विश्व मराठी परिषद

Aug 7, 20204 min

चाकोरी

कडकडीत उन्हाळ्याचे दिवस होते. नुसत्या घामाच्या धारा वाहत होत्या. अशा रखरखीत उन्हात ती घरातून निघाली होती. निघताना तिचं पोरगं टॅह टॅह करुन रडत होतं. तिनं त्याला दूध पाजवून झोपवलं होतं. आता तिला पटकन घरातून बाहेर पडायचं होतं. तिचा नवरा शेतावर गेला होता. त्याला घरी यायला अजून बराच अवकाश होता. म्हणजे तिच्या हातात अजून बराच वेळ होता. ती हळूच घरातून बाहेर पडणार इतक्यात सासूने हटकलंच होतं "अगं लक्ष्मे, कुटं चाललीस गं". मनातून ही चरफडलीच . "हं म्हातारीनं निघताना मोडता घातलाच व्हय." तरीपण राग न दाखवता ती जरा दमानंच म्हटली."काय नव्हं जी. जरा शांतामावशीकडं जाऊन येतोया. तिनं वाकळ शिवायला दिलतं , ते देऊन येतो." असं म्हणत तिनं झटकन तिचं कपड्याच गाठोडं उचललं अन बाहेर पडली. म्हातारीच्या डोळ्यालाभी जरा कमीच दिसत होतं,म्हणून म्हातारीला काय कळलंच नव्हतं. आता तिनं डोक्यावर पदर घेतला अन तोंडावर पदराचं टोक घेऊन ती भराभर चालू लागली.आता तिला कोणीच ओळखीचं भेटू नये असं वाटत होतं. कोणाच्या नजरेस पडू नये म्हणून तिने आड वाट पकडली. आणि ती गावाबाहेरील बस स्टॅड वर आली. एक कोपर्‍याला आडोसा बघून ती उभी राहिली. हातातलं गाठोडं छातीशी धरून ती बराच वेळ उभी राहिली. थोड्या वेळाने उन्हाची तिरीप तिच्या डोळ्यावर येऊ लागली. तहानेने तिचा घसा कोरडा पडला. तिथं बाजूलाच रसवंती दूकानातून तिनं एक ग्लास उसाचा रस विकत घेतला. ऊसाचा रस पिल्यावर तिला जरा तरतरी आली. बराच वेळ झाला तरी अजून किसन आला नाही म्हणून ती काळजीत पडली. आज याच वेळेला भेटायचं असं ठरलं होतं , मग तरी तो अजून का आला नव्हता ,काय माहित? तिने बाजूनेच जाणार्‍याला परत एकदा घडाळ्यात वेळ विचारली. आता खरंच फार उशीर झाला होता. दोन तासापासून ती स्टॅंड वर उभी होती,पण कोणत्याही बस मध्ये चढत नव्हती म्हणून आता तो रसवंतीवाला सुद्धा तिच्याकडे चमत्कारीकपणे पाहू लागला. ती त्याची नजर चूकवत रस्त्याकडे पाहू लागली. आणि किसन बरोबरच्या सुखी संसाराची स्वप्नं बघू लागली. किसन तिच्या मैत्रीणीचा भाऊ होता. मुंबईला कामाला होता. सुट्टीत गावाला यायचा. अगदी रूबाबदार दिसायचा. डोळ्यावर गॅागल लावला की अगदी शाहरूख खान सारखाच दिसायचा. ही पण दिसायला सुंदरच होती. रंगाने गोरी. नाकीडोळी छान. मग काय? दोघं एकमेकांना आवडू लागले.दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या.आणि पुढच्या सुट्टीत यायचं वचन देऊन किसन परत मुंबईला निघून गेला. इकडे लक्ष्मीला सदाचं स्थळ सांगून आलं. लक्ष्मीनं किती पण नाही म्हटलं तरी तिच्या बापाने तिचं सदा सोबत लग्न लावून दिलंच. लक्ष्मी मनोमन दुःखी झाली. सदा तिचं लाड करायचा.तिला जीव लावायचा. तरीपण ती सदाचा राग राग करायची. त्याच्याशी एक शब्दही प्रेमाने बोलायची नाही.सदा मात्र तिला समजून घेत होता."लक्ष्मी वयानं लहान हाय म्हणून असं वागत असेल" अशी आपल्याच मनाची समजूत करून घेत होता.

लक्ष्मी मनोमन सदा आणि किसन मध्ये तुलना करत राहायची.सदा अगदीच गबाळा होता.दिसायलाही सावळा होता. पण शेतात राबून अंगाने पीळदार होता. शेतात राबायला मागंपुढं पाहत नव्हता.घरची २ एकर शेती अन कौलाचं चार खोल्यांचं घर बघून लक्ष्मीच्या बांपानं हे लगीन लावून दिलं होतं. पण लक्ष्मीला दावणीला बांधलेल्या गाईसारखं वाटत होतं. हा नवरा आणि नको असताना झालेलं मूल सगळं सोडून किसनकडे

