विश्व मराठी परिषद

Nov 7, 20203 min

मना तुझा रंग कसा

जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी १० ऑक्टोबराला साजरा केला जातो. हा दिवस १९९२ पासून साजरा होत आहे. या वर्षाचा मुख्य विषय: सर्वांसाठी मानसिक आरोग्य, अधिक गुंतवणूक, अधिक जागरूकता, मानसिक आरोग्य हा मानवी हक्क आहे असा आहे. दुर्दैवाने आज २८ वर्षानंतरही मानसिक आरोग्य सुविधा, जागरूकता यात अपेक्षित प्रगती झालेली नाही. गरज आहे यात झपाट्याने वाढ होण्याची. मानसिक आरोग्याशिवाय कोणतेही आरोग्य नाही. आता करोना मुळे असही म्हणायचे कुठल्याही  सामाजिक आरोग्य आपत्ती च्या वेळी मानसिक आरोग्याला प्राधान्य दिलेच पाहिजे.    

भारतात राष्ट्रीय मानसिक स्वास्थ्य कार्यक्रम (NMHP) १९८२ पासून सुरू झालेला आहे. तसेच १९९६ मध्ये यात जिल्हा मानसिक स्वास्थ्य कार्यक्रम जोडला आहे. सन २००३ मध्ये राज्य मानसिक रुग्णालयाचे आधुनिकीकरण आणि सरकारी मेडिकल कॉलेज / सामान्य रुग्णालयातील सद्य मनोचिकित्सा विभागाची 

सुधारणा, उन्नती करण करण्याचे ठरले. सन २००९ पासून जन शक्ती विकास योजनाही  या उपक्रमाशी जोडली गेली.  

या उपक्रमातील तीन मुख्य घटक:

१. मानसिक विकारानी पिडित व्यक्तीस उपचार  २.पुनर्वसन  ३.  मानसिक आरोग्य नियंत्रण आणि

प्रोत्साहन. 

या उपक्रमाचा उद्देश , ध्येय आणि योजना  उत्तम आहे. परंतु योग्य अंमल बजावणी होत नाही याची खंत

आहे.

मानसिक आरोग्य मार्गदर्शिका ई-बुक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

जागतिक मानसिक आरोग्य दिनी दरवर्षी वेगवेगळ्या मुख्य विषयावर भर दिला जातो. तरीही इतर विषय दुर्लक्षून चालणार नाहीत. कारण सगळेच घटक सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे आहेत, त्याशिवाय खरच परिपूर्ण आयुष्य जगता येणार नाही. (ref: Theme table) आपले शरीर म्हणजे आपल्या मनाचा आरसा आहे. ज्या चांगल्या, वाईट भावना आपल्या मनात येतात त्याचा परिणाम शरीरावर दिसून येतो. अनेक म्हणी याचा प्रत्यय देतात. जसे 'मन चिंती ते वैरी न चिंती' (काळजी), 'भित्यापाठी ब्रह्म राक्षस' (भीती), 'खाई त्याला खवखवे', 'अर्धा वैद्य मरणास खाद्य' (अज्ञान) इत्यादि.

  जागतिक आरोग्य संघटनेच्या  मानसिक आरोग्य  मार्गदर्शकाच्या दुसर्‍या आवृत्तीचे मी मराठीत भाषांतर केले आहे. यात औदासीन्य (Depression) , मनोदुर्दशा (Psychosis) ,अपस्मार (Epilepsy), लहान आणि

पौगंडावस्थेतीलमुलांचे मानसिक आणि वर्तणूक आजार (Child Mental Health), अवमनस्कता(Dementia) ,

अंमली द्रव्य सक्तीमुळे उद्भवणारे विकार (Substance Abuse), आत्महत्या (Suicide)आणि इतर लक्षणीय

मानसिक आरोग्य तक्रारी (Other) याचा समावेश आहे. तसेच मूलभूत काळजी आणि प्रत्यक्ष कृती, सर्वात महत्त्वाचा तक्ता, हे मार्गदर्शक कसे अंमलात आणावे आणि स्पष्टीकरण कोष हे देखील आहे.

विशेष गटासाठी: लहान मुले, गर्भधारणा करू शकणार्‍या स्त्रिचा तसेच वयस्कर व्यक्तीसाठी विशेष सूचना आणि घ्यावयाची काळजी असा विभाग आहे. काळजी वाहकांची काळजी कशी घ्यावी असेही महत्त्वाचे स्पष्टीकरण आहे. विश्रांती करिता प्राणायाम कसा करावा याची माहिती आहे. महाराष्ट्रात सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून त्याचा प्रचार करण्याचा प्रयत्न आहे.

