुखपृष्ठांच्या पुस्तकांचे ढीग, आणि बाजूला बसून, एक एक पुस्तक चाळत याद्या करणारे आमचे शिक्षक हे परीक्षा-निकालांच्या अगोदरचं एक मोहक चित्रं असे.

त्यामुळे बहिणाबाईंपासून कुसुमाग्रजांपर्यंत, आणि 'फास्टर फेणे' पासून जयंत नारळीकरांच्या विज्ञानकथा, आणि पुढे पुलं, पुरंदरे आणि दळवी अशा अनेक लेखक - लेखिकांच्या समृद्ध मराठी साहित्याचं दालनच आमच्यासाठी उघडलं गेलं. वाचनाची तेंव्हा लागलेली आवड अजूनही चालूच आहे.

आज गेली कित्येक वर्ष परदेशात राहताना लक्षात येतंय कि मी, माझी बायको आणि आमच्यासारखे अनेक 'बालमोहनकर' जगाच्या निरनिराळ्या भागात आपापल्या क्षेत्रात महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. पण जगभर कुठेही, 'बालमोहन?' असा समोरून प्रश्न आला तर लहानमोठ्या वयाच्या मर्यादा पार करून ताबडतोब मैत्री जुळते.

आणि महत्वाचं म्हणजे, आमचं संपूर्ण शालेय शिक्षण मराठी माध्यमात होऊनही आपापल्या देशात उच्च पदांपर्यंत पोहोचण्यास काहीही अडचण आली नाही.

'शिकावं कसं,' या बाळकडू चा परिणाम असावा कदाचित!

अनिरुद्ध नाडकर्णी  

ani_nadkarni@hotmail.com

    2241
    4