मुंबईला जावं असं तिला सारखं वाटत होतं आणि तिची मनातली ईच्छा पूर्ण झाली. परवाच एका लग्नात दोघांची भेट झाली होती. सगळ्यांच्या नजरा चुकवून त्या दोघांचं बोलणं झालं होतं. त्याने पण कसं तिच्याशिवाय जीवन नीरस झालंय ,कसं तो तिच्याशिवाय जगू शकत नाही हे तिला सांगितलं होतं.तो तिला मुंबईला घेऊन जायला तयार होता. व तो तिच्याशी लग्न करायलाही तयार होता.मुंबईला तो तिच्यासाठी वेगळी खोली घेणार होता.पण सध्या त्याच्याकडे पैशाची अडचण होती.म्हणून अजून सहा महिन्यांनी तो तिला घ्यायला येणार होता.पण आता लक्ष्मीला त्याचा विरह अजिबातच सहन होणार नव्हता.मग अजून सहा महिने कसे काढणार? तिने पटकन तिच्या हातातल्या सोन्याच्या पाटल्या काढून दिल्या होता.आणि आजच्या दिवशी भेटायचं ठरवून ती घरी गेली होती. घरी गेल्यावर सासूने पाटल्यांचं विचारलच होतं. "पण हायत घ्या ,कपाटात काढून ठेवल्याती" असं म्हणून तिने वेळ मारून नेली होती.

"माय , जरा खायाला काहीतरी दे. लई भूक लागली हाय." अशा हाकेने ती भानावर आली. समोर एक वीस बावीस वर्षाची भिकारीण लहानग्या पोराला छातीशी कवटाळून उभी होती. कपडे फाटलेले, धुळीने माखलेलं अंग. विस्कटलेले केस असा तिचा अवतार होता. लक्ष्मीला तिची खुप दया आली. तिने तिला बिस्किटाचा एक पूडा घेऊन दिला. तिच्या हातातील बाळाला बघून इतक्या वेळात पहिल्यादांच तिला तिच्या बाळाची आठवण आली. आतापर्यंत बाळ उठलं असेल याची तिला जाणीव झाली. बाळ रडत असेल का? या विचाराने तिचं मन सैरभैर झालं. तिचा पान्हा पाझरुन ब्लाऊज ओला झाला होता. आज पहिल्यांदाच तिला मातृत्वाची जाणीव होत होती. नको नसताना झालेल्या मूलाबद्दल आज पहिल्यांदाच तिच्या मनात ममता निर्माण झाली होती. बाळाचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर दिसू लागला. निघताना त्याने धरलेलं व तिने हळूच सोडवलेलं पदराचं टोक तिला आठवलं. आपल्या बाळाला सोडून आपण मुंबईला जाणार होतो या विचाराने तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिला म्हातारी दिसू लागली. म्हातारी जरा द्वाड होती. पर आईसारखी मायाबी करत होती. सदाचा भाबडा चेहरा डोळ्यासमोर तरळू लागला. बायको पळून गेल्याच्या दुःखात गळफास घेतलेला सदाचा लटकलेला देह तिच्या डोळ्यासमोर दिसला आणि नकळतच तिचा हात गळ्यातल्या मंगळसूत्राकडे गेला. आज पहिल्यांदाच

त्या काळ्या मण्याची तिला किंमत कळली होती.लग्नातल्या सप्तपदीतलं एक एक वचन तिला आठवू लागलं.. आता एक क्षणभरही तिथं थांबणं तिला असह्य झालं. कधी एकदा घर गाठेन असं तिला झालं होतं. सदा घरी यायच्या आत तिला घरी पोचायचं होतं. किसनचा विचार तर तिच्या डोक्यातून केव्हाच हद्दपार झाला होता. किसनला यायला खरंच वेळ झाला होता की? तिच्या सोन्याच्या पाटल्या घेऊन तो फरार झाला होता? काहीच अंदाज बांधता येत नव्हता . पण आता तिला त्याचा विचार सुद्धा करायचा नव्हता. इतक्यात सोसाट्याचा वारा येऊन पावसाची मोठी सर आली.सगळा रस्ता धूवून निघाला.तिच्याही मनातलं मळभ आता दूर झालं होतं. आता तिला तिच्या घरट्याची व पिल्लाची ओढ लागली होती. तशा पावसातच तिची पावलं घराकडे वळली . झपाझप वेगाने घराकडे जाणारी ती आता नुसती लक्ष्मी नव्हती तर एका घरची गृहलक्ष्मी 'व एक बाळाची आई होती. मनाने अर्तःबाह्य बदलली होती. जगरहाटी व चाकोरी आपण मोडू शकत नाही याची तिला आता पूरेपूर जाणिव झाली होती. आणि खरंतर मनातून तिला आता ती चाकोरीही मोडायची नव्हती. आता ही चाकोरीच तिचं विश्व होतं. जे तिला आता हवहवसं होतं.

लेखिका: डाॅ मेघा सुकिर्त भंडारी (बेळगाव)

मो: 8197942017, 8197942027

ईमेल: bhandarimegha71@gmail.com

कथा आवडल्यास कमेंट करा आणि शेअर करा.


विश्व मराठी परिषदेच्या व्हॉट्सअ‍ॅप लिस्टला सामील होण्यासाठी आमचा 7066251262 हा क्रमांक सेव्ह करुन त्यावर Join VMParishad असा मेसेज पाठवा.

    5922
    10