महाराष्ट्राची लोकसंख्या अंदाजे ११कोटी ६०लाख आहे. मी प्रथम राज्य मानसिक आरोग्य कार्यक्रमाचे उपनिर्देशक, आरोग्य आयुक्त आणि आरोग्य मंत्री यांच्याकडे संपर्क साधला. त्यांनी प्रयत्नांचे कौतुक केले आणि १६४५ प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC, २०१४) आणि  ११ लाख गाव आरोग्य कर्मचारी ज्यांना प्रशिक्षण दिले जाऊ शकते त्यांना मार्गदर्शक मुद्रित करून, ई वितरित करण्याची आवश्यकता मान्य केली. मला ऑक्टोबर २०१८ मध्ये मानसिक आरोग्य प्रशिक्षणात भाग घेतलेल्या २० जिल्ह्यांतील मानसोपचारतज्ज्ञ आणि  मानसशास्त्रज्ञांना मार्गदर्शक सादर करण्याची संधी देण्यात आली. उपस्थित प्रत्येकाने अनुवादाचे कौतुक केले आणि ते क्षेत्रात उपयुक्त ठरेल अशी भावना व्यक्त केल्याबद्दल मी त्याची आभारी आहे. मला खात्री आहे किमान आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून प्रयत्नांची व बांधिलकीची आवश्यकता आहे. ही सुरुवात आतापर्यंत खूप आशावादी राहिली आहे. प्रयत्न यशस्वी होण्यासाठी अनेकांना एकत्रित करणे आवश्यक आहे.

पुढे  मुंबई आणि पुण्यात कमीत कमी २० एनजीओजशी संपर्क साधला आहे आणि ५० हून अधिक मानसोपचार तज्ञ आणि  मानसशास्त्रज्ञ भेटले आहेत. प्रत्येकाने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि भाषांतराचे कौतुक केले आणि एक उत्कृष्ट स्रोत म्हणून पाहीले. 'mhgap' लोकप्रिय करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. खाजगी डॉक्टर हे भारतातील आरोग्य यंत्रणेचा मुख्य आधार आहेत आणि आरोग्य सेवा शोधणार्‍या बहुतेक लोकांचा पहिला थांबा आहे. मी बर्‍याच खाजगी व्यावसायिकांशी संपर्क साधला आहे आणि त्यांना मार्गदर्शक वापरण्यासाठी आणि त्यांचा प्रसार करण्याची विनंती केली आहे. जेथे गरीब रुग्णांना सेवा देतात अश्या ज्ञात स्वयंसेवी संस्था आणि सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील प्रतिष्ठानांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण व्हावी हा उद्देश आहे. शैक्षणिक जगाला गुंतवण्यासाठी, मी मानसशास्त्र आणि नैदानिक मानसशास्त्रातील पदवीधर 

विद्यार्थ्यांना स्त्रोत मार्गदर्शक म्हणून वापरण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी विद्यापीठांकडे संपर्क साधला आहे. ब्राझील मध्ये मेडिकल कॉलेज विद्यार्थ्यांना इंग्रजीत याचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच पोर्तुगीस मधून आरोग्य सेविकांना प्रशिक्षण दिले आहे. मला असे वाटते की आरोग्य मंत्रालय आणि डब्ल्यूएचओ देशीय कार्यालयासह सर्व भागधारकांचे जास्त मोठे समर्थन आणि गुंतवणूकीमुळे समाजातील गरजू पर्यंत प्रसारित करणे आवश्यक आहे आणि प्रत्यक्षात फरक पडण्यासाठी ते व्यवहारात वापरणे गरजेचे आहे. केवळ १७% देशांनी करोना काळात आरोग्य गुंतवणूक वाढविली आहे. नुक्त्याच केलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार १३० पैकी ४७ देशांनी गुंतवणूक वाढविली. भारतानेही अशीच वाढीव गुंतवणूक भविष्य काळात करण्याची गरज आहे. कारण सध्या भारताचा गुंतवणूक क्रमांक जग भरात खालून चौथा आहे. 

करोना मुळे एक सकारात्मक बदल झाला आहे. सामान्य माणसे मानसिक आरोग्या बद्दल अधिक जागरूक झाली आहेत. कुटुंबात जवळीक निर्माण झाली आहे. हरवलेले संभाषण परत सुरू झाले आहे. मुले थोडीशी तणाव मुक्त झाली आहेत. सर्वांना या विषयांचे गांभीर्य लक्षात आले आहे. यामुळे निश्चितच भविष्यकाळात सर्वांच्या मनाची काळजी घेतली जाईल अशी खात्री आहे.  

जागतिक आरोग्य संघटनेच्या २०३० कार्यक्रमानुसार मानसिक आरोग्य हे  सर्वाधिक आजारांचे मुख्य कारण असेल. चेता संस्थेचे विकार हे दुसर्‍या क्रमांकाचे सह विकृती (Comorbidity)लक्षण आहे. आधीच आपल्याकडे ही सेवा देणाऱ्यांची प्रचंड कमतरता आहे  केवळ यासाठीच हे भाषांतर आहे. यामुळे या क्षेत्रातील विशेष माहिती नसलेल्याना प्रशिक्षण देऊन सक्षम करता येईल आणि सामाजिक जाणीवही वाढीस लागेल अशी आशा आहे. मला खात्री आहे कि विश्व मराठी परिषदेमुळे हे भाषांतर १५ कोटी मराठी भाषिकां पर्यंत पोहचेल.सर्वसामान्य गरिक या माहितीचा उपयोग आपल्या आसपास तसेच कुटुंब व मित्र परिवारास मदत करण्यास करतील. करोनामुळे आता खडबडून जागे होऊन प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आलेली आहे. नाहीतर पर्यावरण आणि इतर बाबीप्रमाणे पुढची पिढी यासाठी आपणास जबाबदार धरेल.

लेखिका: सीमा उपळेकर, माटुंगा, मुंबई

मो:9197 69640817

ईमेल: seemauplekar@gmail.com


लेख आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.

    7221
    32